आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगभर फिरून भीक मागत आहेत. हे विधान पाकिस्तानच्याच सिंध प्रांतातील मुख्यमंत्र्याने केले आहे. भारताचा शेजारील मुस्लिम देश सध्या अतिशय वाइट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे, कुठल्याही देशाची मदत मिळवण्याच्या प्रयत्न या देशाचे पंतप्रधान परराष्ट्र दौरे करत आहेत. त्यावरूनच सिंधचे सीएम मुराद अली शाह यांनी ही टीका केली.
शाह पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आसिफ अली झरदारी यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी अर्थातच पीपीपीचे नेते आहेत. ते म्हणाले, "इम्रान खान देश-देश फिरून प्रत्येक नेत्याकेड हात पसरवून भीक मागत आहेत." समा टीव्हीच्या वृत्तानुसार, मटली येथील सभेला संबोधित करताना रविवारी शाह यांनी हे वक्तव्य केले आहे. सोबतच, इम्रान खान यांनी आपल्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुभव नसलेल्यांना जागा दिली असे म्हटले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानसाठी 6.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा (430 अब्ज भारतीय रुपये) बेलआऊट पॅकेज जाहीर केला आहे. पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, यूएईचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान रविवारी पाकिस्तानात आले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी इम्रान खान यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये, बेलआऊट पॅकेजचा वापर कसा होणार यावरही चर्चा झाली. या पॅकेजमध्ये 3.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा इंधन पुरवठा केला जाणआर आहे. तर 3 अब्ज अमेरिकन डॉलर रोख दिले जात आहेत. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात सौदी अरेबिया सरकारने सुद्धा पाकिस्तानला जवळपास इतकाच बेलआऊट पॅकेज जाहीर केला आहे. यानंतर पाकिस्तानने आपले लक्ष कतारवर केंद्रीत केले आहे. त्यांच्याकडून सुद्धा पाकला मोठे पॅकेज मिळण्याची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.