आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धू शांतता दूत, त्यांना चुकीचे ठरवणारे शांतताविरोधी : इम्रान खानचे ट्विट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद/ नवी दिल्ली- पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट व पाकव्याप्त काश्मीरच्या राष्ट्रपतींसोबत बसल्याच्या मुद्द्यावर घेरलेले काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांनी शपथविधी समारंभ हा एक भावुक क्षण होता, असे स्पष्टीकरण मंगळवारी दिले. सिद्धूंच्या स्पष्टीकरणावर भाजपने पलटवार केला आहे. शपथविधीला क्रिकेटपटू म्हणून गेले होते, मात्र आजचे त्यांचे वक्तव्य पूर्णपणे राजकीय असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. सिद्धू अडकत असल्याचे पाहताच पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान यांनी टि्वट केले. त्यात ते म्हणाले की, माझ्या शपथविधी समारंभास पाकिस्तानात आल्याबद्दल सिद्धूचे आभार. ते शांतता दूत होते आणि पाकिस्तानच्या लोकांना त्यांना खूप प्रेम दिले. भारतात जे लोक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत, वास्तवात ते उपखंडात शांततेचे नुकसान करत आहेत. दुसऱ्या टि्वटमध्ये इम्रान म्हणाले, पाकिस्तान व भारताला अग्रेसर करण्यासाठी काश्मीरसह सर्व वाद चर्चेद्वारे सोडवले पाहिजेत. मतभेद दूर करून व्यापार सुरू करायला हवा. 

 

 

 

I want to thank Sidhu for coming to Pakistan for my oath taking. He was an ambassador of peace & was given amazing love & affection by ppl of Pakistan. Those in India who targeted him are doing a gt disservice to peace in the subcontinent - without peace our ppl cannot progress

— Imran Khan (@ImranKhanPTI) August 21, 2018

पाकिस्तान दौरा राजकीय नव्हता, मोदी व वाजपेयीही गेले आहेत : सिद्धू 
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतल्याबाबत सिद्धू म्हणाले, बाजवांनी मला म्हटले होते, आम्हाला शांतता हवी आहे. यानंतर मी भावुक झालो व गळाभेट घेतली. याआधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मैत्री बसमधून लाहोरला गेले होते. त्यांना मुशर्रफनी बोलावले होते. पीएम मोदींनीही शरीफ यांना शपथविधीसाठी बोलावले होते. 

 


जवान शहीद होताहेत, सिद्धूंची गळाभेट चुकीची : अमरिंदर 
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर म्हणाले, सीमेवर आपले जवान शहीद होत असताना सिद्धूंनी अशा पद्धतीने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घ्यावयास नको होती. सिद्धू यांची ही कृती योग्य ठरवली जाऊ शकत नाही. 


बजरंग दलाचे सिद्धूंवर ५ लाख रुपयांचे इनाम 
आग्र्यातील राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख संजय जाट यांनी सिद्धूंवर ५ लाख रुपयांचे इनाम ठेवले आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. असे असले तरी एसएसपी अमित पाठक म्हणाले, सध्या अशा कोणत्याही प्रकरणाची माहिती नाही आणि कुणाची तक्रारही आली नाही. 


काँग्रेससाठी आमचे लष्करप्रमुख 'सडक के गुंडे, पाक लष्करप्रमुख सोने दे मुंडे' : भाजप 
भाजपने सिद्धूच्या आडून काँग्रेसवरही निशाणा साधला. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, काँग्रेससाठी आमचे लष्करप्रमुख वाईट व पाकचे लष्करप्रमुख चांगले आहेत. त्यांचा इशारा संदीप दीक्षित यांच्या वक्तव्याकडे होता. त्यांनी बिपिन रावत यांची तुलना "सडक के गुंडे'शी केली होती. संबित पात्रा यांनी या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्षांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. 


इम्रान- मी १६ तास, तुम्ही १४ तास काम करा 
सत्तेतील वायफळ खर्च रोखणारे पीएम इम्रान खान यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत. मी १६ तास काम करीन, तुम्ही १४ तास काम करा, असे ते मंत्र्यांना म्हणाले. कार्यालयात तुम्हाला केवळ चहा मिळेल. चहासोबत बिस्कीटही मिळणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...