आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान यांच्या पक्षाच्या नेत्याची भारताकडे आश्रयाची मागणी,'हिंदू-शीख असुरक्षित'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षातील नेत्यांनाच स्वत:बद्दल असुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळेच पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे माजी आमदार बलदेव कुमार तीन महिन्यांच्या व्हिसावर भारतात आश्रयाला आले आहेत. भारताने आश्रय द्यावा. आम्हाला पाकिस्तानात परतण्याची मुळीच इच्छा नाही. पाकिस्तानात अल्पसंख्यांकांत असुरक्षिततेची भावना आहे. आम्ही पाकिस्तानात अतिशय कठिण परिस्थितीला तोंड देत जगत आहोत, अशा शब्दांत बलदेव यांंनी पाकिस्तानातील वास्तवाला चव्हाट्यावर मांडले आहे. बलदेव खैबर पख्तुनख्वामध्ये अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी सातत्याने लढत आले आहेत. ते पाकिस्तानातील बळजबरी धर्मांतर व विवाहाच्या घटनांना अधिक व्यथित झाले आहेत. ते म्हणाले, पाकिस्तानातील जनतेला इम्रान यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु आता निराशा वाढली आहे. अल्पसंख्याकच नव्हे तर मुस्लिमांचा एक वर्ग देखील अन्याय होत असल्याने अस्वस्थ आहे.

पाकिस्तानात १० दिवसांत बळजबरी धर्मांतराची दोन प्रकरणे...
रविवारी ख्रिश्चन, त्या आधी याच महिन्यात सुरुवातीला शीख मुलीच्या बळजबरी धर्म परिवर्तनाचे प्रकरण समोर आले. दोन्ही प्रकरणे पंजाब प्रांतातील आहेत.

कोण आहेत बलदेव : पाकिस्तानच्या बारीकोटचे दोन दोन दिवसांचे आमदार
बलदेव कुमार पाकिस्तानच्या राखीव मतदारसंघ असलेल्या बारीकोटाचे आमदार होते. वास्तविक त्यांचा कार्यकाळ केवळ दोन दिवसांचा होता. बारीकोट निवडणुकीत बलदेव दुसऱ्या क्रमांकावर होते. पहिल्या क्रमांकावरील विजयी आमदाराची हत्या झाली होती. या हत्येचा ठपका बलदेव यांच्यावर लावण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. २०१८ मध्ये सुटका झाल्यावर बलदेव आमदार झाले. परंतु दोन दिवसानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. तेथे पुन्हा निवडणूक झाली. पाकिस्तानातील नियमानुसार विद्यमान खासदाराची हत्या किंवा मृत्यू झाल्यास निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार हा आमदार मानला जातो.

भारताने बजावले... 
चीन व पाकने सीपीईसी प्रकल्प बंद करावा : परराष्ट्रमंत्री
भारताने काश्मीरबद्दल पाकिस्तान व चीनच्या संयुक्त वक्तव्याचा निषेध केला. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी पाकच्या दौऱ्यावर होते. काश्मीरसंबंधी कार्यवाही एकतर्फी असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. पाक व चीनने पीआेकेमध्ये सुरू केलेला चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर (सीपीईसी) प्रकल्प तत्काळ बंद करावा, अशा शब्दांत बजावले.

चीन का बिथरला ?
चीनचा लडाखविषयी दावा : भारताने केंद्रशासित प्रदेश केले
भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेश केल्याची घोषणा केली. चीन लडाखच्या एका भागावर दावा करतो. भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केल्याने चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान मिळाल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी म्हटले होते. चीनने अक्साई चीन हा देखील शिनजियांग प्रांताचा भाग असल्याचा नेहमीच दावा केला आहे. परंतु शिनजियांग व तिबेटमधील सैनिकांची वाहतूक सुलभ व्हावी, असा चीनचा मनसुबा आहे. चीनला सिमला करार मान्य नाही.

काश्मीरवर एकजूट... 
काश्मीरचे एक इंचदेखील पाकिस्तानला देणार नाही : थरूर
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पाकिस्तानला ट्विटद्वारे इशारा दिला आहे. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करू नये. आम्ही आमच्या देशात विरोधी बाजूने आहोत. देशात राहून काश्मीरच्या मुद्दयावर सरकारवर टीका करू शकतो. परंतु भारताच्या बाहेर आम्ही एक आहोत. आम्ही पाकिस्तानला एक इंचही जमीन देणार नाहीत. काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात गेल्यास सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारसोबत उभे राहतील, असे थरूर यांनी या आधी म्हटले होते.