आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांना औरंगाबाद लोकसभेचे तिकीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मागील काही दिवसांपासून तळ्यात- मळ्यात सुरू असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अखेर एमआयएमचे विद्यमान आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिली आहे. 


वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्यात युती असून औरंगाबादच्या जागेसाठी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला होता. परंतु, एमआयएमने या जागेसाठी दबाव वाढवल्यामुळे अखेर जलील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, एमआयएमने लोकसभेसाठी मुंबईतील जागाही मागितली होती. ही जागाही त्यांना मिळाली आहे. 


वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली; त्यात अकोला, औरंगाबाद आणि सोलापूर येथून कोण लढेल, हे जाहीर न केल्याने तिन्ही लोकसभा मतदारसंघांचे गूढ कायम होते. यापैकी औरंगाबादच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. औरंगाबादसाठी वंचित बहुजन आघाडीने बी.जी. कोळसे पाटील यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर जलील यांनी त्यावर आक्षेप घेत, alt147कोळसे पाटील यांचा औरंगाबादशी काय संबंध', असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून औरंगाबादची जागा एमआयएमला सोडावी, असे दबावतंत्राचे राजकारण एमआयएमकडून सुरू झाले होते. परंतु, आपला मित्रपक्ष दुखावू नये म्हणून औरंगाबादची जागा एमआयएमला सोडण्यात आल्याची माहिती आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे वंचित आघाडी व एमआयएम युतीचे उमेदवार असतील, असे पातोडेंनी सांगितले. 

 

पक्षाच्या अहवालानंतरच निर्णय : आ. इम्तियाज 
अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पक्षाध्यक्ष ओवेसींनी पक्ष निरीक्षक फेरोज लाला यांना चाचणीसाठी औरंगाबादेत पाठवले आहे. ते प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतील, अहवाल सादर करतील. त्यानंतरच औरंगाबाद लोकसभा आम्ही लढवावी की नाही, हे स्पष्ट होईल. इम्तियाज जलील, एमआयएम 

 

मुंबईतून लढण्याची आमची ओवेसींना विनंती : आंबेडकर 
वृत्तसंस्थेशी बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेतून उमेदवार देण्याचे मान्य केले आहे. नावाची घोषणा तेच करतील. ओवेसींनी उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची आम्ही विनंती केली आहे. ते २ दिवसांत त्यांचा निर्णय कळवणार आहेत. 


सोलापूर आणि अकोल्याचा पर्याय आंबेडकरांसाठी खुला 
२०१४ च्या निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार दिल्याने अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या पारड्यात तिसऱ्या क्रमांकाची मते पडली होती. या निवडणुकीत अकोल्यात काँग्रेसचा कोण उमेदवार असेल, त्यानंतरच आंबेडकर आपली उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...