आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात इम्तियाज जलील यांनी रोवला 'वंचित'चा झेंडा, औरंगाबादेत चुरशीच्या लढतीत चंद्रकांत खैरेंचा 6067 मतांनी पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून यामध्ये अनेक दिग्गजांना धक्के बसत आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड समजला जातो. याठिकाणी गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे निवडून आले आहेत. पण यावेळी मात्र शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव केला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंना 381975 मतं पडली तर इम्तियाज जलील यांना 388042 मतं पडली. तसेच काँग्रेसचे सुभाष झांबड यांना 91253 आणि हर्षवर्धन जाधव यांना 281908 मतं मिळाली.

 

संसदेत एमआयएमचे दुसरे खासदार 
औरंगाबाद मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. एखाद्या क्रिकेट सामन्याप्रमाणे शेवटपर्यंत कल कधी इकडे तर कधी तिकडे असा राहीला. शेवटपर्यंत चाललेल्या या लढतीत जलील यांनी विजय मिळवला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मतांचे विभाजन झाले आणि या विभाजनाचा थेट फायदा इम्तियाज यांना झाला. इम्तियाज जलील हे असदुद्दीन ओवेसीनंतर एमआयएमचे दुसरे खासदार ठरले आहेत.  

 

खैरेंसमोर होते तगडे आव्हान 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी चंद्रकांत खैरे यांच्यासमोर मोठी आव्हाने होती. काँग्रेसचे सुभाष झांबड, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. औरंगाबाद मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. 2014 मध्ये औरंगाबादेत 61.85 टक्के मतदान झाले होते. पण यावेळी मात्र 2 टक्क्यांनी आकडा वाढला होता.