आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या काैतुकानंतर 15 दिवसांतच चंदनझिऱ्यातील एएसअायने घेतली लाच!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - चांगला तपास करून गुन्हे उघडकीस आणल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्याचे ट्विट करून कौतुक केले होते. मुख्यमंत्र्यांनी पाठ थोपटल्यानंतर अवघ्या १५ दिवसातच या ठाण्यातील साहाय्यक फौजदाराने तपासात मदत करण्यासाठी १५ हजारांची लाच मागितल्याचे पुढे आले आहे. तर या लाचखोर साहाय्यक फौजदारास पाच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून एसीबीने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दिलीपसिंह ठाकूर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. 


याप्रकरणातील तक्रारदाराचे वडील,भाऊ,काका अशा सहा जणांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या नातेवाइकांना तपासात मदत करण्यासाठी तसेच जामीन करण्यासाठी साहाय्यक पोलिस फौजदार दिलीप कचरुसींग ठाकूर याने १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ठाकूर याने १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार ७ नाेव्हेंबर रोजी तक्रारदारांनी ठाकूर यास १० हजार रुपये दिले. त्यावेळी ठाकूर याने उर्वरित पाच हजार रुपये उद्या द्यावे लागतील असे तक्रारादारांना सांगितले. मात्र १० हजार रुपये देऊनही ठाकूर याने त्रास देणे सुरुच ठेवल्याने तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दिली. त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी करून 
सापळा रचला.


गुरुवारी सकाळी नूतन वसाहत येथील एका हॉटेलात ठाकूर लाचेचे पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पैसे स्वीकारताच ठाकूर यास एसीबीचे पीआय अजिनाथ काशीद यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ठाकूर यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलिस अधीक्षक जिरगे, जालन्यातील पोलिस उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलिस निरीक्षक आदीनाथ काशीद, अशोक टेहरे,संतोष धायडे,प्रदीप दौड,संदीप लव्हारे,गंभीर पाटील यांच्यासह अन्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा यशस्वी केला.

 

> दोन्हीकडे पैशाची केली मागणी 
पोलिसांकडून तक्रारदार व ज्यांच्यावर आरोप आहेत अशा दोघांकडेही लाचेची मागणी केली जात असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात तुम्ही पैसे दिले नाही तर समोरची पार्टी पैसे देण्यास तयार आहे असे ठाकूर याने सांगितले होते. याच पोलिस ठाण्यात यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले. थेट गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण पुढे आले.

 

> साहेब माझे चुकले 
नूतनवसाहत येथील एका हॉटेलमध्ये ठाकूर याने पैसे स्वीकारताच तक्रारदाराने इशारा करताच एसीबीचे पीआय अजिनाथ काशीद पथकासह पुढे आले. काशीद यांना पाहताच ठाकूर याचे हातपाय गळाले. साहेब माझे चुकले असे म्हणत ठाकूर याने एसीबीसमोर हात जोडले. मात्र एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेत पंचनामा सुरू करून गुन्हा दाखल केला.

 

> लाचखोरीत पोलिसांचा दुसरा क्रमांक

जालना जिल्ह्यात लाच मागण्यामध्ये महसूल विभाग आघाडीवर आहे तर गेल्या तीन वर्षापासून दुसऱ्या क्रमांकावर पोलिस प्रशासन आहे. या वर्षीही आतापर्यंत पोलिस दलातील सात जणांवर लाचेचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. २०१५ या वर्षात लाचप्रकरणी ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१६ मध्ये २९ तर २०१७ मध्ये २९ जणांवर लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यात ८ पोलिसांचा समावेश होता.

 

> चार दिवसांपूर्वीच कामावर
साहाय्यक फौजदार ठाकूर २५ दिवस वैद्यकीय रजेवर होता. रजेवरून ४ दिवसांपूर्वीच तो चंदनझिरा ठाण्यात हजर झाला. हजर होताच त्याने तक्रारदार व त्यांच्या नातेवाइकांना त्रास देण्यास सुरुवात केली. लाचेसाठी तगादा लावला हाेता असे तक्रारदारांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...