आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८०० मोलकरणी, ३०० कार धुणारे राेज वाचवणार १२ लाख लिटर पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्यानंतर पाणी बचतीचे महत्त्व आणि त्याबद्दलची जागृती वाढताना आपण पाहताे. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणी बचत व जलसंवर्धनकडे दुर्लक्ष हाेते. अशा वेळी जलसाक्षरता वाढून जलसंवर्धन होण्याच्या उद्देशाने अमनाेरा येस फाउंडेशनच्या वतीने ‘जलमित्रा अभियान’ हे पाणी बचत अभियान हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत अमनाेरामधील सुमारे १८०० घरकाम करणाऱ्या महिला व ३०० कार धुणारे कामगार प्रतिदिन सुमारे १२ लाख लिटर पाणी वाचवणार असल्याची माहिती अमनाेरा येस फाउंडेशनचे संस्थापक अनिरुद्ध देशपांडे यांनी दिली आहे. 

 

देशपांडे म्हणाले, अमनाेरा पार्कमध्ये सुमारे साडेपाच हजार कुटुंबे राहतात. दररोज ४० लाख लिटर पाणी वापरले जाते. टाऊनपार्कमध्ये ६० लाख लिटर पाण्याची दरराेज आवश्यकता असताना ते जनजागृती व पुनर्वापराच्या माध्यमातून ४० लाख लिटरपर्यंत कमी करण्यात आले आहे. सेवावर्धिनी या संस्थेच्या मदतीने अमनाेरा पार्कमध्ये काम करणाऱ्या १८०० घरकामगार महिला व सुमारे पाच हजार चारचाकी गाड्या धुणारे कामगार यांना पाणी बचतीचे धडे देण्यात येणार आहेत. अभिनेत्री श्रुती मराठे हिच्या उपस्थितीत जलकलशाचे पूजन करून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. अमनाेरामध्ये प्रतिदिन तब्बल २५ लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. यापुढील काळात जलसाक्षरतेच्या माध्यमातून  प्रतिमाणसी दहा लिटर पाणी बचत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात जलदूत तयार करण्याचे काम अनेक वर्षे करण्यात येत हाेते. परंतु आता शहरी भागातही याद्वारे काम केले जाणार आहे. 

 

दरम्यान, जलसाक्षरतेबाबत आजवर सेवावर्धिनी या संस्थेने  भरीव काम केले आहे.त्यामुळे अमनोराच्या सदस्यांनी पाणीबचतीसाठी याच संस्थेची मदत  घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आता ही संस्था महिला व पुरुष कामगारांना प्रशिक्षित करणार आहे. या संस्थेने आजवर पाणी बचतीचे  अनेकांना मार्गदर्शन आणि  प्रशिक्षणही दिले आहे.  त्यामुळे साेसायटीत वाया जाणाऱ्या पाण्याचा पुन्हा वापर हाेणे शक्य  होणार आहे.


बहुतांश महिला कामगार मराठवाड्यातील
मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून अनेक महिला कामाच्या शाेधात पुण्यात येऊन घरकाम करत असल्याने त्यांना पाण्याची दाहकता चांगल्या प्रकारे माहिती असून त्यांनी पाणी बचत कामास प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे अमनाेराच्या आजूबाजूचा परिसर व काेंढवा, हडपसर, केशवनगर भागात ३०० प्रशिक्षित पाणी बचत प्रशिक्षक पुढील पाच वर्षे जनजागृतीचे काम करतील. आपल्या घरात काम करायला येणाऱ्या महिलांना जर आपण पाणी बचतीसंदर्भात काही प्रमाणात का हाेईना साक्षर करू शकलाे तर वाया जाणारे पाणी आपण वाचवू शकू, या विचाराने हे अभियान राबवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...