आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In 6 Years, Bollywood's Business Grew By 28 Percent, And Hollywood's 157 Percent Increased

देशात पाचपट वाढतेय हॉलीवूडची कमाई; 6 वर्षांत बॉलीवूडचा व्यवसाय 28%, तर हॉलीवूडचा 157% वाढला 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सर्जिकल स्ट्राइकवर बनलेल्या 'उरी' चित्रपटाची घोडदौड २०० कोटींकडे सुरू आहे. यासोबतच देशात हॉलीवूडच्या चित्रपटांची कमाईदेखील वेगाने वाढत आहे. याबाबत गत ६ वर्षांतील ट्रेंड पाहता हॉलीवूडपटांच्या देशातील कमाईचा वेग बॉलीवूडपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. २०१३ ते २०१८ दरम्यान हॉलीवूडपटांचा व्यवसाय पाचपटपेक्षाही जास्त वेगाने वाढला आहे. या कालावधीत बॉलीवूडच्या चित्रपटांची कमाई केवळ २८% वाढली, तर हॉलीवूडपटांचे भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शन १५७% वाढले. हा ट्रेंड असाच राहिल्यास हॉलीवूडचा भारतातील व्यवसाय या वर्षी एक हजार कोटी रुपयांची आकडेवारी पार करू शकतो. 

 

चित्रपट व्यवसाय विश्लेषक अतुल मोहन यांच्या मते 'मिशन इम्पॉसिबल', 'ट्रान्सफॉर्मर्स' व 'स्पायडरमॅन' यासारख्या हॉलीवूडपटांना भारतात मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला. विज्ञानाचा आधार, मारधाड व साहसी दृश्ये हे यामागील एक कारण आहे. त्यामुळे या चित्रपटांचे सिक्वेल व एक्स्टेन्शन उत्सुकता वाढवतात. याबाबत फिल्म ट्रेड एक्स्पर्ट गिरीश जोहर यांनी सांगितले की, भारतीय प्रेक्षकांना सर्व प्रकारचे हॉलीवूड सिनेमे आवडतात. त्यात सुपरहीरोपासून भयपट व अॅनिमेशनपटांचा समावेश आहे. भव्यदिव्यता हेही या चित्रपटांचे कलेक्शन वाढण्यामागील कारण आहे. 

 

हॉलीवूड वि. बॉलीवूड : 
भारतात सर्व भाषांचे मिळून दरवर्षी एक हजारपेक्षा जास्त, तर हॉलीवूडमध्ये याहून निम्मे सिनेमे बनतात. यातील सुमारे २०० सिनेमे भारतासह जगभरात प्रदर्शित होतात. असे असूनही निर्मिती खर्च, प्रेक्षकसंख्या व कमाईच्या बाबतीत हॉलीवूड बॉलीवूडपेक्षा पुढे आहे. भारतात एक सिनेमा सरासरी १० ते १५ कोटींत बनतो, तर हॉलीवूडमध्ये हेच प्रमाण २७० कोटी रुपये प्रतिसिनेमा असे आहे. तसेच भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ४ % नागरिक नियमितपणे चित्रपटगृहात जातात, तर हॉलीवूडपटांचे प्रेक्षक जगभरात आहेत. 

 

यंदाही असेल हॉलीवूडचा प्रभाव : 
या वर्षी हॉलीवूड सुपरहीरो व ४-डी चित्रपटांसह सर्वात जास्त सिक्वेल व एक्स्टेन्शन घेऊन येत आहे. यातील कंटेंट, विविध प्रयोग, व्हीएफएक्स व नवीन तंत्रज्ञानाचा समन्वय रोमांच व उत्सुकता वाढवणारा आहे. यंदाचा सर्वात मोठा सुपरहीरो सिनेमा 'अॅव्हेंजर्स : एंड गेम' हा असेल व यात मार्व्हल कॉमिक्सचे जवळपास सर्वच सुपरहीरो दिसतील. सुमारे २,५०० कोटी रुपयांचे बजेट असलेला हा चित्रपट अनेक विक्रम मोडू शकतो. याशिवाय फ्रोझन-२, द अँग्री बर्ड‌्स-२, द लिगो मूव्ही-२, जुमानजी-३, टॉय स्टोरी-४, टर्मिनेटर-६ व स्टार वॉर्स-९ हेदेखील रांगेत आहेत. मॅन इन ब्लॅक : इंटरनॅशनल, गॉडझिला : किंग ऑफ मास्टर्स हे सिनेमेही तयार आहेत. यासोबतच मुलांसाठी द सिक्रेट लाइफ ऑफ पेट्स, डोरा द एक्सप्लोरर, पोकेमॉन : डिटेक्टिव्ह पिकाचू व अलाद्दीन हेसुद्धा प्रदर्शित होतील. 

 

भारतात बॉक्स ऑफिस कलेक्शन 

वर्ष बॉलीवूड हॉलीवूड 
२०१८ ३,४८५ ९६५ 
२०१७ ३,०३५ ८०१
२०१६ २,७८० ७९५ 
२०१५ २,७२७ ६६१ 
२०१४ २,७४५ ४५३
२०१३ २,७१८ ३७५

(रक्कम कोटी रुपयांत) 

 

भारतात २०१५ मध्ये २०१४ च्या तुलनेत हॉलीवूडपटांनी ४६ % म्हणजे २०८ कोटी रुपये जास्त कमावले. हा गत सहा वर्षांतील सर्वात जास्त फरक आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये बॉलीवूडपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे १५ %, तर हॉलीवूडपटांचे २१ % वाढले. 

हॉलीवूडपटांना मिळताहेत जास्त शो : भारतात मिळणारे जास्त शो हेही हॉलीवूडपटांच्या प्रचंड कमाईचे कारण आहे. अतुल मोहन यांच्यानुसार भारतात स्क्रीन्सची संख्या ३०० वरून ७०० व आता २ हजार झाली. हॉलीवूडपटांना मिळणारा मोठा प्रेक्षकवर्ग पाहून मल्टिप्लेक्सवालेही त्यांना जास्तीत जास्त स्क्रीन्स उपलब्ध करून देतात. 

 

'बाहुबली-२' ने सर्वाधिक १,४०८ कोटी, हॉलीवूडच्या 'अव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर' ने २२८.४७ कोटी रु.कमावले. बिग बजेट सिनेमे यंदा येणारा सर्वात महागडा सिनेमा 'अॅव्हेंजर्स : एंड गेम' हा आहे. हॉलीवूडमध्ये सर्वाधिक बजेटचा २०११ मध्ये आलेला 'पायरेट्स ऑफ द कॅरेबियन : ऑन स्ट्रेंजर टाइड्स' हा चित्रपट मानला जातो. त्याचे बजेट ३,००० कोटी रुपयांपेक्षाही जास्त होते.

 

चित्रपट बजेट (अंदाजे) 
अॅव्हेंजर्स : एंड गेम रु. २,५०० कोटी 
स्टार वॉर्स ९ रु. २,००० कोटी 
द लायन किंग रु. १,६१८ कोटी
टॉय स्टोरी-४ रु. १,५८२ कोटी
फ्रोझन-२ रु. १,२५८ कोटी 

स्रोत : ormaxmedia, forbes.com, ibtimes.co.in, statista.com, filmibeat.com 

 

बातम्या आणखी आहेत...