आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतीस मिनिटांच्या भाषणामध्ये मोदी १२ मिनिटे बोलले स्थानिक मुद्द्यांवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहू गाढे /आशिष गारकर 

जालना - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून उभारला जात असलेला ड्रायपोर्ट, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वॉटरग्रीडचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परतूरच्या सभेत कौतुक केले. हे प्रकल्प मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. शिवाय मराठवाड्यात बहुसंख्येने असलेल्या बंजारा समाजासाठी ‘बंजारा विकास कल्याण बोर्ड’ स्थापन केले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दरम्यान, ३१ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी तब्बल १२ मिनिटे स्थानिक मुद्द्यांवरच अधिक जोर दिला. मोदींच्या आतापर्यंतच्या झालेल्या सभांमध्ये पहिल्यांदाच मोदींनी स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे नागरिकांतून बोलले जात होते. 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परतूर येथे मोदी यांची सभा घेण्यात आली. मोदी व्यासपीठावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार संजय जाधव, भागवत कराड, परतूरचे उमेदवार बबनराव लोणीकर, जालन्याचे उमेदवार अर्जुन खोतकर, घनसावंगीचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, पाथरीचे मोहन फड, रामराव वडकुते, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणाची सुरुवात मोदींनी मराठीतून केल्याने प्रेक्षकांनी “मोदी मोदी’च्या जोरदार घोषणा दिल्या. याप्रसंगी मोदी यांनी शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचा उल्लेख करत राज्यभरात ५० हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळ आपण जवळून पाहिला असल्याचे सांगत जलयुक्त शिवार, वॉटरग्रीड योजना जलक्रांतीचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील पाण्याच्या दुष्काळाबाबत बोलताना त्यांनी ‘आप वो लोग है पाणी झेल चुके है’ असा मुद्दा उपस्थित करून त्यांनी पाण्याबाबतच्या प्रश्नावर बहुतांश वेळ बोलले. यामुळे जिल्ह्यात वाॅटरग्रीड योजना सुरू करीत आहोत. या योजनेमुळे मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, यादृष्टीने विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट रक्कम येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला फायदा होत आहे. सभेमुळे परतूर शहरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सभास्थळी दोन दिवसांपासून पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी सुधीर खिरडकर, एस. डी. शेवगण यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे यशवंत जाधव हे तळ ठोकून होते. तसेच, जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. हेलीकाॅप्टर आल्यानंतर सभामंडपात बसलेल्या सर्व जणांनी उभे राहून मोदी-माेदीची घोषणाबाजी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल लोणीकर यांनी केले. 
 

शेकडो बसेसची होती ये-जा : परतूर येथे झालेल्या मोदींच्या सभेसाठी विविध विभागांतील बसेस लावण्यात आल्या होत्या. सभेला येणाऱ्या-जाणाऱ्यांची सोय व्हावी व इतर कामांसाठी जालना आगारातून शेकडो बसेस लावण्यात आल्या होत्या.  
 

धोतर-टोपीवाल्याचं सरकार : टाटा, बिर्ला हे सरकार मागचं होतं. धोतर-टोपीवाल्या गरिबाचं हे सरकार आहे. मोदी यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासकामे केली जात आहेत. आगामी काळात विविध विकासकामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असे रावसाहेब दानवे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
 

एकाला घेतले ताब्यात 
अतिउत्साहात एका कार्यकर्त्याने बॅरिकेड्सवर चढून मोदी-मोदी करीत घोषणाबाजी करीत होता. याप्रसंगी मागील नागरिकांनी आवाज केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. परंतु, याप्रसंगी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यास तात्काळ खाली उतरवून सभेच्या बाहेर नेऊन चांगली चौकशी केली. 

मोदींची आज परळीत सभा

बीड |  पंकजा मुंडेंसह जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी  परळीत गुरुवारी (दि. १७) सभा घेणार आहेत.   सकाळी ११ वाजता  वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर ही सभा होत आहे. त्यामुळे परळी शहराकडे येणारी वाहतूक ५ तास बंद असणार आहे.