आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In An Interview To 'Divya Marathi', The Deputy Speaker Of The Legislative Council Gave Many Free Answers

विधान परिषदेच्या उपसभापतींनी 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांना दिली मनमोकळी उत्तरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केवळ महिलांना जास्त संधी मिळाली पाहिजे असे नाही. गुणवत्ता आणि कामाचा निकष लावून ज्या खरोखर काम करणाऱ्या आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे. उगाच महिला म्हणून कुणाची तरी वर्णी लावायची असे होत असेल तर ते बरोबर नाही. राजकीय घराण्यांपेक्षा पक्षातल्या महिला कार्यकर्त्यांना आधिक संधी हवी, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.

> प्रश्न : विधिमंडळातील महिला आमदारांच्या कामावर संतुष्ट आहात का?
उत्तर : मी गेली १६ वर्षे सभागृहात आहे. २००२, २००९ व २०१४ मधील महिला आमदारांचे काम पाहिलेय. एकूणच कामाचे स्वरूप बदलत असताना  महिला आमदारही त्याच्याशी जुळवून घेतात. आव्हानांना  त्या चांगल्या प्रकारे सामोरे जातात.

> प्रश्न : कामाबाबत तुमची काय निरीक्षणे? 
उत्तर : विधानसभेत २८८ आमदार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला पुरेशी संधी मिळणे अवघड असते. आमदारांना जेवढे विषय मांडायचे असतात तेवढे मांडता येत नाहीत. मात्र महिला आमदार सक्षमपणे प्रश्न सोडवतात, हे नक्कीच. 

> प्रश्न : मंत्रिमंडळात दोन महिला मंत्री आहेत. त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? 
उत्तर : पंकजा मुंडेंकडे चांगले वक्तृत्व आहे. कुठल्याही संघर्ष होतो तेव्हा त्यांचे नेतृत्व झळाळून उठते. त्यांच्या कामावे कौतुक वाटते. मंत्री विद्या ठाकूर त्यांच्या खात्याच्या कार्यक्रमांना आवर्जून हजर असतात. 

> प्रश्न : जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने तेथे पत्नीला उभे करून प्रत्यक्ष पती किंवा अन्य मंडळी काम पाहतात, असा आरोप होतो?
उत्तर : स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना आरक्षण आहे. एकीकडे महिलांना कर्तृत्व दाखवण्याची संधी देणारे खूप आहेत, तर दुसरीकडे स्वत: ला संधी मिळाली नाही, म्हणून पत्नीला पुढे करणारेही आहेत. हे चित्र भूषणावह नाही. 

> प्रश्न : महिला मंत्र्याची संख्या कमीच आहे? 
उत्तर : केंद्रात महिलांना चांगली संधी दिलेली आहे. विधान परिषदेत मला संधी दिली आहे. केवळ महिला किंवा पुरुष आहे म्हणून संधी मिळत नाही. तुम्ही कुठल्या भागाचे प्रतिनिधित्व करता, कुठले प्रश्न सोडवता,  पक्षात कितपत उपयोगिता आहे, हेही पाहिले जाते. केवळ सरसकटपणे महिलांना जास्त संधी मिळाली पाहिजे असे नाही. गुणवत्ता आणि कामाचा निकष लावला गेलाच पाहिजे. 

> प्रश्न : महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबत शिवसेनेचे काय धोरण आहे? 
उत्तर : अनेक ठिकाणी आमच्या गटनेत्या आहेत. मुंबईत त्यांची संख्याही मोठी आहे. सुरुवातीला मी प्रवक्ता झाले. त्यानंतर मनिषा कायंदे,  किशोरी पेडणेकर आदींनाही संधी मिळाली.  प्रत्येक पक्ष महिलांना संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांची निवडून येण्याचही क्षमताही पाहावीच लागते.


> प्रश्न : भाजप प्रचारात कलम ३७० चा मुद्दा वापरत आहे.  शिवसेनेचे कोणते मुद्दे असत
ील? 
उत्तर :  आम्ही खूप लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती किंवा पीक विमा आदींचा समावेश आहे. आम्ही शेतकरी व शासनातील दुवा म्हणून काम केले. यामुळे लोकांत शिवसेनेची विश्वासार्हता वाढली.

> प्रश्न : मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. सरकारच्या कामावर समाधानी आहात?
उत्तर : मी १५ दिवसांपूर्वीच मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत बैठक घेतली होती. पावसाळ्यातही बीड, लातूर, उस्मानाबादेत रोजगार हमी योजना सुरू ठेवण्याचा विचार आहे.  दुष्काळात मदतीसाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल. 
 

> आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत तुमचे काय मत?
उत्तर :  आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात आमदार म्हणून येणे ही पहिली पायरी आहे. त्यांनी सक्रिय राजकारणात यावे, असे आम्हाला वाटते. त्यांचा कायद्याचा अभ्यास चांगला आहे. त्यांना पर्यावरण, शिक्षण या कळीच्या  विषयांची चांगली समज आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना कुठल्या स्थानावर पाहू इच्छितात त्यानुसार पक्ष निर्णय घेईल.
 

बातम्या आणखी आहेत...