आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकरमध्ये माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; अशोक चव्हाणांच्या पराभवासाठी भाजपने कंबर कसली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - भोकर मतदारसंघात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी भाजपने पूर्ण शक्ती पणाला लावली. त्यामुळे या मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाली. अटीतटीच्या या लढाईत कोण बाजी मारतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

लोकसभेनंतर अशोक चव्हाणांना विधानसभेेच्या निवडणुकीतही खिंडीत गाठण्याची भाजपची व्यूहरचना आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांना पक्षात घेऊन त्यांना चव्हाणांविरुद्ध रिंगणात उतरवून भाजपने चव्हाणांना जखडून ठेवले. चव्हाण मतदारसंघाबाहेर फारसे फिरू शकले नाहीत. या मतदारसंघात एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत मात्र अशोक चव्हाण व बापूसाहेब गोरठेकर यांच्यातच आहे. बहुजन समाज पार्टीचे रत्नाकर तारू व वंचित बहुजन आघाडीचे नामदेव आईलवाड यांची उमेदवारीही महत्त्वपूर्ण आहे. बसपची कँडर बेस व्होट बँक आहे. त्यामुळे ते किती मते घेतात यावर काही प्रमाणात निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वेळी एमआयएम  रिंगणात नाही हा चव्हाणांना दिलासा आहे. परंतु वंचितचे नामदेव आयलवाड किती मते घेतात यावर या लढतीचे भवितव्य अवलंबून आहे. 

भोकर मतदारसंघाचे १९७२ व १९८० मध्ये शंकरराव चव्हाणांनी, १९८०, १९८५ बाबासाहेब देखमुख गोरठेकर यांनी, १९९०, १९९५ मध्ये डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी, १९९९ मध्ये पुन्हा बाबासाहेब देशमुख गोरठेकरांनी, २००४ मध्ये सध्याचे उमेदवार बापूसाहेब देशमुख गोरठेकरांनी, २००९ मध्ये अशोक चव्हाण व २०१४ मध्ये अमिता चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केले. भोकरसाठी चव्हाण-गोरठेकर कुटुंब परके नाही. अशोक चव्हाणांसाठी ही लढाई करो या मरोची आहे. गोरठेकर ही शेवटची राजकीय लढाई लढत आहेत. 
 
 

करो या मरोची लढाई 
अशोक चव्हाणांसाठी ही करो या मरोची लढाई आहे हे महत्त्व जाणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पहिली सभा याच मतदारसंंघात घेतली. जे.पी. नड्डा यांनीही सभा घेतली. चव्हाणांचा पराभव हा भाजपसाठी राज्यातील मोठा विजय ठरणारा आहे. त्यामुळे भाजपने सर्व शक्ती पणाला लावली. चव्हाण त्या तुलनेत एकाकी झुंज देत आहेत. ज्योतिरादित्य शिंदेंचा अपवाद वगळता काँग्रेसचा बडा नेता फिरकला नाही. मराठा मतदार सर्वाधिक व निर्णायक आहेत. त्यामुळे  हे मतदान दोन्ही उमेदवारांचे लक्ष्य आहे. हा मतदार ज्या बाजूला झुकेल विजयश्री त्याच्या गळ्यात माळ घालेल अशी स्थिती आहे. शेवटच्या टप्प्यात ही लढत अटीतटीची असल्याचे मानले जाते. गोरठेकर आयुष्यातील शेवटची निवडणूक लढत आहेत, तर चव्हाणांची राजकीय अस्तित्वासाठी ही लढाई आहे. आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई आहे.