आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • In Case Of During Match Player Got Head Injury Then The Reserve Player Can Be Included In The Match; New Rules From Ashes Possible

लढतीत डोक्यावर मार लागल्यास राखीव खेळाडूचा होऊ शकतो समावेश; अॅशेसपासून नवा नियम शक्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) डोक्याला चेंडू लागून होणाऱ्या दुखापतीवर गंभीर विचार करत आहे. त्यामुळे आयसीसी लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राखीव खेळाडूचा समावेश करण्याचा िनर्णय घेऊ शकते. हे राखीव खेळाडू त्या खेळाडूंच्या जागी खेळू शकतील, सामन्यादरम्यान ज्यांच्या डोक्याला दुखापत झाली असेल. आतापर्यंत राखीव खेळाडू केवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची परवानगी नव्हती. आता मात्र हा नवीन नियम लागू झाल्यानंतर राखीव खेळाडूला फलंदाजी व गोलंदाजी दोन्ही करता येईल. एक ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या अॅशेस मालिकेपासून त्याची सुरुवात होऊ शकते. त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सर्व सामन्यांत हा नियम लागू होईल. लंडनमध्ये सध्या आयसीसीची वार्षिक बैठक सुरू आहे. ही बैठक शुक्रवारपर्यंत चालेल. यादरम्यान राखीव खेळाडूंच्या नियमावर निर्णय घेतला जाईल. सामन्यादरम्यान राखीव खेळाडूचा निर्णय संघाचा डॉक्टर देईल किंवा आयसीसी सामन्यादरम्यान आपला स्वत:चा डॉक्टर नियुक्त करेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आयसीसीने विश्वचषकातील संघांसोबत वैद्यकीय प्रतिनिधी अनिवार्य केला होता. त्यांनी स्वत:  डॉक्टर उपलब्ध केला होता.

 

विश्वचषकात आमलाला आर्चरचा बाउन्सर लागला होता; ख्वाजालाही लागला चेंडू

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान अनेक खेळाडू रिटायर हर्ट झाले. द. आफ्रिकेच्या हाशिम अामलाच्या डोक्याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा बाउन्सर लागला होता. ताे रिटायर हर्ट झाला आणि पुढील सामना खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाला विंडीजच्या ओशेन थॉमसचा चेंडू डोक्याला लागला होता. 

 

दोन वर्षांपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये राखीवला मान्यता

वर्ष २०१४ नंतर डोक्याला चेंडू लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू फिलिप ह्यूजचा मृत्यू झाल्यावर या प्रकरणाचा गांभीयाने विचार सुरू झाला. त्यानंतर २०१७ मध्ये आयसीसीने प्रायोगिक तत्त्वावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये राखीव खेळाडूचा समावेश करण्याला परवानगी दिली होती.
 

आतापर्यंत डोक्याला चेंडू लागून १३ क्रिकेटपटूंचा मृत्यू
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत १३ खेळाडूंचा डोक्याला चेंडू लागून मृत्यू झाला आहे. २५ नोव्हेंबर २०१४ ला शेफील्ड-शील्ड क्रिकेट स्पर्धेदरम्यान सीन एबोटचा चेंडू फिलिप ह्यूजच्या डोक्यावर लागला होता. मात्र, चेंडू त्याच्या डाव्या कानाजवळ अडकला होता. तो तीन दिवस कोमात होता. २७ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटने देशांतर्गत वनडे स्पर्धा, बिग बॅश लीग व महिला बिग बॅश लीगमध्ये राखीव खेळाडूसाठी परवानगी दिली. भारताच्या रमण लांबाचादेखील फेब्रुवारी १९९८ मध्ये अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. 

 

२०१४ च्या मोठ्या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाने बनवली नवी योजना

> सामन्यादरम्यान कोणता खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास सामना रेफरीला त्याची माहिती दिली जाते. त्यानंतर राखीवला संधी मिळेल.
> खेळाडू जखमी झाल्यास त्याच दिवशी मैदानावर परतू शकणार नाही. त्याची जखम गंभीर स्वरूप घेवू नये यासाठी खबरदारी. 
> डॉक्टरांनी जखमी खेळाडूला खेळण्याची परवानगी दिली नाही तर तो खेळाडू मैदानावर पुन्हा येवू शकणार नाही. 

 

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राखीवची सुरुवात व्हावी’ 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने आयसीसीच्या निर्णयाचे स्वागत केले. त्याने म्हटले की, ऑस्ट्रेलियाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची सुरुवात केली आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटची वेळ आहे. आयसीसीने हा नियम लागू केला पाहिजे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते अावश्यक आहे. जर पहिल्याच षटकात खेळाडू जखमी झाल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाचे मोठे नुकसान होते.

 

अमेरिकेत प्रत्येक वर्षी २० टक्के खेळाडूंना डोक्याला मार लागतो

अमेरिकेत खेळाडूंना डोक्याला प्रत्येक वर्षी २० टक्के खेळाडूंना डोक्याला मार लागतो. येथील चार मोठ्या खेळांत कन्कशन योजना तयार केली आहे. मेजर लीग बेसबॉल, एनबीए, नॅशनल फुटबॉल लीग आणि नॅशनल हॉकी लीगमध्ये ही योजना आहे. एक खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी राखीव खेळाडू खेळतो. फुटबॉलमध्ये ५० ते ८० टक्के दुखापत पायाला व डोक्याला होते. ३५ टक्के फुटबॉलपटूंना निवृत्तीनंतर डोक्याचे आजार होतो.