आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू 4 वर्षांनी तरुण, वॉशिंग्टन विद्यापीठाचे संशोधन, मेंदूतील चयापचय प्रक्रियेवरून फरक स्पष्ट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - "तुम्हाला यातलं काही कळतं नाही हो!' असं जर कोणती महिला तिच्या पतीला म्हणत असेल तर ही नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण अमेरिकेतील एका संशोधनाने या बाबीवर शिक्कामोर्तब केले आहे. वय वाढल्यानंतर स्मरणशक्ती कमी होणे आणि विसरभोळेपणाचा आजार महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असतो. शिवाय महिलांचा मेंदू जैविकदृष्ट्या समवयस्क पुरुषाच्या मेंदूच्या तुलनेत जवळपास ४ वर्षांनी अधिक तरुण असल्याचा निष्कर्ष संशोधनात काढण्यात आला. 

 

वॉशिंग्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ मेडिसिनने यासंदर्भातील संशोधन केले आहे. यात महिला आणि पुरुषांच्या वृद्धावस्थेत अंतर पाहायला मिळत असल्याचे संशोधनकर्त्यांना वाटते. मेंदूतील चयापचयातून हे अंतर स्पष्ट होते. पुरुषांच्या मेंदूचे वय वेगाने वाढते असे म्हणणे चुकीचे ठरेल. महिलांच्या तुलनेत पुरुषांची प्रौढावस्था तीन वर्षांनंतर सुरू होते. हीच स्थिती आयुष्यभर कायम राहत असल्याचे संशोधकांच्या टीमचे प्रमुख डॉ. मनू गोयल म्हणाले. 


वय जसजसे वाढते तसे पुरुषांचा मेंदू महिलांच्या मेंदूच्या तुलनेत वेगाने आकुंचन पावतो ही बाब पूर्वीपासून माहिती होती. पण महिलांच्या मेंदूतील चयापचय प्रक्रियाही वेगळी ठरत असल्याचा नवीन खुलासा या संशोधनातून करण्यात आला आहे. यातून प्रौढावस्थेत पुरुषांची स्मरणशक्ती वेगाने कमी का होते हे समजण्यासाठी मदत मिळते. त्यांच्या बोलण्यातही बदल होत असतो. महिलांचा मेंदू मात्र दीर्घकाळापर्यंत तरुण राहतो. बहुतांशी वेळा आपण लिंग आधारित कारणांमुळे मेंदूवर काय परिणाम होतो याचे निरीक्षण करण्यासह मेंदूला न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजार होण्याचा धोका कसा वाढत आहे, याचा तपासही संशोधनातून केला जात असल्याचे डॉ. गोयल यांनी सांगितले. पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक काळापर्यंत मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम का असतात, याचा उलगडा या संशोधनातून झाला आहे. 

 

मेंदूतील ग्लुकोजच्या वापराआधारे चाचण्या घेऊन काढला निष्कर्ष 
संशोधनात २० ते ८२ वर्षे वयोगटातील २०५ पुरुष व महिलांचे मेंदू स्कॅन करण्यात आले. त्यांच्या वास्तविक वयाची तुलना मेंदूच्या वयाशी केली गेली. यात ग्लुकोज व इंधनाच्या रूपात ऑक्सिजनच्या वापराचा आधार बनवला गेला. वय जसजसे वाढते तसे मेंदू त्याच्या विकासासाठी कमी आणि दैनंदिन काम व मानसिक आव्हाने स्वीकारण्यासाठी अधिक ग्लुकोजचा वापर करतो. कॉम्प्युटर अल्गोरिदममध्ये महिलांचा मेंदू विकासासाठी तुलनात्मकदृष्ट्या अधिक ग्लुकोज वापरत असल्याचे समोर आले. यावरूनच त्यांचा मेंदू अधिक तरुण असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. जैविकदृष्ट्या महिलांच्या मेंदूचे वय पुरुषांच्या मेंदूच्या तुलनेत ३.८ वर्षांपर्यंत कमी आढळून आले. 

बातम्या आणखी आहेत...