आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Coregaon Bhima, So Many People Came To Greeting Vijayanthbha In The Discipline

कोरेगाव भीमामध्ये उसळला जनसागर, लाखो अनुयायांचे शिस्तीत विजयस्तंभाला अभिवादन, परिसराला यात्रेचे स्वरूप, तरुणाईने केला जागर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिसर फुलला : स्तंभ परिसरात विविध वस्तूंची दुकाने, खेळणी, खाद्य पदार्थ, बाबासाहेबांचे फोटो, मूर्ती आणि सोबतच इन्स्टंट फोटोची व्यवस्था होती. तिथे भीमसैनिक रमत होते. - Divya Marathi
परिसर फुलला : स्तंभ परिसरात विविध वस्तूंची दुकाने, खेळणी, खाद्य पदार्थ, बाबासाहेबांचे फोटो, मूर्ती आणि सोबतच इन्स्टंट फोटोची व्यवस्था होती. तिथे भीमसैनिक रमत होते.

कोरेगाव भीमा : महाराष्ट्रासह तसेच इतर राज्यांतून आलेल्या लाखो अनुयायांनी बुधवारी कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन केले. ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वाजता सुरू झालेला हा सोहळा १ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत सुरू होता. लाखो आंबेडकरी जनता मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाली होती.

पेरणे फाट्यावर कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या परिसरात दोन दिवसांपासून अनुयायी जमा होत होते. पोलिस आणि प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात करत सुमारे १० किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतला होता. विविध मार्गावरून येणारी वाहने विशिष्ट अंतरावर थांबवून तेथून स्तंभापर्यंत जाण्यासाठी सिटी बसची व्यवस्था केली होती. परिसरातील संपूर्ण वाहतूक तसेच शाळा कॉलेज आणि इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. स्तंभ परिसर आणि बाजूने येणारे रस्ते येणाऱ्या भीमसैनिक आणि अनुयायांच्या जत्थ्याने भरलेले होते. यात आबालवृद्ध तसेच तरुण मंडळींचाही मोठा सहभाग होता. अनेक संघटनांनी अनुयायांच्या भोजन तसेच इतर सुविधांची व्यवस्था केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार, अॅड. प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, सुदामकाका पवार, राजाभाऊ सरोदे, रमेश बागवे, रवींद्र कांबळे, विवेक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजयस्तंभास अभिवादन केले.

रात्रीच सुरू झाले अभिवादन

मंगळवारी रात्री १० वाजेपासूनच स्तंभ परिसरात ढोल पथक तसेच अनुयायांनी शिस्तीत नियोजन केले. त्याप्रमाणे बाराच्या सुमारास ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली. भिक्खू संघटनेच्या प्रमुखांनी अभिवादन केले. सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. नंतर समता सैनिक दलाने मानवंदना दिली. प्रवचनकार प्रा. दि. वा. बागूल यांनी भूमिका मांडली.

आंबेडकरवादी तरुणांची स्वच्छता माेहीम

४ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर 'अाम्ही अांबेडकरवादी' या ग्रुपमधून एकत्र आपलेल्या तरुणांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. गौरव खैरे म्हणाला, 'इतर यंत्रणांना आम्ही त्यांच्या कामात मदत केली एवढंच.' ४ वर्षांपूर्वी ग्रुपने चैैत्यभूमी, चवदार तळे, कोरेगाव भीमा येथे स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली होती.

विजयस्तंभाजवळ तरुणाईचे पुस्तक वाचन

विजयस्तंभाजवळ अांबेडकरवादी तरुणाईने पुस्तकांचे वाचन केले. 'या जागरूक तरुणाईच्या बॅगमध्ये आता संविधान सापडते,' असे मत वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारक व संशोधक तृतीयपंंथी शमिभा पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी स्वत: ५ ते ७ हजार रुपयांची पुस्तके विकत घेतली. त्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवी ग्रेस यांच्या कवितांवर पीएचडी करताहेत. तसेच ३ वर्षांपासून कोरेगावात पुस्तकांचा स्टाॅल लावतात. ३,४९० रुपयांत मिळणारा भीमराव रामजी आंबेडकर चरित्रखंड येथे अवघ्या ५३४ रुपयांत मिळाल्याचा आनंद त्या व्यक्त करत होत्या. 'लहानपणापासून माझ्यात काही वेगळे असल्याचे जाणवत होते. पण कोणाला बोलण्याची हिंमत नाही झाली. मात्र, तृतीयपंथीबाबतच्या चळवळी वाढल्या. त्यातून विश्वास आला. २ वर्षांपूर्वी तृतीयपंथी असल्याचे जाहीर करून टाकले. यानंतर मात्र मन पूर्णपणे अभ्यासात रमवले,' असे त्या म्हणाल्या.

परिसराला यात्रेचे स्वरूप, तरुणाईने केला जागर

पोलिस व प्रशासनाने परिसर ताब्यात घेतला असला तरी अनुयायांना कोणतीही अडचण उद््भवली नाही. सर्वांना सिटी बसने पोहोचवण्यात येत होते. चालत जाण्याच्या मार्गांवर पाणी बॉटल, खाण्याचे पदार्थ उपलब्ध होते. या उपक्रमात आबालवृद्धांसह तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध ग्रुप स्वच्छता, गायन, वादन प्रकारात गुंतलेले दिसत होते.

बाबासाहेबांचे तिन्ही नातू उपस्थित

विजयस्तंभाला अभिवादन करत शौर्याची प्रेरणा घेऊन जाण्याच्या कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव, प्रकाश, आणि आनंदराज आंबेडकर हे तिघेही उपस्थित होते. त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. प्रकाश व आनंदराज आंबेडकर यांनी आपापल्या संघटनांच्या मेळाव्यांचे आयोजन केले होते.

राज्यभरातून एकत्र आले तरुण

कोरेगाव भीमा येथे या ग्रुपचे ७० सदस्य मंगळवारी पोहोचले. यात ७ मुलींसह पुण्याचा नागेश गावंडे, मुंबईचा गौरव खैरे, औरंगाबादचा साई सुरडकर, पुण्यातील संघमित्रा चंदनशिवे, मुंबईचा सिद्धार्थ जोंधळे, नाशिकचा सनी निकम, पुण्यातील अपेक्षा गायकवाड, बुद्धभूषण शिंदे यांचा समावेश आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...