आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंदियात 57 वर्षांत 12 निवडणुका, मात्र एकदाही कमळ फुलले नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया : १९६२ ते २०१४ पर्यंत गोंदिया विधानसभेच्या १२ निवडणुका झाल्या, पण येथे कधीही भाजपचे कमळ फुलले नाही. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मुंबईहून नागपूर गाठले अन् काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांना भाजप प्रवेश दिला. पण भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनीच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 'दंड' थोपटले. तंबी देऊनही विनोद अग्रवाल यांनी बंड कायम ठेवल्यामुळे दोन्ही अग्रवाल यांच्यातच येथे अटीतटीची लढत होण्याची चिन्हे अाहेत.

मध्यप्रदेश, छत्तीसगढ यांच्या सीमारेषेवर असलेला पूर्व महाराष्ट्रातील शेवटचा मतदारसंघ म्हणून गोंदियाचा उल्लेख करावा लागेल. शिवाय माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे निवास येथेच अाहे. विदर्भ बिडी, मनोहर बिडीसारखे त्यांचे उद्योग याच गोंदिया मतदारसंघात अाहेत. त्यांची येथे पकड नसली तरी पटेल यांचा लोकसभा मतदारसंघ म्हणून देशात गोंदियाची चर्चा असते. सध्या भाजपचे सुनील मेंढे खासदार अाहेत. मनोहर पटेल यांच्या पार्श्वभूमीतूनच प्रफुल्ल पटेल यांचा येथे राजकीय उदय झाला अाहे.

१० वर्षांचा अपवाद वगळता ४७ वर्षे काँग्रेसचीच सत्ता
१९९५ अाणि १९९९ या मध्ये सेनेच्या रमेश कुथे जिंकले. हा अपवाद वगलता ४७ वर्ष येथे काँग्रेसनेच विजय मिळवला अाहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात अाहेत. गोंदिया वगळता सहापैकी पाच विधानसभेवरही भाजपचेच अामदार अाहेत. यंदा येथे 'कमळ' फुलवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या विद्यमान अामदारालाच भाजपमध्ये घेतले.

अग्रवालांना सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची आहे 'मदत'
विनोद अग्रवाल यांच्या वडिलांनी जनसंघात काम केले होते. शिवाय ते स्वत:ही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. पण त्यांना तिकीट नाकारल्यामुळे अाता त्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली अाहे. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अाणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांची मदत मिळते अाहे. विशेष म्हणजे, दोन वेळा विधान परिषद अाणि तीन वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे गोपालदास प्रस्थापित झाले अाहेत. मतदारांमध्ये भाजपचे उमेदवार अग्रवाल यांच्याविषयी नाराजीचा सूर दिसून अाला. वंचित बहुजन अाघाडी अाणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांचा मात्र मतदारांवर फारसा प्रभाव नसल्याचे निदर्शनास अाले अाहे.

असा आहे गोंदिया मतदारसंघ
४ लाख २१ हजार ६५०

गोंदिया विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या
३ लाख २१ हजार २९९ मतदारांची संख्या
१ लाख ५७ हजार ३८९ पुरूष
१ लाख ६३ हजार ९१० महिला

जातीय समीकरणे
पोवार : ७५ हजार
कुणबी : ६६ हजार
अनुसूचीत जाती ५५ हजार
कलार : २० हजार
तेली : ८ हजार
मुस्लिम : १४ हजार
अादिवासी १८ हजार
लोधी : १८ हजार
जैन, मारवाडी, गुजराती, पंजाबी, बंगाली, माहेश्वरी अादी : ३५ हजार

गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी बंड केले. यंदा विजय मिळेल अन् पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना कमळ फुलवून दाखवू, अशी स्थिती विनोद अग्रवाल यांनी निर्माण केली होती. पण गोपालदासांच्या प्रवेशामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांसमोरच अाव्हान उभे केले अाहे. येथे काँग्रेसने अमर वराडे यांना उमेदवारी दिली अाहे. पण खरी लढत दोन्ही अग्रवाल यांच्यातच आहे.

मनोहर पटेल पहिले अामदार, तब्बल ४७ वर्षे अल्पसंख्यांकालाच कौल
माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल गोंदिया मतदारसंघाचे पहिले अामदार होते. दोन निवडणुकांचा अपवाद वगळता येथील मतदारांनी कायम अल्पसंख्याक उमेदवारांनाच कौल दिला अाहे. पहिल्यांदाच कुणबी समाजाचे रमेश कुथंेंनी (१९९५) काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. पुढे मतदारांनी पुन्हा त्यांनाच (१९९९) कौल दिला. दहा वर्ष सेनेकडे राहिलेला मतदारसंघ काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी पुन्हा २००४ मध्ये खेचून अाणला होता. पुढे २००९, २०१४ असे सलग तीन वेळा ते अामदार होते.