भेंडवळचे भाकीत / जूनमध्ये साधारण, जुलैत चांगला पाऊस, पिके सर्वसाधारण, संरक्षण खाते मजबूत - प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीचे भाकीत

करडीचा दाणा आत असल्याने परकीयांची घुसखोरी राहणार असून संरक्षण खाते मजबूत राहणार आहे.

दिव्य मराठी

May 09,2019 08:51:00 AM IST

जळगाव जामोद - साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ बुद्रुक येथील प्रसिद्ध घट मांडणीचे भाकीत बुधवारी कथन करण्यात आले. त्यानुसार, राजाची गादी यंदा कायम राहील, पण राजकीय अस्थिरतेत कलह किंवा घोडेबाजारही संभवतो, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

यंदा जूनमध्ये साधारणु तर जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. तसेच पिके सर्वसाधारण राहतील, ज्वारी, बाजरी व तुरीचे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे. घट मांडणीत राष्ट्रीय मुद्द्यांवरही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यानुसार, देशाची आर्थिक स्थिती डबघाईस येणार असून संरक्षण खाते मजबूत राहणार आहे. बुधवारी सकाळी ५.३० वाजता चंद्रभान महाराजांचे १५ वे वंशज पुंजाजी रामदास वाघ यांनी हे भाकित कथन केले. या वेळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

अशी केली जाते घट मांडणी
अक्षय तृतीयेला संध्याकाळी बसस्थानकाच्या बाजूच्या शेतात परंपरेप्रमाणे ही घट मांडणी करण्यात आली होती. ७ फूट गोलाकार वर्तुळ तयार करण्यात आले. मध्यभागी सव्वा हात रुंद व सव्वा हात खोल खड्डा तयार करण्यात आला.

या खड्ड्याच्या विशिष्ट अंतरावर अंबाडी, सरकी, ज्वारी, तूर, मुंग, उडीद, तिळ, भादली, बाजरी, मठ, साळी, जवस, लाख, वटाणा, गहू हरभरा, करडी व मसूर अशी एकूण १८ धान्ये ठेवण्यात आली होती. खड्ड्यात ४ ढेकळांवर घागर, त्यावर सांडगे, कुरडया, पापड, वडा, भजा, करंजी ठेवली होती. त्या खाली विड्याची पाने, एक नाणे व त्यावर लाल सुपारी अशी मांडणी केली होती. घटाजवळ रात्री कुणालाही थांबू दिले जात नाही.


राजकारण :
घट मांडणीत विड्याची पाने ही गादी समजली जाते. लाल सुपारी ही राजाचे प्रतीक मानतात. पानावर माती नसल्यामुळे राजाची गादी कायम आहे. परंतु नाण्यावरून सुपारी बाजूला सरकलेली दिसली. पुंजाजी महाराजांनी याचे स्पष्टीकरण न देता ते गुपित ठेवले. परंतु जाणकारांच्या मते, हे राजाला कलह वा राजकीय अस्थिरतेत घोडेबाजार होण्याची भीती वर्तवणारे संकेत आहेत.


पावसाचा अंदाज :

जूनमध्ये साधारण, तर जुलैत पाऊस चांगला व सार्वत्रिक राहणार आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी जास्त राहून तो लहरी स्वरूपाचा राहणार आहे. सप्टेंबर महिनाही तसाच राहणार आहे. तसेच यंदा चारापाण्याची टंचाई राहणार आहे.

आरोग्य :

अंबाडी हे कुल दैवताचे प्रतीक असल्याने ते कायम आहे. साथ रोग पसरण्याची भीती नाही.
संरक्षण : करडीचा दाणा आत असल्याने परकीयांची घुसखोरी कायम राहील. संरक्षण खाते मजबूत राहील.

नैसर्गिक आपत्ती : घागरीवरील पाणी शिल्लक राहिल्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुरी हे पृथ्वीचे प्रतीक मानले जाते. परंतु ही पुरी घटातून गायब झाल्याने नैसर्गिक आपत्ती येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

X