बेकायदेशीर जमीन खरेदी / खडसे प्रकरणात त्रयस्थ अर्जदाराचा अर्ज न्यायालयाकडून मंजूर, दमानिया यांनी केली होती तक्रार

दीड वर्षापासून याबाबत केवळ तारखा पडल्या

प्रतिनिधी

Dec 13,2019 10:08:51 AM IST

पुणे : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी येथील बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात त्रयस्थ अर्जदाराचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) याप्रकरणात खडसे यांना क्लीन चिट दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत पुणे सत्र न्यायालयात दीड वर्षापूर्वी अर्ज दाखल केला होता. विशेष सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने संबंधित अर्ज मंजूर केला आहे.


अॅड. सरोदे याबाबत म्हणाले, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करत भोसरी येथील जमीन पत्नी आणि जावई यांच्या नावे विकत घेतली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार एकाच दिवसात झाला. याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहे. खडसे यांच्याविरोधात पुरावे असतानाही त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कशा प्रकारे क्लीन चिट दिली आहे ही बाब पुराव्यानिशी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.


या प्रकरणात आमचीही बाजू न्यायालयाने सुनावणीत ऐकून घ्यावी, अशी मागणी केली होती. परंतु दीड वर्षापासून याबाबत केवळ तारखा पडल्या असून न्यायाधीशांच्या बदल्या होऊनही आमचा अर्ज मान्य करण्यात आला नव्हता. न्यायालयाने आमचा अर्ज व एसीबीने कशा प्रकारे खडसे यांना क्लीन चिट दिली याची कागदपत्रे पाहत अर्ज मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जानेवारी रोजी होणार आहे.

X
COMMENT