आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर, निलंग्यात अख्खी कुटुंबे रंगलीय प्रचारात; महिलांनीही ओलांडला उंबरठा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - गेल्या काही वीस वर्षांपूर्वी निलंगेकर कुटुंबीयांतील वाद चव्हाट्यावर आले आणि पुढे त्याचे राजकीय वैमनस्यात रूपांतर झाले. तेंव्हापासून निलंग्यातील विधानसभेची निवडणूक म्हटली की एकतर आजोबा विरुद्ध नातू  किंवा काका विरूद्ध पुतण्या अशी रंगली आहे. या वेळेसच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंच्या महिलाही प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघावर प्रारंभापासून पकड ठेवली आहे. १९९५ साली कॉ. माणिक जाधव यांनी त्यांचा पहिल्यांदा पराभव केला. त्यानंतर १९९९ साली शिवाजीराव पाटील पुन्हा आमदार झाले. परंतु तोपर्यंत त्यांच्या घरात कलह निर्माण झाला होता. त्यांचे मोठे चिरंजीव दिलीपराव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रूपाताई आपल्या संभाजी आणि अरविंद या मुलांसह वेगळ्या राहू लागल्या. पुढे रूपाताई आणि संभाजी यांनी भाजपची वाट धरली. २००४ च्या निवडणुकीत रूपाताईंनी शिवराज पाटील चाकूरकरांचा ऐतिहासिक पराभव करून दाखवला. त्यांच्या माध्यमातून निलंगेकरांच्या कुटुंबातील एखादी महिला पहिल्यांदाच सार्वजनिक जीवनात दिसल्या. त्यानंतर पुढच्या विधानसभा निवडणुकीत संभाजी निलंगेकरांनी आपले आजोबा शिवाजीरावांना अस्मान दाखवले. २००९ साली शिवाजीरावांनी पुनरागमन केले. परंतु वयोमानामुळे २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी चिरंजीव अशोक पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. या वेळी संभाजी पाटील यांनी काकांचा पराभव करीत आमदारकी मिळवली आणि पुढे लातूरचे पालकमंत्रीही झाले.  यावेळेसच्या निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरांनी एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी होण्याचा संकल्प केला असून त्यासाठी त्यांचे अख्खे कुटुंब कामाला लागले आहे. संभाजी यांच्या आई माजी खासदार रूपाताई वयोमानानुसार फारशा फिरत नसल्या तरी आवश्यक त्या ठिकाणी जाणे आणि एरवी मोबाइलवरून संपर्क करण्याची बाजू सांभाळतात. तर संभाजी यांच्या पत्नी प्रेरणा निलंगेकर यांनी मतदारसंघातील महिलांच्या बैठका घेण्याचा धडाका लावला आहे.  हे पाहून काँग्रेसचे उमेदवार तथा संभाजी यांचे काका अशोक पाटील निलंगेकर यांनी आपली कन्या समृद्धीवर महिलांमध्ये प्रचार करण्याची धुरा सोपवली आहे. मतदानाचा पहिलाच हक्क बजावणाऱ्या समृद्धी यांनी महिलांच्या बैठकांतून जोरदार भाषणांना सुरूवात केली आहे. अशोक पाटील यांच्या पत्नी, तसेच बंधू शरद यांच्या पत्नी डॉ. सुरेखा निलंगेकरही बैठका घेत आहेत. त्यामुळे निलंगेकरांचे अख्खे कुटुंबच प्रचारात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
 

देशमुख कुटुंबही प्रचारात मग्न
दरम्यान, लातूरच्या देशमुख कुटुंबातील दोन मुले निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे कुटुंबासाठी दोघांचाही विजय हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. अर्ज दाखल करण्यासाठीच्या पहिल्याच रॅलीत अख्खा देशमुख परिवारच सामील झाला होता. त्यामध्ये विलासरावांच्या पत्नी वैशालीताई, अमित-आदिती, रितेश-जेनिलिया, धीरज-दीपशिखा यांच्यासह अमित देशमुखांची मुलेही  मंचावर होती. तसेच काका दिलीपराव देशमुखांचीही उपस्थिती होती. प्रचारादरम्यानही वैशालीताई देशमुखही महिलांच्या बैठका घेत आहेत.