आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज तारांच्या घर्षणाने कुंभेजमध्ये तीन तर मुरुम शिवारात २० एकर ऊस खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा- ऐन दुष्काळात तालुक्यातील कुंभेजा येथील शेतकरी किरण कोकाटे यांच्या शेतातील तीन एकर ऊस विद्युत तारेच्या घर्षणाने ठिणग्या पडून जळाला असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी घडली. सदर घटनेचा महसूलच्या वतीने पंचनामा करण्यात आला.


तालुक्यातील कुंभेजा शिवारातील किरण कोकाटे यांच्या मालकीच्या गट नं.१७५/२ मधील अंदाजे तीन एकर क्षेत्रातील ऊस व ठिबक सिंचन संच शेतातातून गेलेल्या विद्युत तारेच्या घर्षणाने ठिणग्या पडून जळून खाक झाला. त्यामुळे २ लाख ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. सदरील घटनेची माहिती महसूल विभागाला दिली. त्यानंतर तहसीलदारांच्या सूचनेनुसार तलाठी व कर्मचारी आदीनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुष्काळी परिस्थितीत ऊस जोपासला होता, तोडणीला आलेला ऊस जळाल्याने सदरील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे. तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून पाणी टंचाई असताना शेतकऱ्यांनी ऊस जोपासला. परंतु, शेवटच्या टप्प्यात ऊसाला पाणीच मिळाले नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे ऊस वाळून गेले आहेत. त्यामुळे वजन कमी भरत असल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. तसेच वेळेत ऊस घेऊन जाण्यासाठी परिसरातील विविध कारखान्यावर हेलपाटे मारावे लागत आहेत. अशातच विद्युत तारेच्या घर्षणाने ऊस जळून खाक होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

 

पाच शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याने मोठा आर्थिक फटका
विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणगी पडून लागलेल्या आगीत मुरूम येथील पाच शेतकऱ्याचा २० एकर ऊस जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी (दि. २७) दुपारी घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे जवळपास सोळा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

मुरुम येथील निसार मदारसे, रुकियाबी मदारसे, हनुमंत शेळके, गणेश शेळके, सुनीता व्हलदुरे यांची मुरुम महसूल मंडळात असलेल्या आचारी तांडा शिवारात शेतजमीन आहे. येथील ऊस पिकांतून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणगी उडून गुरुवारी (दि.२७) दुपारी ऊसाला अचानक आग लागली. यात निसार मदारसे यांचे साडेतीन एकर, रुकियाबी मदारसे यांचे साडेतीन एकर, हनुमंत शेळके यांचे आठ एकर, गणेश शेळके यांचे चार एकर तर सुनीता व्हलदुरे यांच्या शेतातील दोन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात चौघांचे मिळून जवळपास १५ ते १६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मुरूम पालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. परंतु, चालक नसल्याने उपयोग झाला नाही. तलाठी युवराज पवार यांनी पंचनामा केला.

 

बातम्या आणखी आहेत...