आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडला व्यापाऱ्यांवर गोळीबार करणारे दोघे अटकेत, आरोपींत एक कुस्तीपटू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- शहरात दोन व्यापाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यातील एक आरोपी राज्यस्तरीय कुस्तीपटू आहे. या दोघांनी  महिनाभरापूर्वी तांडा बारचे मालक सुरेश राठोड आणि तीन दिवसांपूर्वी आशिष पाटणी यांच्या पायावर गोळ्या झाडल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय अटकेतील दोघेही आरोपी रिंधा या आंतरराज्यीय कुख्यात गुंडासाठी काम करीत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  


शहरात १ नोव्हेंबर रोजी तांडा बारचे मालक सुरेश राठोड यांच्यावर हिंगोली गेट परिसरात रात्रीच्या सुमाराला गोळीबार झाला. त्यांच्या पायावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर या महिन्यात ४ तारखेला हार्डवेअरचे व्यापारी आशिष पाटणी यांच्यावर रात्री साडेनऊच्या सुमाराला वर्दळीच्या बालाजी मंदिरासमोर गोळीबार करण्यात आला. त्यांच्याही पायावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे शहरात दहशत निर्माण झाली. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह लागले. सर्व बाजूंनी दबाव आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला.

 

शेतात लपून बसले होते आरोपी  

पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले की, त्रिकूट या गावी नदीच्या काठावरील एका शेतात प्रेमसिंह विठ्ठलसिंह सपुरे (२४) आणि मुक्तेश्वर विजय मंगनाळे (२१)  हे दोघे वास्तव्याला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री या शेतात जाऊन या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून स्प्लेंडर आणि पल्सर या दोन मोटारसायकली जप्त केल्या. या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचा अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पोलिसांनी अटक केलेला मुक्तेश्वर मंगनाळे हा कुस्तीपटू असून तो राज्यस्तरावर कुस्ती स्पर्धेत खेळला आहे.

 

आरोपींना १० डिसेंबरपर्यंत कोठडी :

अटक केलेल्या प्रेमसिंह सपुरे आणि मुक्तेश्वर मंगनाळे या आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणात अजून तपास सुरू असून सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. माध्यमांनी आरोपींना फायदा होईल असे अनधिकृत वृत्त प्रकाशित करू नये, असे आवाहनही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले. दरम्यान,  आरोपींच्या अटकेने व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला असला तरी त्यांच्यात रिंधाची दशहत कायम आहे.

 

हल्ल्याचा सूत्रधार रिंधाच 

दोन्ही गोळीबारांचा सूत्रधार कुख्यात गुंड हरविंदरसिंग ऊर्फ रिंधा हाच असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. शहरातील व्यापाऱ्यांना अगोदर खंडणीसाठी फोन करणे, खंडणी दिली नाही की दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करणे ही रिंधाची कार्यपद्धती आहे. सुरेश राठोड यांना त्याने ५० लाखाची खंडणी मागितली होती. आशिष पाटणी यांनाही खंडणीचा फोन आला होता. रिंधा आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्याच्या नावावर उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब, गोवा आणि महाराष्ट्रात २७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेसाठी इतर राज्यांत विशेष तपास पथके नेमण्यात आली आहेत. रिंधा हा  तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करतो, असेही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले.  

 

बातम्या आणखी आहेत...