आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ निवारणासाठी 8 महिन्यांत पुढच्या तीन वर्षांची कामे करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यात यंदा दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आगामी तीन वर्षांत करण्यात येणारी कामे पुढच्या आठ महिन्यांत करण्यात येणार आहेत. आतापर्यंत ३० हजार शेततळी झाली असून आणखी ३५ हजार शेततळी अस्तरीकरणासह बनवण्यात येतील, असा दावा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केला. 


जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी टंचाईचा आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, महसूल उपायुक्त रवींद्र टाकसाळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, उपजिल्हाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना भापकर म्हणाले, दरवर्षी शेतात पिके असल्यामुळे मार्चपर्यंत कामे करणे शक्य होत नाही.

 

मात्र आता आठ महिने काम करण्यासाठी वेळ आहे. आगामी तीन वर्षांची कामे करता येईल इतका वेळ प्रशासनाच्या हाती आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दहा हजार शेततळी झाली असून, आगामी काळात आणखी दहा हजार शेततळी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी ७५ हजार रुपयांचे अनुदान शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी देण्यात येणार आहे. एका कृषी सहायकांनी २० शेततळी आपल्या भागात करावीत. जनावरांच्या चारा व पाण्याच्या प्रश्न तातडीने सोडवण्यात येईल, असे भापकर म्हणाले. अधिकारी-कर्मचाऱ्यांना जास्तीची कामे करावी लागणार. टंचाई आढावा बैठकीत बोलताना पुरुषोत्तम भापकर. सोबत उदय चौधरी, पवनीत कौर, वर्षा ठाकूर आदी.

 
जिल्हानिहाय बैैठका घेणार 
मराठवाड्यातील ४७ तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. औरंगाबादनंतर उर्वरित सर्व जिल्ह्यात टंचाई आढावा बैठक घेण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी समजावून घेत त्यांना मदत करणे, पाण्याचे नियोजन, रोहयोच्या कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. तसेच अधिकाऱ्यांना जास्त काम करण्यास सांगण्यात आले असून कामचुकारपणा केल्यास कारवाई करण्याचा इशाराही भापकर यांनी दिला आहे. रोहयोत वैयक्तिक कामे देणार.

 
रोहयोच्या माध्यमातून मजुरांना काम मिळावे यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. वैयक्तिक लाभाच्या जास्तीत जास्त योजना कशा मिळतील, शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात काम कसे करता येईल याची चाचपणी करण्यात येत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि अकरा कलमी रोहयोच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...