आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वर्षांतील नीचांकी तापमान, दवबिंदूही थिजले; निफाडमध्ये 1.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे गुरुवारी निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथे राज्यातील सर्वात नीचांकी १.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. तालुक्यात गेल्या ६ वर्षांनंतरचे हे नीचांकी तापमान आहे. नाशिक शहरातही यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.६ अंशांची नोंद झाली. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारीत नीचांकी तापमानाची नोंद होते. यंदा ती डिसेंबरमध्येच झाली.


विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे निफाड महाबळेश्वरपेक्षा थंड
निफाडच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे हिवाळ्यात ते महाबळेश्वरपेक्षा थंड होते, असे मत ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे आणि डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, हिवाळ्यात उत्तर व वायव्य दिशेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांच्या प्रवाहाच्या मार्गावर निफाड येते. छोट्या छोट्या टेकड्यांच्या मध्ये सखल भागात निफाड वसले आहे. त्यामुळे या टेकड्यांवरील थंड हवा सखल भागात जमा होते. हिवाळ्यात उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, थंड वाऱ्यांमुळे या परिणामाची तीव्रता वाढते. आकाश जेवढे निरभ्र तेवढे जमिनीतले उष्णतेचे उत्सर्जन अधिक. निफाडभोवतीच्या टेकड्यांवरील उष्णतेचे उत्सर्जन झाल्यानंतर निर्माण झालेली थंड हवा सखल भागाकडे येते व पारा घसरतो. 

 

निफाड परिसरातील खडकमाळगावचा पारा एका दिवसात ९.४ अंशांनी घसरला
उत्तर भारतात तीव्र शीत लहर निर्माण झाली आहे. या भागातून सध्या पश्चिमेकडे वारे वाहत असल्याने राज्यातील किमान आणि कमाल तापमानात घसरण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात धरणे मोठ्या प्रमाणात असल्याने येथील आर्द्रता तापमान कमी करण्यासाठी मदत करत असल्याने किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. निफाड परिसरातील खडकमाळेगाव येथे एक दिवसापूर्वी बुधवारी किमान तापमान हे १.७ अंश सेल्सियस होते. उत्तरेकडील शीत लहरीमुळे किमान तापमानात थेट ९ अंश सेल्सियसची घट होऊन ते १.३ अंशांपर्यंत घसरले.

 

निफाड तालुक्यात सध्या पालखेड डावा कालवा, कादवा नदी आणि नांदूर-मधमेश्वर या ठिकाणी पाणी असल्याने या परिसरात राज्यातील नीचांकी तापमानाची म्हणजे १.३ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. बुधवारी रात्रीपासूनच थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दवबिंदू जमा होऊन ते गोठले होते. सारोळे, रानवड, नांदुर्डी, कुंदेवाडी, खडकमाळेगाव, सावरगाव या गावांमध्ये द्राक्षबागेच्या शेंड्यांचे नुकसान झाले आहे.

उत्तरेकडून शीत लहर मध्य प्रदेश, उत्तर राजस्थान आणि उत्तर महाराष्ट्राकडे येत असल्याने किमान तापमानात घट झाली आहे., अशी माहिती भोपाळ हवामान विभागाचे माजी संचालक डाॅ. डी. पी. दुबे यांनी दिली. पाण्याचे क्षेत्र असलेल्या परिसरात आर्द्रता निर्माण होते. आर्द्रता तापमान कमी करण्यासाठी अप्रत्यक्ष मदत करत असल्याने तापमानात घट होत असते. तो प्रकार निफाड तालुक्यातील काही गावांबाबत दिसून येतो, असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर सांगतात.

 

का गोठतात दवबिंदू?
हवेमध्ये आर्द्रता निर्माण झाल्यानंतर ते दवबिंदूच्या रूपाने जमिनीवर येते. दवबिंदूमधील तापमान हे पाण्यापेक्षा कमी असते. त्यामुळे पाण्यापेक्षाही कमी तापमानात, प्रचंड थंडीमुळे दवबिंदू गोठले जातात.

 

..तर द्राक्षाचा हंगाम लांबणीवर पडू शकेल
असे नीचांकी तापमान राहिल्यास द्राक्ष हंगाम लांबणीवर पडणार आहे. मात्र, यापेक्षा तापमानात घट झाली तर द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. निफाड तालुक्यात १९७२, १९९० मध्येही तापमानात मोठी घट झाली होती, असे द्राक्ष उत्पादक जगन्नाथ खापरे यांनी सांगितले.

तज्ज्ञ सांगतात : टेकड्यांवरून वाहणाऱ्या थंड हवेच्या माऱ्यामुळे सखल भागात वसलेले निफाड शहर गारठते


निफाडला (जि. नाशिक) लाभलेल्या भौगोलिक स्थितीमुळे 'नाशिक जिल्ह्यातले सर्वात थंड ठिकाण' ही निफाडची ओळख कायम टिकून राहणार आहे. उत्तरेकडून वाहून येणाऱ्या शीत, कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राचा पारा सरासरीपेक्षा घसरतो. थंडीचा सर्वाधिक प्रकोप राज्यात खान्देश आणि नगर जिल्ह्यात आढळतो. त्यातही निफाड हे सर्वात थंड असते. गुरुवारी या शहराचे किमान तापमान १.७ एवढे राज्यात सर्वात नीचांकी नाेंदले गेल्याची कृषी खात्याची नाेंद अाहे.

 

नाशिक, नगर जिल्ह्यांमधल्या अनेक गावांच्या तुलनेत 'निफाड'चे तापमान नेहमीच २ ते ३ अंशांनी कमी असते. निफाडपासून गाडीवाटेने जेमतेम तासाभराच्या अंतरावर म्हणजेच ४० किलोमीटरवरचे नाशिकदेखील निफाडच्या तुलनेत जरा अधिकच उबदार असते. यामुळे नीचांकी तापमानाच्या बाबतीत निफाड हे महाराष्ट्राचे 'काश्मीर' बनू पाहते आहे.

 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रिऑलॉजीतून निवृत्त झालेले ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले, 'राज्यात जेव्हा जेव्हा थंडीची लाट येते तेव्हा निफाड परिसरातले तापमान सर्वात घसरते. निफाड हे समुद्रसपाटीपासून ५५१ मीटर उंचीवर वसलेले आहे. नाशिकची समुद्रसपाटीपासूनची उंची ५८४ मीटर आहे. नाशिकच्या तुलनेत निफाडची उंची ३३ मीटरने म्हणजेच सुमारे शंभर फुटांनी कमी आहे. नाशिक, सिन्नर, चांदवड आदी गावांपासून निफाड नेहमीच जास्त गारठण्याचे मुख्य कारण हा उंचीतला फरका आहे. 'निफाडच्या अवतीभोवती कमी उंचीच्या टेकड्या आहेत. आसपासच्या भागापेक्षा खोलात वसलेले आणि आजूबाजूने टेकड्या असा निफाडचा भूगोल आहे. त्यामुळे थंडीची लाट आल्यानंतर आसपासच्या टेकड्यांवरील थंड हवा निफाडच्या सखल भागात एकत्रित होऊन त्याचा एकत्रित परिणाम म्हणून निफाड आसपासच्या भागापेक्षा अधिक गार पडते', असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

 

उष्णतेचे उत्सर्जन झाल्यानंतरची थंड हवा हाेते एकत्रित
'रात्रीच्या वेळी जमीन उष्णतेचे उत्सर्जन करत असल्याने रात्री जमिनीवरचे तापमान कमी होते. हिवाळ्यात उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, थंड वाऱ्यांमुळे या परिणामाची तीव्रता वाढते. आभाळ जितके निरभ्र तेवढे जमिनीतले उष्णतेचे उत्सर्जन अधिक. निफाडभोवतीच्या टेकड्यांवरील उष्णतेचे उत्सर्जन झाल्यानंतर निर्माण झालेली थंड हवा सखल भागाकडे वाहू लागते आणि ती निफाड परिसरात एकत्रित होते. त्यामुळे निफाडचे तापमान नीचांकी असते,' अशी माहिती डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली.

 

एका दिवसात पारा ९.४ अंशांनी घसरला  
खडकमाळेगाव येथे बुधवारी किमान तापमान हे १०.७ अंश सेल्सियस होते. गुरुवारी पहाटे किमान तापमानात ९.४ अंशांची घट होऊन ते १.३ अंशांवर आले.

 

२९ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट  
वेधशाळेनुसार उत्तर व  मध्य महाराष्ट्रात २८ व २९ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहील.

 

गव्हाला फायदा, द्राक्षाचे नुकसान
गहू व हरभरा पिकांसाठी थंडी उपयुक्त असल्याचे कृषिवेत्ता डाॅ. कल्याण देवळाणकर यांनी सांगितले. थंडीचा द्राक्षाला फटका बसेल. द्राक्षमण्यांची फुगवण थांबेल. साखरेचे प्रमाण कमी होईल.

 

नुकसान टाळण्यासाठी हे करावे
जमिनीतील ऊब कायम ठेवण्यासाठी द्राक्षबागेमध्ये  पाणी द्यावे. वेलीजवळ आच्छादन करावे. बागेत शेकोटी करून ऊब निर्माण करावी.

 

बातम्या आणखी आहेत...