आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पंढरीत मुख्यमंत्र्यांना उरकावी लागेल ८० मिनिटांत पूजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - वारकरी संप्रदायातील कुंभमेळा समजला जाणारा आषाढी एकादशीचा सोहळा १२ जुलै रोजी होत आहे. लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होऊन सावळ्या विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी २५ ते ३० तास ऊन, वारा, पाऊस अंगावर घेत रांगेत उभे असतात. त्याच वेळी मंदिरात मात्र अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकडून महापूजा आणि फोटोसेशनमध्ये बराच वेळ घालवला जातो. याच पार्श्वभूमीवर यंदा विठ्ठल- रखुमाईच्या शासकीय महापूजेचा वेळ तासाभराने कमी करत १२ ते ३.३० वाजेपर्यंतच ठेवण्यात आला आहे. यापूर्वी ही वेळ १२ ते ४.४५ वाजेपर्यंत होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना विठ्ठल आणि रुक्मिणीच्या स्वतंत्र महापूजा ८० मिनिटांतच उरकाव्या लागणार आहेत. एकादशीच्या दिवशी पहाटे ३:३० वाजता पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती एकाच गाभाऱ्यात शेजारी उभ्या दिसतात. मात्र, मूळ ठिकाण असलेल्या पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणीची स्वतंत्र मंदिरे दिसून येतात. त्यामुळे येथे स्वतंत्रपणे विठ्ठल व रखुमाईची पूजा करावी लागते. त्यामुळे पूजेसाठी जास्त वेळ लागतो. 
 

 

महापूजेसाठी मुख्यमंत्री पायी येणार का?
शिवाजी चौक ते विठ्ठल मंदिर हे अर्धा किमीचे अंतर आहे. एकादशीची गर्दी  व अरुंद रस्ता असल्याने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा भाविकांना त्रास होऊ नये म्हणून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांना पायी चालत येण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महापूजेसाठी मध्यरात्री मंदिरापर्यंत पायी चालत येणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 

 

२१०० पासेसची छपाई, ११ वा. प्रवेश
यंदा आषाढी यात्रेसाठी २१०० पासेस छापल्या आहेत. महाराज, नगरसेवक, अधिकारी, मोठ्या देणगीदारांना हे पासेस दिले जातात. त्यांना यापूर्वी एकादशीच्या दिवशी सकाळी ९  वा. प्रवेश मिळायचा. मात्र, दर्शनाच्या प्रतीक्षेत तासन॰तास उभे असलेल्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून यंदा ११ वाजेनंतर त्यांना दर्शनासाठी सोडले जाईल.

 

असे असेल पूजेचे वेळापत्रक 
> आषाढी एकादशीला मध्यरात्री १२:४५ वाजता पदस्पर्श दर्शन बंद केले जाईल. 
> १५ मिनिटांत गाभाऱ्याची स्वच्छता करून १ ते १.४५ वाजेदरम्यान विठ्ठल व रुक्मिणीची नित्य व पाद्यपूजा केली जाईल. 
> श्री विठ्ठलाची नित्यपूजा व पाद्यपूजा समितीचे अध्यक्ष डाॅ. भोसले सपत्नीक करतील. तर, रुक्मिणीची नित्यपूजा नगराध्यक्षा साधना भोसले पतीसह करतील. 
> २.१० मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पत्नी अमृता यांच्यासह प्रथम विठुरायाची त्यानंतर रुक्मिणीची महापूजा करतील. 
> १:४५ वाजता बंद केलेली दर्शनरांग पहाटे ३:३० सुरू केली जाईल. महापूजेनंतर ३:३० ते ४:१५ दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दांपत्याचा सत्कार व दिंडीप्रमुखांना निर्मलवारी पुरस्कार दिला जाईल.