आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत 2 दिवस पावसाच्या सरी, अडीच मिलिमीटरची नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद -  गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील विशेषत: उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यात हवामानात बदल दिसून आला. मंगळवारी सायंकाळी  व त्यानंतर बुधवारी सायंकाळी उस्मानाबादमध्ये जोरदार पाऊस झाला. गुरुवारी (दि. 25) सकाळपासून शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळ रिमझिम सुरू होती,  तर तुळजापूर तालुक्यातही बुधवारी सायंकाळी पाऊस झाला. दोन दिवसांच्या या पावसाने शेतीवर काहीही फरक पडणार नसला तरी पावसाच्या आकडेवारीत दोन मिलिमीटरने भर पडली आहे. दरम्यान, उस्मानाबादेत गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.   


गेल्या चोवीस तासांत उस्मानाबाद तालुक्यात 2.38 तर तुळजापूर तालुक्यात 3.57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या पावसाची यामध्ये नोंद नाही. विशेषत: उस्मानाबाद शहर, पाडोळी मंडळासह तुळजापूर शहर आणि तालुक्यातील सलगरा भागात पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळपासून उस्मानाबादेत पावसाला सुरुवात झाली. सकाळी 9 नंतर रिमझिम बरसात सुरू झाली. त्यानंतर दिवसभर केवळ ढगाळ वातावरण होते. या पावसाने शहरवासीयांना पुन्हा एकदा पावसाळ्याची आठवण करून दिली. ऑक्टोबर हीटने त्रस्त झालेल्या नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. वातावरणात बदल होऊन गारठा पसरला होता. सुमारे 39 अंशांवर गेलेले उस्मानाबादचे तापमान २६ अंशांवर आले. उस्मानाबादसह तुळजापूरच्या काही भागात पाऊस झाला असला तरी ग्रामीण भाग कोरडाच होता. गुरुवारी दिवसभर काही भागात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस नव्हता.  पिके बहरत असताना पावसाने दगा दिला तरी पावसाने रब्बीला थोडा का होईना लाभ होण्याची शक्यता  वाढली आहे.    

 

काय होऊ शकतो परिणाम 
पावसाने काही भागात दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वदूर मोठा पाऊस झाल्यास पाणी पातळीमध्ये वाढ होऊन संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. रब्बीच्या पेरणीचा हंगाम संपला असला तरी तुरीच्या पिकाला फायदा होऊ शकतो. तसेच हरभरा पिकासाठी अजूनही पोषक  वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे अजूनही मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...