आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलामामाच्या देशात...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंगीचे औषध दिल्यानंतर सातशे किलोच्या महाकाय शरीरात भिनण्यास त्याला वीस ते तीस मिनिटांचा अवधी लागेल. त्यानंतर ते धूड वाहनात चढवायचे, त्याला जंगल क्षेत्रापर्यंत बेशुद्धावस्थेत वाहून न्यायचे. नंतर त्याला गुंगीच्या औषधावर उतारा म्हणून दुसरे औषध द्यायचे. त्यानंतर काही वेळानंतर तो अजस्र देह सजग होईल आणि चालू लागेल. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू होते. त्यानिमित्ताने आम्ही सगळे कार्यालयीन कामांच्या पूर्ततेत व्यग्र होतो आणि त्यातच पूर्व विदर्भातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ रामटेक येथे एक धष्टपुष्ट रानगवा गावात घुसल्याची बातमी कार्यालयात पोहोचली. रानगव्याला भूल देणारे औषध देऊन त्याची रवानगी परत वनक्षेत्रात करण्यासाठी मला पाचारण करण्यात आले होते. या कामासाठीचे माझे प्रशिक्षण तर उत्तम  झाले होते, परंतु अशा कामाचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नव्हता. तसेही "प्राण्यांना बेशुद्ध करणे हा शेवटचा पर्याय असावा’ असेच आम्ही शिकलो होतो. शेवटी मुख्य वन्यजीव संरक्षकांचा मला थेट फोन आला. "गुंगीचे औषध आहे का? गाडी आहे का? निघा मग.' आदेश मिळाले... निघण्यापूर्वी वन संरक्षक साहेबांनी सल्ला दिला,  "खूप जास्त धोका पत्करू नका. काळजी घ्या.' संमोहन साहित्याची पेटी सोबत घेऊन सकाळी अकराच्या सुमारास आम्ही परतवाडा सोडलं. प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचेपर्यंत हिवाळ्यातील सूर्य मावळतीला लागला होता. नागपूरहून मुख्य वन्यजीव संरक्षक, वन संरक्षक, उप वन संरक्षक सोबत आले होते. अडीचशे कि.मी. ची मजल मारत ज्या ‘सेलिब्रिटी’साठी आम्ही प्रस्तुत झालो होतो ते रानम्हसोबा शांतपणे एका मोठ्या झाडाखाली रवंथ करत बसले होते. अर्ध्या विदर्भात आपले नाव गाजतंय, आपण प्रसिद्धीच्या शिखरावर आहोत याची, अव्वल दर्जाची स्थितप्रज्ञता साध्य केलेल्या त्या महाऋषीस गंधवार्ताही नव्हती.                                      "काळोख होत आहे. गुंगीचे औषध दिल्यानंतर सातशे किलोच्या महाकाय शरीरात भिनण्यास त्याला वीस ते तीस मिनिटांचा अवधी लागेल. त्यानंतर ते धूड वाहनात चढवायचे, त्याला जंगलक्षेत्रापर्यंत बेशुद्धावस्थेत वाहून न्यायचे. नंतर त्याला गुंगीच्या औषधावर उतारा  म्हणून दुसरे औषध द्यायचे. त्यानंतर काही वेळानंतर तो अजस्र देह सजग होईल आणि चालू लागेल.”  इतर सगळे अधिकारी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. काळोखात हे सगळं करताना होऊ शकणाऱ्या संभाव्य चुकांची भीती सगळ्यांच्या मनात घालण्यात मी बऱ्यापैकी यशस्वी ठरलो.   ‘चला, उद्या सकाळीच करू.’ निर्णय झाला.   आमची वरात नागपूरला परतली. या कामाचे प्रशिक्षण व अनुभव असलेले वरिष्ठ वनाधिकारी कळसकरसुद्धा मोहिमेत सहभागी होण्यासाठी रात्री नागपूरला येऊन पोहोचले. आता आम्ही दोघे भूलतज्ज्ञ मोहिमेत होतो. एक से भले दो...दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे  मोहीम सुरू करण्यामागे माझा उद्देश होता तो गर्दी टाळण्याचा. पण फुकट मनोरंजन होणार म्हणून गर्दी आधीच तयार होती.  सत्कारमूर्ती एका शेतधुऱ्याच्या उंचवट्याचा आडोसा घेऊन शांत बसले होते. अचूकता साधण्यासाठी बंदुकीऐवजी पिस्तुलाने इंजेक्शन डागावे, असे मी ठरवले. पिस्तुलाच्या प्रभावी माऱ्यासाठी गव्याच्या किमान वीस  मीटर जवळ जाणे आवश्यक होते.  मी जसजसा जवळ जाऊ लागलो, आमचा धिप्पाड मित्र सतर्क होऊ लागला.  माझ्यातले आणि त्याचे अंतर जेमतेम वीस मीटरचे उरले असावे. ‘आता लय झालं’  अशा आविर्भावात रानगवा जागीच उठून उभा राहिला.  माझ्याकडे नजर रोखून पाहू लागला. हातातील पिस्तूल रानगव्याला दिसू नये म्हणून  पिस्तुलाचा हात मी पाठीमागे धरून होतो. मानेला झटका देत त्याने एकदा शिंग उगारले आणि मला “मागे फिरा” असा निर्वाणीचा इशारा दिला. मी दोन पावले अधिक पुढे गेलो. आपल्या फेंदारलेल्या नाकातून तो संतापाने  फुसांडला. त्याने मागील दोन पायांनी माती फेकली आणि उसेन बोल्टसारखा पवित्रा घेतला. अजूनही ‘मी तुला घाबरत नाही’ असं माझं त्याला बळेच दाखवणं सुरूच होतं. रानगव्याने जोरदार फुत्कार टाकला, घोड्याप्रमाणे समोरचे दोन्ही पाय वर उचलले आणि एका ढांगेत धुऱ्यावरील मातीचा उंचवटा त्याने पार केला. मीसुद्धा चपळाईने मागे वळलो. पण धडपडीत जागीच आडवा झालो. शेतातील काळ्या मातीच्या ढेकळांवर पडल्या-पडल्या मागे पाहिले. गवा माझ्या अंगावरून झेप घेऊन पार झालेला दिसला.  म्हणजे पडलो नसतो तर गव्याच्या धडकेने माझ्या ठिकऱ्या उडाल्या असत्या. गव्याने आता अतिरिक्त डार्ट घेऊन माझ्या मागे असलेल्या कळसकरांची पाठ  धरली. कळसकर पळत होते आणि बेफाम झालेला रानगवा त्यांचा पाठलाग करत होता.  कळसकर सरळ न पळता डावीकडे वळले आणि वाचले. रानगवा गर्दीच्या दिशेने पळत राहिला,  बघ्यांमध्ये खळबळ उडाली. चेंगराचेंगरीत लोकांच्या पायातील चपलांचा खच पडला. गवा गर्दी मागे टाकत विजयी वीराप्रमाणे रेल्वे रुळांपर्यंत जाऊन थबकला.    पहिली फेरी रानम्हसोबांनी जिंकली होती. ‘वाचलास रे बाबा, हृदयाचे ठोके चुकणे हे कशाला म्हणतात ते आज प्रत्यक्ष अनुभवले!’  अशी मुख्य वन्यजीव संरक्षकांची प्रतिक्रिया होती.   आमचे सत्कारमूर्ती आता सर्वांचा नाद सोडून रेल्वे रूळ ओलांडून एका कालव्याच्या बाजूला असलेल्या हिरवळीवर ताव मारत होते.  पुढील प्रयत्न तीस ते चाळीस मीटर अंतरावरून करण्यासाठी आता मी बंदूक निवडली.  दरम्यान, गर्दीतून बेसुमार सल्ले, उपदेश आणि तिरसट टीका कानावर पडत होती. अचानक जाणवले की, त्या मुक्या प्राण्याच्या त्रासातून नागरी वस्तीला वाचवणे ही आपली मोहीम नसून बेशिस्त जमावाच्या वस्तीतून त्या भरभक्कम वन्यजिवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप पोहोचवणे अधिक गरजेचे आहे. तो आणि मी कुठे तरी एकाच मानसिक अवस्थेत होतो. कुठल्याही गुन्ह्याशिवाय आम्ही गर्दीच्या निशाण्यावर आलो होतो. पुन्हा एकदा गर्दीकडे दुर्लक्ष करत मी पुढे सरसावलो. आवश्यक तेवढ्या अंतरावर पोहोचताच बंदुकीचा चाप दाबला. नेम अचूक साधला गेला. बंदुकीच्या नळीतून सुटलेले इंजेक्शन रानगव्याच्या खांद्यावर जाऊन धडकले. परंतू ते त्याच्या खांद्यावर अडकून न पडता तेथून टप्पा घेऊन नजीकच्या पाटाच्या पाण्यात जाऊन पडले. अशा प्रकारच्या सिरींजमध्ये एक छोटा स्फोटक असतो. ज्याक्षणी इंजेक्शन शरीरावर जाऊन थडकते त्याच क्षणी आतल्या कार्ट्रिजचा स्फोट होतो आणि औषधाची शरीरात पेरणी होते. सिरींजची शरीराला चिकटून राहण्याची गरज नसते. इतकी तांत्रिक माहिती सर्व प्रेक्षकांना सांगणे शक्य नव्हते. गर्दीतून बघे विचित्र कॉमेंट्स करत होते.  ‘नेम चुकला वाटते’, ‘साहेबाचा निशाना ज्यमला नाही’, ‘याईच्या बसचं काम नाही दिसत’ इ.इ.  रानगव्याच्या हालचाली मंदावू लागल्या होत्या. परंतु प्रेक्षक अधीर झाले होते. त्यांना दिलेल्या धीर धरण्याच्या सूचनांची यथेच्छ खिल्ली उडवली जात होती. पहिल्या  इंजेक्शनमुळे शांत झालेला गवा आता एका झाडाच्या सावलीला येऊन उभा राहिला होता. तो सुस्त वाटत होता, पण आडवा झाला नव्हता.  मी परत कमी मात्रेचे एक इंजेक्शन डागले. पुढील दोन-तीन मिनिटांतच गवा खाली बसला.  थोड्या वेळात त्याची उरली-सुरली शुद्ध गेली आणि तो आडवा झाला. मोहिमेचा पहिला भाग पूर्णत्वास गेला होता.  गव्याचा देह ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत चढवणे एक मोठे कार्य होते. त्या काळी जेसीबीसारखी यंत्रे सहज उपलब्ध नसत. ट्रॉलीला लाकडे टेकवून रानगव्याला वरती खेचण्यात आले. रानगव्याला वनक्षेत्रापर्यंत ट्रॅक्टरने नेण्यास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे लागली. एव्हाना गुंगीच्या औषधाचा परिणाम कमी होऊ लागला होता. हळूहळू शरीराची हालचाल दिसू लागली. सकाळपासूनच्या धडपडीचे चीज झाले होते. रानगवा सुखरूप जंगलात पोहोचला. खाली उतरवून गुंगी उतरण्याचे इंजेक्शन दिले. उच्चाधिकाऱ्यांनी आमचे अभिनंदन केले. सगळे आपापल्या नियमित कर्तव्यावर परतले.  मी  नागपूरला मित्राकडे मुक्कामी राहिलो. सकाळी नेहमीच्या वेळी उठलो.... आणि कालच्या यशस्वी मोहिमेतून मिळालेल्या आनंदावर विरजण पडले.  तो रानगवा गतप्राण झाल्याची बातमी एका वन कर्मचाऱ्याने आणली होती.  रानगव्याच्या मृत्यूमुळे आम्ही केलेल्या मेहनतीचे, घेतलेल्या जिवाच्या जोखमीचे चीज झाले नव्हते. अति श्रमामुळे हृदयक्रिया बंद पडून तो गवा वैकुंठाला प्राप्त झाल्याचा निष्कर्ष निघाला होता. मनाला वेगळीच चुटपूट लागली. रानगव्याच्या मृत्यूमुळेसुद्धा माणसाच्या जिवाची घालमेल होऊ शकते, हे सत्य त्या क्षणी उमजले. या अनपेक्षित शोकांतामुळे व्यक्ती म्हणून अधिक प्रगल्भ झालो होतो.      शब्दांकन : जी. बी. देशमुख संपर्क : ९४२३१२४८३८ gbdeshmukh21@rediffmail.com