आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - वाहन उद्योगासाठी यंदाचा हंगाम तितकासा समाधानकारक नव्हता. या दरम्यान वाहनांच्या विक्रीत ११ टक्क्यांची घट झाली. प्रवासी वाहनांच्या विक्रीत १४ टक्के, तर दुचाकीच्या विक्रीमध्ये १३ टक्क्यांची घट झाली आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील डीलरची संघटना “फाडा’च्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष अाशिष हर्षराज काळे यांनी सांगितले की, सणांच्या हंगामाचा विचार केल्यास अलीकडच्या काळातील यंदाचा हंगाम सर्वात मंद राहिला. विक्रीमध्ये घसरण झाल्याने डीलरकडे मोठ्या प्रमाणात साठा शिल्लक राहिला आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर असोसिएशन (फाडा)ने वाहनांच्या नोंदणीच्या आधारावर आकडेवारी दिली. त्यानुसार यावर्षी सणाचा हंगाम १० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान ४२ दिवसांचा होता. या दरम्यान २०,४९,३९१ वाहनांची नोंदणी झाली. गेल्यावर्षी २३,०१,९८६ वाहनांची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षी ४२ दिवसांचा सणांचा हंगाम २१ सप्टेंबर ते १ नोव्हेंबरपर्यंत होता. वास्तविक या दरम्यान तीनचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये १० टक्क्यांची, तर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये १६ % वाढ झाली होती.
फेडरेशनच्या वतीने सरकार व रिझर्व्ह बँकेकडे एनबीएफसीमधील नगदीचे संकट दूर करण्याची मागणी करण्यात आली. एनबीएफसी वाहन उद्योग क्षेत्राच्या विकासाचे प्रमुख चालक असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे. एनबीएफसीमधील भांडवलाचे संकट सर्वच क्षेत्रांसाठी चिंतेचा विषय आहे. दिवाळीनंतर या कंपन्यांना कर्ज देताना अत्यंत सावध राहावे लागत आहे. फेडरेशनने विक्रीची ही आकडेवारी पहिल्यांदाच जाहीर केली आहे. पुढील काळात ही अाकडेवारी नियमित जाहीर करण्यात येणार आहे. एप्रिल २०१९ पासून क्षेत्रनिहाय आकडेवारी जारी करण्यात येणार आहे.
३ कारणे कमी विक्री होण्याची
- सणाच्या हंगामादरम्यान पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ.
- कारसाठी एकाच वेळी पाच वर्षांचा थर्ड पार्टी विमा.
- वाहन कर्ज देणाऱ्या एनबीएफसीमध्ये नगदीचे संकट.
चौकशी जास्त झाल्याने विक्रीत वाढीची अपेक्षा : सणांच्या हंगामात मोठ्या प्रमाणात चौकशी झाल्यामुळे असोसिएशनच्या वतीने भविष्यात विक्री वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भविष्यात हेच ग्राहक गाड्यांची खरेदी करतील, अशी अपेक्षा आहे. नगदीचे संकट दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही महत्त्वाचे उपाय केले असून त्याचाही परिणाम होईल.
आठ महिन्यांत विक्रीत ६.५% वाढ
चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते २० नोव्हेंबरपर्यंत वाहनांची विक्री ६.५ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी या दरम्यान १,१२,५४,३०५ वाहनांची नोंदणी झाली होती. यावर्षी ही संख्या वाढून १,१९,८९,७०५ झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.