आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागपूर - शिकार केलेले चितळ खायला आलेली वाघीण व तिचे २ बछडे मृत चितळावर टाकलेल्या कीटकनाशकामुळे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार या गावाजवळ साेमवारी सकाळी उघडकीस आली. वन विभागाने एका शेतकऱ्यास अटक केली असून त्याने शिकारीवर कीटकनाशक अोतल्याची कबुली दिली. मात्र, कीटकनाशक वाघांना ठार मारण्यासाठी टाकले नसल्याचा दावा त्याने केला आहे.
मृत बछडे ८ ते ९ महिन्यांचे होते, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मेटेपार गावालगत तलावाकाठी काही गावकरी सकाळी जांभळे तोडायला गेले असताना वाघिणीसह २ बछडे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी याची माहिती शंकरपूरच्या पर्यावरणवादी मंडळाच्या अमोद गौरकर यांना दिली. गौरकर यांनी घटनास्थळी पाहणी केली असता जवळच एक चितळ मृतावस्थेत आढळून आले. या चितळाचे दोन पाय तुटलेल्या अवस्थेत होते. वाघीण व तिच्या बछड्यांनी या मृत चितळाला खाल्ल्याने त्यांना विषबाधा होऊन ते मृत झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला होता. वाघांच्या शवविच्छेदनातही थायमेट या कीटकनाशकामुळे तिन्ही वाघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ब्रह्मपुरी वन विभागाचे उपवनाधिकारी कुलराज सिंग, चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चिवंडे यांनी गावात जाऊन या प्रकाराची चाैकशी केली.
म्हणे... मारायचे हाेते कुत्र्यांना, मात्र जीव गेला वाघांचा
मृत चितळावर थायमेट नावाचे कीटकनाशक आपणच टाकल्याची कबुली पांडुरंग चौधरी या शेतकऱ्याने दिली. गेल्या शुक्रवारी कुत्र्यांनी त्याचे वासरू ठार केले. त्यामुळे कुत्र्यांना मारण्यासाठी कीटकनाशक टाकले होते, असा पांडुरंगचा दावा असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक रामाराव यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. अर्थात वन विभागाचा पांडुरंगच्या सांगण्यावर विश्वास नाही. कारण यापूर्वीही पूर्व विदर्भात पाळीव जनावरे ठार मारल्याचा सूड उगवण्यासाठी वाघांना विषप्रयोग करून अशाच पद्धतीने ठार मारण्यात आल्याच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनेच्या सविस्तर चौकशीतून या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असेही रामाराव यांनी सांगितले.
> चौकशीचे आदेश, खबरदारीच्या सूचना :
या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी व पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्यात याव्या, अशा सूचना वनमंत्री मुनगंटीवारांनी दिल्या.
> वाघांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र देशात तिसरा :
देशात सर्वाधिक वाघांचे मृत्यू मध्य प्रदेशात व त्यापाठाेपाठ कर्नाटक, महाराष्ट्राचा क्रमांक लागताे. २०१२ ते २०१८ या ७ वर्षांत महाराष्ट्रात ५४ तर मध्य प्रदेश व कर्नाटकात ७८ व ५७ बळी गेलेे. महाराष्ट्रात ९ वाघांचा अपघाती तर १८ वाघांची शिकार झाल्याचे ‘नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अथॉरिटी आॅफ इंडिया’च्या अहवालात म्हटले आहे.
घटनांची मालिका कायम
नोव्हेंबर २०१७ मध्ये विदर्भात २ वाघांना विषप्रयोग करून ठार मारण्यात आले होते. या घटनेनंतर वनक्षेत्र असलेल्या गावांत लोकांत वाघांबद्दल जागृती निर्माण करण्याची मोहीम वन विभागाने हाती घेतली. त्यानंतरही अशा घटनांची मालिका सुरूच आहे. यंदा जानेवारीतही विजेच्या तारा टाकून वाघांना ठार मारण्याची घटना समोर आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.