Home | Maharashtra | Mumbai | 'In the inquiry panel giving the supari for the fight of Avani' - Uddhav Thackeray

‘अवनीच्या शिकारीची सुपारी देणारेच चौकशी समितीमध्ये’ - उद्धव ठाकरे

विशेष प्रतिनिधी | Update - Nov 11, 2018, 07:34 AM IST

निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापून प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली.

 • 'In the inquiry panel giving the supari for the fight of Avani' - Uddhav Thackeray

  मुंबई - कथित नरभक्षक अवनी वाघिणीच्या शिकारीवरून वाद शमण्याची चिन्हे नाहीत. ही शिकार नियमानुसार केली गेली का नाही, याचा तपास करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची एक समिती नेमली आहे. विशेष म्हणजे मुनगंटीवार हेच वाघिणीच्या हत्येला जबाबदार असल्याचा आरोप होत असताना त्यांनी नेमलेल्या समितीवरही शंका घेतली जात आहे.
  या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, समिती हा एक फार्स आहे. ज्यांनी अवनीच्या शिकारीची सुपारी दिली त्यांनाच या समितीवर नेमले आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापून प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली. पत्रकारांनी अवनीबाबत प्रश्न विचारल्यानंतर उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांनी अवनीला गोळ्या झाडलेल्या व्यक्तीचा सत्कार करायला हवा, अशी टीका केली.दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात पेंढरू येथे वाघाच्या हल्ल्यात सखुबाई कस्तुरे (५५) ही महिला ठार झाली. तिच्या शरीरावर वाघाच्या हल्ल्याच्या जखमा आहेत.घटनास्थळी वाघाच्या पंजाचे ठसेही आढळून आलेत.

  उद्धव यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
  सुधीर मुनगंटीवार यांनी काही स्वत: वाघिणीला गोळ्या घातल्या नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, सर्जिकल स्ट्राइक काही मोदींनी केला नव्हता. मग त्याचे श्रेय कसे घेतले? मग या पापाचे धनी तुम्ही होणार का?

  मुनगंटीवारांचा पलटवार : उद्धव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू
  वाघिणीच्या मृत्युप्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्याच अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो. ते जर तयार असतील तर हे आम्ही करू शकतो, अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले, उद्धव हे युती सरकारचे महत्त्वाचे नेते आहेत. चौकशी समितीचे प्रमुखपद त्यांनी न स्वीकारल्यास सुप्रीम कोर्टाच्या ५ निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नेमण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. यात विनाकारण हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे.

  अशी अाहे चाैकशी समिती : अवनी हत्या प्रकरणाच्या चाैकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अादेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट अाॅफ इंडियाचे सदस्य डाॅ. बिलाल हबीब, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनीश अंधेरिया हे सदस्य म्हणून तर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकाेडकर समन्वयक म्हणून काम पाहतील. मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वे व स्थायी कार्यप्रणालीची याेग्य अंमलबजावणी झाली की नाही हे ही समिती तपासणार अाहे.

  वाघिणीस ठार मारण्याचा आदेश मुनगंटीवारांचा नाही : वन खाते

  मुंबई | नरभक्षक टी-१ वाघिणीला जेरबंद करण्याचा अथवा तो प्रयत्न फसल्यास ठार मारण्याचा आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नव्हता. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार व एनटीसीएच्या सूचनेप्रमाणे हे आदेश प्रधान मुख्य वन संरक्षकांनी दिलेे होते. त्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता होती, असे स्पष्टीकरण वन विभागाने दिले. २ नोव्हेंबरच्या रात्री वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला होता. वाघिणीने वन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने स्वसंरक्षणार्थ तिला गोळी मारून ठार करण्यात आले.


  असे आदेश फक्त दोनदा : प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांनी मुनगंटीवारांच्या कार्यकाळात असे आदेश फक्त दोनदा दिले. २०१७ मध्ये एका नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यश आले. २ नोव्हेंबरच्या घटनेमध्ये टी-१ वाघिणीला जेरबंद न करता आल्याने स्वसंरक्षणार्थ ठार मारण्यात आले. इतर मृत्यूंत नैसर्गिक, मृत्यू, विद्युतप्रवाहामुळे, २ वाघांची हद्दीतील झुंज अशा विविध कारणांचा समावेश आहे.

  अब्रुनुकसानीचा दावा : मुनगंटीवार
  आपण संजय निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, निरुपमांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी बघितले नाहीत. त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रनुकसानीचा दावा ठोकणार आहे.

  मुनगंटीवार व शिकाऱ्यांत साटेलोटे : संजय निरुपम

  वनमंत्री मुनगंटीवार यांना वाघ मारण्यात अधिक रस असून त्यांच्यात आणि शिकाऱ्यांत साटेलोटे असल्याचा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचीही मागणी निरुपम यांनी केली.

  - मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याचे प्रमाण वाढलेे. २००८ ते २०१५ या काळात राज्यात १४ वाघ मारले होते. २०१६ या एकाच वर्षात १६ वाघ मारण्यात आले अाहेत. २०१७ वर्षात २१ वाघ ठार करण्यात आल्याचा दावाही संजय निरुपम यांनी केला.
  - यात शिकारी माफिया सक्रिय असून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यात आणि मंत्र्यांमध्ये साटेलोटे आहे असे वाटत असून मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवावे.

Trending