आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या अधिवेशनात सरकारचे वाभाडे काढण्याची संधी विरोधक गमावणार ?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास १७ जूनपासून प्रारंभ होतो आहे. फडणवीस सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून राज्यात सध्या अभुतपूर्व अशी टंचाईची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात सरकारची पोलखोल करण्याची नामी संधी विरोधकांच्या हाती आहे. मात्र ती सोडून विरोधक हे विरोधी पक्षनेतेपदावरून अधिवेशनकाळात कुरघोडीचे राजकारण रंगण्याची शक्यता असल्याने सत्ताधारी निश्चिंत आहे. 
सरकारचा पाच वर्षाचा कारभार संपत आला आला आहे. सत्ताधारी पक्षाचा लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आत्मविश्वास दुणावला आहे. तर विरोधक पदरी पडलेल्या दारुण अपयशामुळे निराश आहेत.


सतराव्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेनेला २०१४ च्या लोकसभा निवडणुकी इतकेच म्हणजे ४१ जागांवर यश मिळाले आहे. तर विरोधकांना अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. राज्यातील २२० विधानसभा मतदारसंघात युतीने आघाडी घेतल्याने सत्तधाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे. 


राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, दुष्काळाची दाहकता, जनावरांच्या छावण्या, टँकर्सच्या संख्येचे मोडलेले विक्रम, जलयुक्त शिवार योजनेच्या यशासंदर्भात उपस्थित होत असलेले प्रश्न इत्यादी मुद्यांवर विरोधकांना सरकारची चांगलीच कोंडी करता येऊ शकते. मात्र, काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसची सभागृहातली संख्या घटली आहे. राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगू शकते. त्यामुळे सरकारचे वाभाडे काढण्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अधिवेशन काळात कलगी-तुर्रा रंगण्याची दाट शक्यता आहे. 
 

 

विरोधकांकडे सरकारला धारेवर धरण्याची संधी कमीच
मंत्रिमंडळ विस्तार, नेत्यांचे पक्षप्रवेश आणि योजनांची खैरात असा बेत फडणवीस सरकारने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आखला आहे. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांकडून सरकारचे वाभाडे काढण्याचे दूरच पण, विरोधकांचा आत्मविश्वास आणखी खचण्याची शक्यता आहे. विरोधकांमधील भांडणाचा लाभ फडणवीस सरकारला मिळू शकतो. मुळात अधिवेशन १२ दिवसाचे आहे. त्यात अर्थकसंल्प सादर होईल, त्यावर चर्चेमध्ये वेळ जाणार आहे. त्यामुळे सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांकडे अत्यंत कमी वेळ असणार आहे.