आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यामध्ये सहा महिन्यांत दीड कोटीची रेशीम कोष खरेदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -   जालना बाजार समितीने सहा महिन्यांपूर्वी रेशीम कोष खरेदीची बाजारपेठही सुरू केली आहे. येथे सहा महिन्यांत दीड कोटी रुपयांचा कोष खरेदी करण्यात आला आहे. देशात बंगळुरू येथे रामनगरम ही सर्वात मोठी रेशीमची बाजारपेठ आहे. त्या तुलनेत जालना बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे.  


जालना बाजार समितीच्या वतीने २१ एप्रिल २०१८ राेजी राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ जालना येथे सुरू करण्यात आली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बंगळुरू येथे जाण्याऐवजी स्थानिक पातळीवरच बाजारपेठ उपलब्ध झाली. गेल्या सहा महिन्यांत   
८४५ शेतकऱ्यांनी या बाजारात ६० टन रेशीम कोष विक्रीसाठी आणला. त्यातून १ कोटी ४९ लाख रुपयांची उलाढाल झाली. या केंद्रावर ४७५ रुपये किलोपर्यंतचा सर्वोच्च दर मिळाला. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात काहीच उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडले नाही, तर दुसरीकडे रबीची पेरणीही झालेली नाही. अशा परिस्थितीत रेशीम शेतीने शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे. 


सध्या राज्यात जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्रावर रेशीमची शेती केली जाते. त्यापैकी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर रेशीम शेती केली जात आहे.

 
स्वतंत्र बाजारपेठेची उभारणी  
जालना शहरापासून जवळच असलेल्या शिरसवाडी शिवारातील दोन हेक्टर जमिनीवर स्वतंत्र रेशीम बाजारपेठ विकसित केली जात आहे. या बाजारात कोष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापारी तसेच शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ५ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याचे वस्त्रोद्योग विभागाचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.   

 

रेशमाला मिळतोय चांगला दर  
कर्नाटकच्या रामनगरम येथील रेशीम बाजारपेठेपेक्षाही जालना बाजार समितीमधील रेशीम खरेदी केंद्रावर रेशमाला चांगला दर मिळतो आहे. मंगळवारी रामनगरम येथे प्रतिकिलो ३१० रुपये दर असताना जालना बाजार समितीत मात्र ३३५ रुपये दर मिळाला. येथून रामनगरमपर्यंत रेशीम वाहतूक करण्यासाठी किलोमागे ३० ते ४० रुपये खर्च होतातच, शिवाय तेथे १ टक्का बाजार शुल्कही भरावे लागते.  

 

रेशीम क्षेत्र वाढवण्यासाठी विविध योजना  
रेशीम शेतीसाठी खूपच कमी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना रेशीम शेती फायद्याची ठरते आहे. रेशीम शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी आमच्या विभागाने वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत, तर येथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यातील पहिले कोष खरेदी केंद्र जालन्यात सुरू केले आहे.  
- अर्जुन खोतकर, राज्यमंत्री तथा सभापती, जालना बाजार समिती.

बातम्या आणखी आहेत...