आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In The Last Ten Years, 97 Soldiers Were Martyred In State; Most In The Year 2017

राज्यात गेल्या दहा वर्षांत ९७ सैनिक शहीद; सर्वाधिक सन २०१७ मध्ये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - देशाच्या सीमेवर सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी अहाेरात्र कर्तव्य बजावत असतात. अशा वेळी अचानक शत्रूंकडून गाेळी अथवा बाॅम्बचा मारा हाेऊन ते धारातीर्थी पडतात. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील ९७ जवान धारातीर्थी पडले. दहा वर्षांच्या काळात राज्यातील सर्वाधिक जवान सन २०१७ मध्ये शहीद झाले असून त्या वर्षी एकूण १९ जवान शहीद झाले. 

सन २०१० मध्ये १४ आणि २०१६ मध्ये १३ जवानांना वीरमरण आले. शहीद हाेणाऱ्यांमध्ये काेल्हापूर जिल्ह्यातील जवानांची संख्या माेठी असून या कालावधीत १३ जवान धारातीर्थी पडले. सातारा जिल्ह्यातील १२ जणांना वीरमरण आले आहे. 

अहमदनगर आणि सांगली येथील प्रत्येकी ७ जवान दहा वर्षांत शहीद झाले असून आैरंगाबाद, साेलापूर, पुणे येथील प्रत्येकी पाच जवान शहीद झाले आहेत. नाशिक आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी ४ जवान दहा वर्षांच्या काळात शहीद झाले. जे जवान सैन्यात कर्तव्य बजावत असताना धारातीर्थी पडलेले. त्यांच्या विधवा पत्नींसाठी सरकारने प्रत्येकी दाेन लाख रुपयेप्रमाणे अर्थसाहाय्य देण्याची याेजना मार्च १९९९ मध्ये सुरू केली आहे. या रकमेत एक जानेवारी २०१९ पासून एक काेटी रुपयांपर्यंत भरीव वाढ करण्यात आली आहे. 

युध्दात, युध्दजन्य परिस्थितीत तसेच सुरक्षासंबंधी माेहिमेत आणि देशाबाहेरील माेहिमेत आणि सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्करी दलातील अपंगत्व प्राप्त झालेल्या राज्यातील जवानांना शासनाने ही मदत सुरू केली आहे. जवानाला २५ टक्के अपंगत्व असल्यास २० लाख रुपये, ५० टक्के अपंगत्व असल्यास ३४ लाख रुपये आणि ५१ टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास ६० लाख रुपये मदतनिधी आहे. शहिदांच्या कुटुंबीयांमध्ये वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांना एक काेटी रुपयांची मदतनिधी ठरावीक टक्केवारीमध्ये विभागणी करून देण्यात येत आहे. 

विविध कल्याणकारी याेजनांचीही मदत
सैनिक कल्याण विभागाचे कर्नल प्रदीप ढाेले (निवृत्त) यांनी सांगितले, राज्यात मागील दहा वर्षांत ९७ जवानांना देशाचे रक्षण करताना प्राण गमावावे लागले. शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना एक मे १९९९ पासून ५ लाख, एक एप्रिल २०१६ पासून आठ लाख, एक एप्रिल २०१७ पासून ८.५० लाख रुपये, तर एक जानेवारी २०१८ पासून २५ लाख रुपयांची मदत महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाढवण्यात आली.  एक जानेवारी २०१९ पासून या निधीत तिप्पट वाढ करण्यात येऊन ती एक काेटी करण्यात आली आहे. याशिवाय पात्रता निकषानुसार सैनिकांच्या कुटुंबीयांना इतर मदतही देण्यात येत आहे.