टी. पी. स्कीममध्ये / टी. पी. स्कीममध्ये जागावाटप फाॅर्म्युला ठरल्याशिवाय जमीन मिळणार नाही

Jan 30,2019 11:35:00 AM IST


नाशिक : मखमलाबाद, हनुमानवाडी येथील ७५४ एकर क्षेत्रावर स्मार्ट सिटी याेजनेंतर्गत हरित क्षेत्र विकासाकरिता नगर परियाेजना अर्थातच टी. पी. स्कीम राबवण्यासाठी दिवसागणिक विराेध वाढतच चालला असून, मंगळवारी सुमारे तीनशे शेतकऱ्यांनी आयुक्त व महापौर, विराेधी पक्षनेत्यांची भेट घेवून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राबवलेल्या याेजनेला विराेध केला. प्रथम जागावाटपाचा फाॅर्म्युला, आर्थिक माेबदला व जिझिया स्वरूपाच्या बेटरमेंट चार्जविषयी खुलासा करा ताेपर्यंत महासभेने प्रस्ताव मंजूर करू नये, अशीही मागणी त्यांनी केली.


स्मार्ट सिटी याेजनेंतर्गत हरित क्षेत्र विकास याेजना राबवण्याकरिता शेतकऱ्यांना पुरेसे विश्वासात न घेताच घाई करण्यात आली हाेती. त्यानंतर शेतकऱ्यांचा विराेध सुरू झाला. ताे मावळण्यासाठी टी. पी. स्कीमचा यशस्वी पॅटर्न असलेल्या गुजरातमधील अहमदाबादचा दाैरा करण्यात आला. मात्र, या दाैऱ्यात जमीनमालकांचे समाधान हाेण्याएेवजी टी. पी. स्कीम राबवताना स्मार्ट सिटी कंपनीने कसा घाेळ केला हे समाेर आल्यामुळे संताप वाढला. शेतकऱ्यांसमाेर प्राथमिक सादरीकरण न करताच घाईत प्रस्ताव पुढे नेल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. महापाैर रंजना भानसी यांनाही आश्चर्याचा धक्का बसला हाेता. गुजरातमधून परतल्यानंतर कालिदास कलामंदिर येथे शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी सादरीकरण केले. त्यानंतर काही शेतकऱ्यांची संमती घेऊन सर्वेक्षण सुरू केले. ही बाब बाकी जमीनमालकांना कळल्यानंतर त्यांनी विराेध केला. शेतकऱ्यांना प्रकल्पाचा अहवाल प्राप्त होत नाही व मोबदल्याचे प्रमाण ठरत नाही तोपर्यंत शेतजमीन न देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर महासभेत प्रस्ताव तहकूब ठेवला गेला. मात्र, आता शेतकऱ्यांनी जागा द्यायचीच नाही, तुम्ही महासभा घेऊन करणार काय अशी भूमिका घेतली आहे. मंगळवारी शेतकऱ्यांनी आयुक्तांसह महापौर भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते यांची भेट घेऊन विराेध केला.

माेबदला, जागेचा फाॅर्म्युल्याशिवाय जमीन देणार नाही
जागामालकांनी सुमारे नऊ प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यात सर्वप्रथम प्रस्तावाची माहिती प्रथम शेतकऱ्यांना द्यावी, शेतकऱ्यांना किती टक्के जमीन मिळेल, बेटरमेंट चार्चेस, एफएसआय, योजना पूर्ण होण्यास लागणारा कालावधी याबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. या शंकांचे निरसन हाेणार नाही ताेपर्यंत महासभेवर प्रस्ताव घेऊ नये अशी मागणी आहे. निवेदन देणाऱ्यांमध्ये स्थायी समितीचे माजी सभापती शरद कोशिरे, सुरेश पाटील, संजय बागूल, पंडित तिडके, प्रकाश जगझाप, पंढरीनाथ फडोळ, संजय फडोळ, स्वप्नील पिंगळे आदी हाेते.

X