आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सवात उत्साह : मराठवाड्यात तीन दिवसांत ६९.७९ मिमी पाऊस, दहा टक्क्यांनी वाढली सरासरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जायकवाडीचे संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
जायकवाडीचे संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद - एकोणीस दिवसांच्या खंडानंतर  शुक्रवारी (३० ऑगस्ट)  मराठवाड्यात गायब झालेल्या पावसाचे पुनरागमन झाले. शनिवार व रविवारी कमी अधिक फरकाने पाऊस पडला. तीन दिवसांत एकूण ६९.७९ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी पावसात १० टक्क्यांनी वाढ होऊन ती ७०.६९ टक्क्यांवर  पोहोचली. पावसाच्या आगमनासह श्री गणेश उत्सवही सुरू असल्याने घरोघरी,  बाजारात नवचैतन्य निर्माण झाले आहे.  

जून व जुलैमधील खंड व तुटीच्या पावसाने ९३ टक्के खरीप पेरणी कशीबशी पूर्ण झाली. तर काही क्षेत्रावरील पीक हातातून गेली आहेत.  अधून मधून पडणाऱ्या भुरभुर पावसाने पिकांना जीवंत ठेवण्याचे काम केले. २५ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यानच्या पावसाने पीक बहरली. मात्र, ऐन पीक भरणीत असतानाच एकोणीस दिवसांचा मोठा खंड पडला. त्यामुळे पिकांची वाढ, गुणवत्ता, दर्जावर विपरित परिणाम झाला. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा दुष्काळ हिसकावून नेणार, अशीच गंभीर स्थिती मराठवाड्यात निर्माण झाली होती. विशेषत: बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, जालना जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते. 

बीड तर ५० टक्क्यांपेक्षा खाली, उस्मानाबाद त्या खालोखाल होते. मात्र, श्री गणेशाच्या आगमनापूर्वीच्या तीन दिवसांत सर्वदूर पाऊस पडला. त्यामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. जेथे अतिवृष्टी व मुसळधार पाऊस पडला अशा सर्व ठिकाणी नदी, नाले ओसांडून वाहिले. तलाव, शेततळ्यात आता पाण्याची सोय झाली आहे. येथे खरीप पिकेलच पण रब्बीच्या अाशाही पल्लवित झाल्या अाहेत. ओस पडलेल्या बाजारातही गणेशाच्या आगमनाबरोबर नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र अाहे. 
 

रविवारी १५ मंडळांत अतिवृष्टी 
खंडाळी ९०, लोहा ९५, माळाकोळी ९३, कलंबर ९७, सोनखेड ६६, सेनगाव १०४, हत्ता ११०, जिंतूर ६७, सावंगी म्हा ८०, बोरी ७९, चिकलठाणा ९१, राणी सावरगाव ६५, चाटोरी ६८, झरी बु. ११०, वैजापूर मंडळात ६८ मिमी पाऊस पडला. 
 

२९.३१ टक्के तूट : 
१ जून ते २ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात ५५२.८७ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत ३९०.८४ मिमी म्हणजे ७०.६९ टक्के पाऊस पडला आहे. २९.३१ टक्के तूट आजही कायम आहे. तसेच खंडाने, काही वेळेत पाऊस पडलेला आहे. त्याचे खरीप पिकांवर दुष्परिणाम झालेले आहेत. या पावसाने कापूस, सोयाबीन, मका, तूर, बाजरी, ज्वारी, तीळ आदी पिकांना फायदा झाला असून रब्बी पेरणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
 

जिल्हानिहाय पर्जन्यमान 
 जिल्हा     पाऊस
औरंगाबाद     ६१.३१ मिमी
जालना    ६५.३८ 
परभणी     ९९.५
हिंगोली    ७१.७९
नांदेड    ९५.६७
बीड    ५३.२६
लातूर    ६३.७८
उस्मानाबाद    ४७.८६ 
 

बातम्या आणखी आहेत...