Jammu & Kashmir / खोऱ्यात लग्नाच्या २५०० मेजवान्या रद्द, प्रशासन घरोघरी रेशन, औषधी पुरवतेय 

व्यवसाय ठप्प झाल्यामुळे महिन्यात ५००० कोटींचे नुकसान 

प्रतिनिधी

Sep 04,2019 10:12:00 AM IST

काश्मीरमधील स्थानिक वृत्तपत्रांतील छोट्या जाहिरातींचे रकाने सध्या alt147इन्व्हिटेशन कॅन्सलेशन'च्या जाहिरातींनी भरलेले आहेत. या जाहिरातींमध्ये नाइलाजास्तव लग्नात दिले जाणारे भोजन रद्द करावे लागत आहे, लग्न साधेपणाने होईल, असा उल्लेख असतो. वर्ष २००८ पासून आतापर्यंत काश्मीरमध्ये ओढवलेली अशी पाचवी स्थिती आहे. यात पूर किंवा राज्यातील स्थितीचा लग्नसराईला फटका बसला आहे. बटमालूत राहणारे राशीद डार यांच्या घरी २४ ऑगस्टला लग्न होते. घराची रंगरंगोटी २ महिन्यांपूर्वीच झाली होती. राशीद म्हणाले, काश्मीरमधील लोक स्वत:च्या घरासाठी आणि लग्न खर्चासाठी पैसा जमा करत राहतात. लाल बाजारमधील बशीर यांनी मुलगा शाहिदच्या लग्नासाठी ४०० पाहुण्यांच्या यादीला कात्री लावत ४० वर आणली. गल्लीतील किंवा आसपास राहणारे लोकच कार्यक्रमासाठी येऊ शकतील. एवढेच नव्हे, तर वराच्या वऱ्हाडात केवळ ५ लोकच येणार आहेत. छापलेल्या पत्रिका तशाच ठेवल्या असून वाटपही केले नाही. गेल्या महिनाभरात २५०० हून जास्त मेजवान्या रद्द केल्या आहेत. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यात हलवाई आणि मांस विक्रेत्यांचा समावेश आहे. आचारी रहमान यांच्यानुसार, काश्मीरमध्ये कोणत्याही मेजवानीत कमीत कमी १० क्विंटल मांसाहारी भोजन तयार होते. हे आता २ क्विंटल केले आहे. खाण्यापिण्यात कपात झाली आहे, मात्र कार्यक्रमाची तयारी बंदच झाली आहे. जुबैर अहमद लग्न समारंभातील प्रसिद्ध गायक आहेत. ५७ लग्नांची बुकिंग या वर्षी मिळाली होती. त्यातून १५ लाख रुपयांची कमाई होणार होती. सर्व बुकिंग रद्द झाले. पर्यटकांसाठी काश्मीर सर्वकाही आहे. २ ऑगस्ट रोजी सरकारी मार्गदर्शक सूचनेपूर्वी ५.२१ लाख पर्यटक आणि ३.४० लाख अमरनाथ यात्रेकरू काश्मिरात दाखल झाले होते. लग्न रद्द होणे, पर्यटन ठप्प होण्यामुळे व्यवसायाचे ५ हजार कोटी रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकते, असा अंदाज आहे.


या पार्श्वभूमीवर लोकांना त्रास होऊ नये याची प्रशासन आणि सुरक्षा दल पुरेपूर काळजी घेत आहे. श्रीनगरचे जिल्हाधिकारी शाहिद इक्बाल चौधरी महिनाभरापासून रोज २ तासच झोपत आहेत. काश्मीरबाहेर राहणारे रात्री १ वाजता फोन करून सर्व ठीक आहे का, अशी विचारणा त्यांना करतात. लोकांना बोलता यावे यासाठी प्रशासन घरोघरी सॅटेलाइट फोन पोहोचवत आहे. रेशनची मोठी आवश्यकता आहे. लोकांना बर्फवृष्टीत त्रास होऊ नये यासाठी खोऱ्यात ४ महिने पुरेल एवढा साठा सरकार आधीच करून ठेवते. दोन महिन्यांचे आगाऊ धान्य गेल्या महिन्यातच दिले गेले. ४ महिन्यांसाठी पेट्रोल व २२ दिवसांचा एलपीजी गॅस खोऱ्यात आहे. सरकारने ५००० कोटींमध्ये खोऱ्यात ५०% सफरचंद खरेदी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे ७ लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. पुलवामाचे जिल्हाधिकारी सय्यद राशीद रोज ३०० ट्रकांची व्यवस्था सफरचंद बाजारांत पोहोचवण्यासाठी करतात. १० जिल्ह्यांतील ३०३७ प्राथमिक, ७७४ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा उघडल्या आहेत. मात्र, शाळेत मुले फिरकत नाहीत.


काश्मीरमध्ये ७८ हजार जवान २४ तास कर्तव्यावर
छायाचित्र श्रीनगरचे आहे. खोऱ्यात सुरक्षा दलांचे ७८,००० हून जास्त जवान तैनात आहेत. जवान २४ तास ड्यूटीत लोकांना मदत करत आहेत.


लग्नसराई...
काश्मीरच्या स्थानिक वृत्तपत्रांत रद्द झालेल्या कार्यक्रमांच्या जाहिराती


सफरचंदांचा ओघ...
बाजारात सफरचंद पोहोचवण्यासाठी रोज ३०० ट्रकांची व्यवस्था केली आहे.

X
COMMENT