आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यावलमध्ये मेन रोडवरील 5 दुकाने फोडली; 38 हजार रोख, सीसीटीव्हींचा डीव्हीआर लंपास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- चोरट्यांनी शहरातील मेन रोडवरील पाच दुकाने फोडल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. त्यात दोन सराफा दुकाने व एक मेडीकल स्टोअर्स अशा तीन दुकानांचे शटर तोडून चोरटे आतमध्ये शिरले. मात्र, तेथील दणकट सुरक्षा व्यवस्थेमुळे लाखो रूपयांचे दागिने वाचले. तर दोन दुकानातून चोरट्यांनी रोख रकमेसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हीडीआर असा ५७ हजारांचा मुद्देमाल लांबवला.

 

मेन रोडवरील अशोका रेडीमेड, समर्थ ज्वेलर्स, दगडूशेठ सोनार ज्वलेर्स, बाजीराव काशिदास कवडीवाले ज्वेलर्स, महाजन मेडीकल या पाच दुकानांचे शटर चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री नंतर तोडले. त्यात महाजन मेडीकल, कवडीवाले ज्वेलर्स, दगडूशेठ सोनार या दुकानांचे शटर तोडल्यानंतर चोरटे आत शिरले खरे मात्र पुढील दणकट सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांना आत शिरणे शक्य झाले नाही. यामुळे दुकानातील लाखो रूपयांचा मुद्देमाल वाचला. चावडी जवळील समर्थ ज्वेलर्सच्या दुकानातही चोरटे आत शिरले. मात्र तेथे दागिने व रोकड नव्हती. येथे चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर लांबवला. येथून पुढे अशोका रेडीमेडमध्ये चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला. येथे त्यांना ३७ हजार ३०० रूपयांची रोकड गवसली.

 

सोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर पळवला. मंगळवारी रात्रीच्या या प्रकारात पाच पैकी दाेन दुकानातून ५७ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या चोरीची माहिती मिळताच पहाटे ५ वाजेला पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी, एपीआय सुजीत ठाकरे, एपीआय राजेंद्र पाटील, संजय देवरे, गोरख पाटील घटनास्थळी आले. यानंतर दुपारी जळगाव येथून ठसे तज्ज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन गांगुर्डे, श्वान पथकासह उपनिरीक्षक शामराव सोनुले, हवालदार संदिप परदेशी घटनास्थळी आले. अशोका रेडीमेडचे सागर देवांग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. 

 

चोरटे सीसीटीव्हीत कैद 
सिल्व्हर रंगाच्या इंडिकाद्वारे आलेल्या चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यांनी विशिष्ट प्रकारच्या हत्याराने कुलूप तोडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. लाखो रूपयांचे दागिने वाचले. दरम्यान, दगडूशेठ सोनार यांच्या दुकानाचे शटर तोडल्यानंतर आतील भागात लाकडी फळ्या आडव्या लावल्या होत्या. त्या भेदणे अशक्य झाले.