आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आयुष्यमान भारत'चा 95 हजार कुटुंबांना लाभ, आजपासून होणार सुरु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड वर्षापूर्वी घोषणा केलेली आयुष्यमान भारत योजना 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. औरंगाबाद शहरातील 95 हजार, तर जिल्ह्यातील 1 लाख 47 हजार कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यान्वित नसल्याने घाटी रुग्णालयात ही योजना सुरू होत आहे. निवड झालेल्या कुटुंबांना योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी दिली. 

 

2011 मधील जनगणनेच्या आधारावर लाभार्थी कुटुंबांची निवड करण्यात आली असून, आर्थिक स्तर आणि सामाजिक स्थितीचा निकष लावण्यात आला आहे. ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, अशा कुटुंबाचा यात समावेश करण्यात आला आहे. सुमारे 600 जटिल आणि खर्चिक आजारांवर त्यांना मोफत उपचार मिळतील. पहिल्या टप्प्यात ही योजना शासकीय रुग्णालयात कार्यान्वित होईल. दुसऱ्या टप्यात खासगी रुग्णालयांना यात समाविष्ट केले जाईल. या योजनेसोबतच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनाही सुरू राहणार आहे. औरंगाबादेत जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यान्वित नसल्याने केवळ घाटी रुग्णालयात या योजनेअंतर्गत उपचार करण्यात येतील. 

 

किमान 15 दिवसांची प्रतीक्षा आणखी : आरोग्य उपसंचालकांनी योजना सुरु होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागात नव्हे तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयातून म्हणजेच घाटीतून सुरु होत आहे. आता घाटीवर रुग्णांचा ताण वाढणार आहे. मात्र त्या प्रमाणात मनुष्यबळ नाही. त्यामुळे योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी किमान 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

 

स्वतंत्र टीम लागणार 
रविवारी घाटी रुग्णालयातून यादीतील 10 रुग्णांना तयार ठेवण्याच्या सूचना आम्हाला मिळाल्या आहेत. ही योजना राबवण्यासाठी स्वतंत्र टीम लागेल. आगामी 15 दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येईल. - डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय 

बातम्या आणखी आहेत...