आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Inauguration Of 93rd All India Marathi Literature Conference Library In Usmanabad

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदालन उभारणीचा शुभारंभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : पुस्तक खरेदी करणाऱ्या हातांचा परिसर असा लौकिक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या निमित्ताने सुसज्ज ग्रंथदालन उभारणीस शनिवारी (दि.१४) प्रारंभ करण्यात आला. या संमेलनात पुस्तकप्रेमी रसिकांसाठी मोठी पर्वणी राहणार आहे. आधुनिक साधनांचा वापर करून ३०० ग्रंथगाळे निर्माण करण्याच्या कामाचा शनिवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुुभारंभ करण्यात आला.

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथप्रेमींसाठी सुसज्ज असे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रतिभावान साहित्यिकांचे ग्रंथ, कादंबरी, आत्मचरित्र, कथा, कवितासंग्रह असे अनेकविध साहित्यप्रकार या ग्रंथप्रदर्शनात वाचकांच्या भेटीला येत आहेत. १० फूट बाय १२ फूट आकाराचे सुसज्ज ग्रंथगाळे तयार केले जात आहेत. दोन गाळ्यांमध्ये १६ फूट आकाराचा रस्ता सोडण्यात येत आहे. या ग्रंथ दालनात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. त्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी श्री तुळजाभवानी देवी आणि संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे विधिवत पूूजन करून करण्यात आला. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर हे ग्रंथदालन साकारले जात आहे. सुमारे दोन एकर क्षेत्रावर हे ग्रंथदालन उभारले जात आहे. ८० बाय २०० फूट आकाराचे ३ मोठे मंडप उभारले जाणार आहेत. या वेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीतीन काळे, ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे, सहकार्यवाह प्रशांत पाटील, सतीश दंडनाईक, नगरसेवक युवराज नळे, कार्यकारिणी सदस्य अग्निवेश शिंदे, राजेंद्र अत्रे आदी उपस्थित होते.

साहित्य संमेलन लक्षवेधी ठरेल

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नक्की लक्षवेधी ठरेल, असा विश्वास माजी राज्यमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. यानिमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण वैभवशाली इतिहासाला झळाळी मिळणार आहे. देशभरातून साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या मान्यवरांना तेर आणि परिसरातील प्राचीन इतिहासाचे दर्शन व्हावे याकरिता हेरिटेज वॉक देखील संमेलन काळात आयोजित करण्याबाबत तेर ग्रामपंचायत आणि पुरातत्त्व विभागाला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...