आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते मुक्त शिक्षण विद्यालयाचे उद‌्घाटन; प्रवेशही सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्य मुक्त शिक्षण विद्यालय मंडळाच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ गुरुवारी (ता. १०) पुण्यात शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुक्त विद्यालयाचे प्रमाणपत्र इतर मंडळांच्या समकक्ष असेल. या मंडळांमुळे खेळाडू- कलाकारांना बहिस्थ पद्धतीने ५ वी ते १० वीचे शिक्षण घेता येईल. तसेच दिवसाचे ८ ते १० तासाला आपल्या कलेच्या, खेळाच्या सरावासाठी मिळू शकतील, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली. मुक्त विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या स्वराली जोगळेकर, पाखी जैन आणि तावडे यांनी मिळून प्रवेश प्रक्रियेचे उद््घाटन केले. शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे या वेळी उपस्थित होते.

 

तावडे म्हणाले, 'विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतले ठरवून दिलेले विषयच शिकले पाहिजेत याचे बंधन मुक्त शिक्षण मंडळात असणार नाही. विज्ञानाच्या विद्यार्थ्याला संगीत किंवा भाषा शिकण्याची संधी मिळाली पाहिजे. साचेबद्ध शिक्षणातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न शासन करत आहे. याला अनुषंगून मुक्त शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम तयार करण्याचे आव्हानात्मक काम पार पाडले गेले आहे. 

 

मुक्त शिक्षण मंडळाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी मुक्त शिक्षण विद्यालयांची ही सुरुवात आहे. यात सुधारणा, बदल घडवण्यासाठी पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्थांनी सूचना कराव्यात. या सूचनांचे स्वागत केले जाईल,' असेही तावडे यांनी सांगितले. आपले शिक्षण औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळातच अडकून पडले आहे. त्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना घोकंपट्टीपासून दूर करण्यासाठी प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात बदल करून कृतिपत्रिका आणल्या आहेत, असेही शिक्षण मंत्री तावडे म्हणाले. 

 

डोनेशनला बसणार चाप 
शिक्षक भरती होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून लाखो रुपयांचे डोनेशन घेतले जाते. याला अटकाव करण्यासाठी अभियोग्यता परीक्षा घेऊन त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारेच भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले. भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीत उत्तीर्ण झालेल्या १ लाख २१ हजार ६१५ उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे. आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती सुरू करण्यात येईल. आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी १० टक्के दिल्याने शिक्षक भरतीमध्ये काही बदल करावे लागतील का, याबाबत विधी विभागाचा सल्ला मागवला असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. 

 

शिक्षक भरतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक 
राज्यातील शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारावरच व्हावी याचसाठी राज्य शासनाने पवित्र हे संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. याच्या माध्यमातून खासगी संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या एका जागेसाठी ५ उमेदवारांची शिफारस केली जाईल. या उमेदवारांच्या मुलाखतींचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे बंधन संबंधीत संस्थाचालकांवर घालण्यात आले आहेत. राज्यातील शिक्षक आणि प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात येत आहे. प्राध्यापक भरती तातडीने होण्यासाठी विद्यापीठ स्तरावरून ३०० पॅनल तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही तावडे यांनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...