आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - देवळाली आर्टिलरी सेंटरचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सैन्य दलात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी अहाेरात्र तैनात असलेले सैनिक याच ठिकाणाहून घडले आहेत. अशा देवळाली आर्टिलरी सेंटरचा १८५४ ते २०१९ पर्यंतचा इतिहास रुद्रनाद संग्रहालयातून उलगडणार आहे. देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटर येथे साकारलेल्या या अनाेख्या संग्रहालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि. १०) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले.
देवळाली तोफखाना स्कूलच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘रुद्रनाद’ हे ऐतिहासिक संग्रहालय साकारण्यात आले आहे. या संग्रहालयाच्या उद्घाटनास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत, राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, ले.ज.पी.एस.राजेश्वर, ले.ज.एस.के.सैनी, ले.ज. कवलकुमार, मधुलिका रावत आदी उपस्थित होते. त्यानंतर शतकमहोत्सवी ट्रॉफीचे अनावरण राष्ट्रपती काेविंद यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ‘स्कूल ऑफ आर्टिलरी’ या पुस्तकाचे प्रकाशन लष्करप्रमुख जनरल रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाची पहिली प्रत रावत यांनी राष्ट्रपती काेविंद, राज्यपाल कोश्यारी यांना भेट दिली. कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, मेजर जनरल संजय शर्मा, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ब्रिगेडियर जे. बी. सिंग, कर्नल ए. के. सिंग, कर्नल रंजन प्रभा, कर्नल नवनीत सिंग, तोफखाना स्कूलचे वरिष्ठ अधिकारी, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर काेविंद यांनी सैन्यदलातील जवान व अधिकारी यांच्याशी संवाद साधत आर्टिलरी स्कूलचा शतकमहाेत्सव तसेच आगामी दीपाेत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.
सेना विमानन कोरला ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते गांधीनगर एअरफिल्ड येथे झालेल्या या शानदार संचलन कार्यक्रमात भारतीय सेना विमानन कोरला प्रतिष्ठेचे समजले जाणारे सन्मानाचे ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान करण्यात आले. भारतीय सेना विमानन कोरच्या सैनिकांनी राष्ट्राची प्रतिष्ठा आणि गौरव वाढवण्यात विशेष योगदान दिल्याचे गौरवोद्गार या वेळी राष्ट्रपतींनी काढले.
सहा विभागांच्या माध्यमातून मांडला इतिहास
प्रशस्त अशा दाेन टप्प्यांत साकारलेल्या रुद्रनाद संग्रहालयात सहा टप्प्यांच्या माध्यमातून देवळाली आर्टिलरी सेंटरचा इतिहास समाेर मांडण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सैन्यदलाचा असलेला वावर, या ठिकाणी दिले जाणारे प्रशिक्षण, ताेफखान्याचे प्रात्यक्षिक, काळानुरूप झालेला बदल आदी बाबी १८५४ पासून ते २०१९ हा कालावधी सहा विविध टप्प्यांत छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे आर्टिलरी सेंटरबराेबर धार्मिक, ऐतिहासिक तसेच काही चित्रपटांचे या ठिकाणी झालेले चित्रीकरणदेखील या संग्रहालयाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.
देवळाली ताेफखान्याचे राष्ट्रपतींनी केले काैतुक
देशाच्या तोफखान्याला अधिकाधिक दक्ष बनवण्यात देवळाली तोफखाना स्कूल आधारभूमी आहे. तोफखाना स्कूलमधील अधिकाऱ्यांची प्रशिक्षणाप्रती असलेली निष्ठा प्रशंसनीय आहे. देवळाली तोफखाना स्कूलचा नावलौकिक ‘रुद्रनाद’प्रमाणे गर्जत राहील आणि देशाकडे वाईट नजरेने बघणाऱ्या
शत्रूंना भयभीत करील, असे प्रतिपादन या वेळी कोविंद यांनी केले.
व्हिजिटर बुकमध्ये राष्ट्रपतींनी नोंदवला अभिप्राय
रुद्रनाद संग्रहालयाच्या उद्घाटनानंतर येथील व्हिजिटर बुकमध्ये राष्ट्रपती काेविंद यांनी अनाेख्या संग्रहालयाचे विशेष काैतुक करताना समाधान व्यक्त केले. हे संग्रहालय भारतीय सैन्यासह प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यामुळेे भारतीय सैन्यदलाच्या याेगदानाबद्दल सर्वसामान्यांमध्ये आदर निर्माण करणारा ठरणार असल्याचा अभिप्रायदेखील नाेंदवला.
यासाठी संग्रहालयाचे रुद्रनाद ठेवले नाव
वैदिक देवता रुद्र वादळ आणि भगवान शिव यांच्या पराक्रमी दैवी स्वरूपाची महानतम प्रेरणा यामागे आहे. देवळाली येथे आर्टिलरी सेंटरची स्थापना झाल्यापासून गर्जनाचा देव असलेल्या शिवाने परिसरात असलेल्या खंडाेबा मंदिराच्या माध्यमातून आशीर्वाद दिला आहे. रुद्रनाद म्हणजे भगवान रुद्राचा दैवी ध्वनी, जाे देवळालीतील ताेफखाना ताेफांचा कर्कश आवाजात प्रकट हाेताे आणि आपल्या वीर गनर्सना शत्रूचा संहार करण्याची प्रेरणा देताे. याच पार्श्वभूमीवर या संग्रहालयाचे नाव रुद्रनाद ठेवण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.