आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाेसरीतील घटना : बलात्कारानंतर बाप, आईनेच आवळले तिन्ही मुलांचे गळे, आराेपी बापाला पाच दिवसांची पाेलिस काेठडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ​​​​​​भाेसरीतील नूरमाेहल्ला चाळीत दाेन दिवसापूर्वी दाेन अल्पवयीन मुली, एक मुलगा यांना गळफास लावून आईने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला हाेता. मुलींच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली हाेती. मात्र, आता या प्रकरणाने आणखी नवे वळण घेतले आहे. बापानेच मुलींवर बलात्कार केला होता. तसेच पत्नीसह मिळून तिन्ही मुलांचा गळा आवळून हत्या केली आणि छताच्या हुकाला लटकवून दिल्याची कबुली मृतांच्या पित्याने दिली आहे. पाेलिसांनी आराेपी अक्रम बागवानला मंगळवारी पिंपरी न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पाेलिसांनी सर्वांचे मृतदेह फातिमाच्या भावाच्या ताब्यात दिले असून लातूरला नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे. फातिमा बागवान (२८, आरोपीची पत्नी) हिनेही मुलांच्या हत्येनंतर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर, झाेया (७), अल्फिया (९) व जिआन (६) अशी हत्या झालेल्या मुला-मुलींची नावे आहेत. याबाबत भाेसरी पाेलिस ठाऱ्यात पाेलिस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. पाेलिसांनी पती-पत्नीवर खून, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून  पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.


बापानेच रचला बनाव
२८ जुलै राेजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. घरातील मंडळी दरवाजा उघडत नसल्याचा बनाव करत अक्रमने दार उघडण्यापूर्वी  पाेलिसांना बाेलावून घेतले. आरोपी अक्रमच्या उपस्थितीत आत प्रवेश केला असता एका खाेलीत तिन्ही मुलांचे तर दुसऱ्या खाेलीत पत्नीचा गळफास घेतलेला मृतदेह सापडला हाेता. पाेलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन वायसीएम रुग्णालयात पाठवले. त्यावेळी दाेन्ही मुलींवर अत्याचार झाल्याचे तसेच गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदनानंतर उघड झाले होते. त्यामुळे पाेलिसांना अक्रमवर संशय आला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.तसेच त्याने केलेला घटनाक्रमही उलगडून पोलिसांना सांगितला. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी त्याला ५ जुलैलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 

स्वत:ही मरणार असल्याचे पत्नीला सांगून अक्रम पळाला
अक्रमने दिलेल्या जबाबानुसार, राेजगार मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. त्यामुळे आपण आत्महत्या करू आणि मुलांनाही मारून टाकू, असे पत्नीला सांगितले. त्यानुसार तिन्ही मुलांना दाेघांनी मिळून ठार मारले. त्यानंतर, “तू घरातच आत्महत्या कर, मी बाहेर जाऊन आत्महत्या करताे,’ असे पत्नीला सांगून अक्रम घराबाहेर पडला. त्यानंतर पत्नीने दरवाजाची आतील कडी लावून आेढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. परंतु, अक्रम बाहेरून तसाच घरी परतला आणि मुलांचा खून करून पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.