आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगली - काेल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, कार्यालय व सहकारी उद्याेगांवर गुरुवारी सकाळपासून प्राप्तिकर खात्याच्या पथकाने छापे टाकले. कोल्हापुरात दोन ठिकाणी, कागल, संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज आणि पुणे या ठिकाणी छापे टाकण्यात आले. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मुश्रीफ यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची ‘ऑफर’ दिली होती. ती धुडकावल्यामुळेच हे छापासत्र सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
प्राप्तिकर खात्याच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात नेमकी काय कारवाई झाली याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नव्हती. मुश्रीफ यांची किती संपत्ती जप्त झाली, काेणकाेणती कागदपत्रे सील केली, याचा खुलासा पुणे अथवा मुंबईच्या प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून केला जाईल, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
मुश्रीफ यांचे चिरंजीव साजिद यांच्या पुण्यातील कोंढवा, हडपसर येथील दोन फ्लॅटवर तसेच शिवाजीनगर येथील कार्यालयावर छापे टाकण्यात आले. कोंढवा परिसरातील अशोका मुझ सोसायटी व अॅमेनोरा पार्क येथील फ्लॅटवर सकाळी छापे टाकण्यात आले. सकाळी ६ च्या सुमारास १८ ते २० प्राप्तिकर अधिकारी फ्लॅटवर येऊन धडकले, त्यामध्ये काही महिला अधिकारीदेखील होत्या. अॅमेनोरा पार्क येथील घरांची झडती सुरू झाली तेव्हा घरातील सदस्य बाहेर निघून गेले. अशोक मुझ सोसायटीतील फ्लॅट तन्वीर बिडीवाले यांच्या नावावर आहे, तिथे साजिद हे भाड्याने राहत होते. तन्वीर बिडीवाले हे साजिद यांचे नातेवाईक असून छाप्यावेळी तिथे उपस्थित होते. प्राप्तिकर विभागाकडून घरातील कागदपत्रे व इतर तपासणीचे काम उशिरापर्यंत सुरू हाेते. स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त न घेता मुंबई रेल्वे पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
खिडकीतून आमदार मुश्रीफ म्हणाले; मी तर फकीर
छाप्याची ही बातमी कळताच शेकडो समर्थकांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी धाव घेतली. काही कार्यकर्त्यांनी शहर बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. मुश्रीफ यांनी खिडकीतून कार्यकर्त्यांशी संवाद साधत ‘मी तर फकीर आहे, त्यामुळे काळजीचे कारण नाही. शांतता राखा’ असे सांगितले. दरम्यान, माध्यमांशी मात्र मुश्रीफ बाेलले नाहीत. त्यांचा माेबाइलही बंद हाेता.
भय दाखवून नामोहरम करण्याचे काम : पाटील
आयकर विभागाच्या धाडी टाकून सरकारकडून मुश्रीफ यांच्यासारख्या सच्चा नेत्याला भय दाखवायचे काम होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. सरकारच्या आग्रहाला जो बळी पडणार नाही त्याच्यामागे शुक्लकाष्ट लावण्याचे धोरण सुरु आहे. मुश्रीफ हे एक सच्चा कार्यकर्त्यांमधील नेते आहेत. त्यांच्या कार्यालयात सांगली- कोल्हापूरमधील अनेक गोरगरीबांच्या आरोग्याच्या फाइल्स असून तेच मुश्रीफ यांचे खरे धन असल्याचे पाटील म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.