आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधुरा कलाविष्कार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यावसायिक क्षेत्रात ज्याचं बोट धरून आपण चालतो, यश मिळवतो त्याचं आयुष्यात वेगळं महत्त्व असतं. त्याची कौतुकाची थाप मोलाची असते. पण कधी या आदराच्या स्थानासाठी कृतज्ञता व्यक्त करायची राहून जाते...  

 

सावरखेड-एक गाव, सनई-चौघडे, जोगवा, ७२ मैल एक प्रवास, सारख्या दर्जेदार कलाकृती देणारे दिग्दर्शक राजीव पाटील ही माझे आयुष्य घडवणारी व्यक्ती होती. यशाच्या वाटेवर अडखळताना, पुढचे पाऊल टाकताना, यश मिळवताना प्रत्येक क्षणी राजीव सर आठवतात.  “वंशवेळ’ चित्रपट मी त्यांच्यासोबत केला होता. दुर्दैवाने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्यांचे निधन झाले. ते माझ्यासाठी केवळ चित्रपटाचे दिग्दर्शक नव्हते. वडिलांप्रमाणे चांगल्या-वाईटाची जाणीव करून देणारे, समवयस्क मित्राप्रमाणे सल्ला देणारे होते. वंशवेळ पूर्णत्वास येण्याच्या वेळी एका दृश्याच्या चित्रीकरणानंतर ते म्हणाले, “नम्रता, एक कलाकार या नात्याने हे उत्तम सादरीकरण आहे. याच भरवशावर तू उत्तम अभिनेत्री होशील.’ राजीव सरांनी दिलेली ही पावती खूप मोठी होती. त्याच दिवशी मी ठरवले की, आयुष्यात यशस्वी झाल्यावर पहिल्यांदा ज्याला कुणाला आदराने काही समर्पित करीन, ती व्यक्ती राजीव सर असतील. एका मोठ्या व्यासपीठावरून उत्तम असा नृत्याविष्कार त्यांना समर्पित करायचा होता. “वंशवेळ’च्या यशानंतर ती संधी आली होती, परंतु तेव्हा राजीव सर या जगात नव्हते. वंशवेळदरम्यान आमच्यात छान गट्टी जमली होती. वैयक्तिक आणि व्यावसायिक नात्यांत अंतर ठेवण्याचे कौशल्य राजीव सरांकडून शिकण्यासारखे होते. ते नेहमी म्हणायचे, मी कधीच व्यक्तीची कदर करत नाही, त्याच्यातल्या कलेची कदर करतो. माझ्यातील कलेची कदर जाणणारी ही कदाचित माझ्या आयुष्यातील काही निवडक लोकांपैकी एक व्यक्ती होती. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने एक हिरा तर गमावलाच. पण, मी माझा गुरू, माझा आदर्श व्यक्ती गमावला. 
शब्दांकन - विवेक राठोड

बातम्या आणखी आहेत...