आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील भिल्ल वीरांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठावाची पहिली ठिणगी टाकली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे मुख्य सचिव, राजवाडे इतिहास संशोधन मंडळ, धुळे महाराष्ट्रात आदिवासी, कोळी, रामोशी, या उपेक्षित-अशिक्षित घटकांनी कंपनी सरकारच्या विरोधात प्रथम उठाव केले.  ठिकठिकाणी उठाव करून इंग्रज प्रशासनास जेरीस आणले. इंग्रजांनी साम, दाम, दंड, भेद, नीतीचा अवलंब केला. वेळप्रसंगी अामिषे दाखविली. त्यांच्या उपजीविकेची तजवीज केली. त्यांची स्वतंत्र पलटण उभारली. तरीही भिल्लांनी आपल्या नायकांच्या नेतृत्वाखाली बंड उभारले. एक नायकास अटक करत तेथे दुसरा नायक नेतृत्व करून इंग्रजांचे ठाणे जिंकून घेई.   महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य उठावाची पहिली ठिणगी भिल्लवीरांनी पेटवली. १८१८ ते १८७० पर्यंत विविध ठिकाणी उठाव केले. ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीराव पेशवा इंग्रज सेनापती मास्कमला शरण गेला. इंग्रज-मराठा युद्ध संपुष्टात येऊन संपूर्ण महाराष्ट्रात इंग्रजी सत्तेचे बीजारोपण झाले. परंतु खान्देशात मात्र हे युद्ध सुरुच होते. १८१८ ते १८५८ या ४० वर्षांच्या काळात अनेक संघर्ष झाले.  -माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने मुंबई प्रांताची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर कलेक्टर म्हणून खान्देशची जबाबदारी कॅप्टन जॉन ब्रिग्ज यांच्याकडे सोपवली. इंग्रजांनी आर्थिक लाभासाठी त्यांचा हक्क हिरावला. त्यांच्याकडील वतने व जमिनीवरील हक्कांवर गदा आणली. सावकारांना कंपनी सरकारने प्रोत्साहित करून आदिवासींचे आर्थिक शोषण केले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीही त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती केली. यामुळे इंग्रजविरोधी वातावरण निर्माण झाले. - इंग्रजाच्या जुलमी कारभाराविरुद्ध खान्देशातील आदिवासी वीर पेटून उठले. तरुण भिल्ल क्रांतिकारक एकत्र आले. १८१८ ते १८७० पर्यंत खान्देशात ३२ वर नायकांनी इंग्रजांविरुद्ध अरण्ययुद्ध पुकारले. यात प्रामुख्याने कन्हैय्या, चिल्या, जीवा, रामसिंग, वसावा उमेडसिंग, कुंवरसिंग, काझीसिंग (खाज्या नाईक), भीमा नाईक, भागोजी नाईक, सुभान्या, हिऱ्या, रामजी, कान्या, देवचंद, संभाजी, दशरथ यांच्यासारख्या अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी बलिदान दिले.  -३० जानेवारी १८१८ ला नांदगाव, नाशिक भागात भिल्ल व कोळी वीरांनी इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ले केले. यात १० इंग्रज सैनिक ठार, तर ५० जखमी झाले. १८१८ मध्ये नाशिक व चाळीसगावाजवळ त्र्यंबकाची डेंगळे, त्यांचे पुतणे गोदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली ८ हजार भिल्लांनी ब्रिटिशांविरुद्ध्र रणशिंग फुंकले.   चिल्या नाईक, लोहारा भिल आदींचा जुलमी इंग्रजांविरुद्ध निकराचा लढा -१८१९-२० च्या दरम्यान चिल्या नाईकने उठाव केला पण त्यास फासावर लटकवले. १८२० ला सरदार दशरथने उठाव केला. त्यास पेंढारी नेता शेख अब्दुल्ला येऊन मिळाला. १८२२ ला हिऱ्या नाईकने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. १८२३ मध्ये या वीरांना दडपण्यासाठी कर्नल रॉबिन्सन सेना घेऊन खान्देशात आला. १८२४ ला लिव्हिंगटनने भिल्लांची ३५ घरे, ४ पुरुष व २ महिलांना स्त्रियांना अमानुषपणे जाळले. - १८२५ ला बागलाण (सटाणा) परिसरात शिवरामच्या नेतृत्वाखाली ८०० आदिवासींनी अंतापूरवर हल्ला करून मुल्हेर किल्ला ताब्यात घेतला. इंग्रज अधिकारी औऊटरॅमने शिवराम आणि अन्य शेकडो आदिवासी वीरांना जेरबंद केले. १८२६ ला डांग भागातील  स्वातंत्र्यवीर लोहारा भिल याने इंग्रजांना आव्हान दिले. खान्देशातील काही देशमुख, पाटील मंडळींनी भिल्लांना मदत केली.  -१८१८ ते १८३१ या काळात नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर, नाशिक व डांग भागातील ९ ते १० हजार आदिवासींनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केल्याचे एल्फिन्स्टनने अहवालात नमूद केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी पिंपळनेर (साक्री, धुळे) येथे बागलाण मार्गे येऊन १८३६ ला पिंपळनेरच्या कचेरीवर हल्ला केला. तेथील रोख रक्कम लुटून ब्रिटिश सत्तेला जबरदस्त हादरा दिला.   १८५७ च्या उठावात खान्देशातील आदिवासी क्रांतिवीरांचे योगदान  जस्टिस मॅकॉर्थीने हिस्ट्री ऑफ युवर ओन टाइम्स या आत्मवृत्तात म्हटले आहे की, हा उठाव दक्षिण हिंदुस्थानपर्यंत पोहाेचला होता. मुंबई प्रांतातील आदिवासी, भिल्ल, कोळी, रामोशी यांनीही इंग्रजांची चांगलीच दमछाक केली.  १८५७ च्या उठावाचे लोण खान्देशमध्ये पसरले. काजीसिंग (खाज्या नाईक) नगर पोलिस दलात होते. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन बंडाचा झेंडा बुलंद केला.   - भीमा नाईक यांनी १८५७ ला खान्देशातील उठावास चालना दिली. ते दिल्ली बादशहाच्या नेतृत्वाखाली उठावात सहभागी होत आहे, या वृत्तामुळे घाबरले. त्याला पकडून देणाऱ्यास सरकारने १० हजारांचे बक्षीस जाहीर केले. शिरपूरजवळ इंग्रज सैन्याविरुद्ध त्यांचा सामना झाला. 

इंग्रजांच्या ७ लाख रुपयांच्या खजिन्याची भिल्लांनी केली लूट 
उठाव दडपण्यासाठी इंग्रजांनी भिल्ल कोअरची निर्मिती केली. १७ नोव्हेंबर १८५७ ला इंदूरकडून मुंबईकडे खजिना जात होता. रक्षणासाठी २०० सैनिक सेंधवा घाटात येताच भहमा व काजी यांच्या ३०० भिल्ल वीरांनी जांभोली चौकीजवळ हल्ला करून सात लाख रुपयांचा सरकारी खजिना लुटला. भिल्लांनी घाटातील टेलिफोन व टेलिग्रामच्या वायर तोडून सर्व संदेश यंत्रणा बंद पाडली. तसेच बोर घाटातून जाणाऱ्या अफूच्या ६० गाड्या लुटल्या. 

उठावात ४०० पेक्षा जास्त भिल्ल वीरांगनांचा सहभाग
इंग्रजांविरुद्धच्या उठावात भिल्ल वीरांगनाही सहभागी होत्या. मेजर वुडच्या पत्रानुसार, खाजेसिंगची पत्नी, बहीण, भहमा नाईक यांची पुतणी, पत्नी यांना अटक झाली होती. अंबापाणीच्या लढाईत इंग्रजांनी ४०० वीरांगनांना कैद केले. त्यांना त्रास दिल्यास बंडखोर शरण येतील हा कयास इंग्रजांचा होता. मात्र खाज्या नाईक व त्याचे सहकारी झुकले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...