लेखकाच्या एकलपणाचं स्वातंत्र्य / लेखकाच्या एकलपणाचं स्वातंत्र्य अबाधित राखलं पाहिजे!

Jan 31,2019 10:55:00 AM IST

अभिव्यक्तीचे आपले आतले गोंधळ मिटवीत एकमेकांच्या साथीने उभं राहण्याची आणि तगून राहण्याची आज कधी नव्हे इतकी गरज आहे. लेखक निर्मितीच्या पातळीवर एकटा असतो. तो तिथे कुणाचाही, अगदी स्वत:चाही असत नाही. तीच त्याची खरी शक्ति आहे. हे एकटेपणाचं स्वातंत्र्य अबाधित राखून किंबहुना त्यासाठीच सर्वांनी एकत्र यायला हवं. एकूणच जगण्यात इतके अंतर्विरोध निर्माण झालेले आहेत की काहीच निखळ राहिलेलं नाही. या स्थितीतून मार्ग काढण्यासाठीच आपण एक असू या, एकटं असणं शक्य व्हावं यासाठी एकत्र येवू या.

आपण सारे एकत्र जमलो आहोत, ही अतिशय चांगली आणि उल्लेखनीय घटना आहे परंतु तिला कारणीभूत ठरलेली गोष्ट लाजिरवाणी आहे. कोणी असं म्हटलं की, अपमान झाल्याशिवाय मराठी माणसं एकत्र येत नाहीत, तर ते फारसं चुकीचं असणार नाही. मागच्या वेळी एका सत्ताधीशाने साहित्यिकांना बैल म्हटलं होतं. तेव्हाही नांगीवर पाय पडल्यासारखे साहित्यिक पेटून उठले होते. आता कोणी असंही म्हणेल की, मराठी लोक अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या मोठ्या सोहळ्याला एकत्र येतात की नाही? तर येतात. पण त्याचवेळी राजकीय कृपाछत्राखाली आणि धनिकांच्या पैशांवर चालणारी अखिल भारतीय साहित्य संमेलनं ही त्यांचे हितसंबंध दुखवणाऱ्या आणि त्यांना प्रश्न करणाऱ्या साहित्यिकांचा अपमान करण्याची पूर्ण क्षमता राखून असतात, हेही आपण जाणून असायला हवं. आपली इस्त्रीदार घडी मोडू न देण्याची अभिजनवादी परंपरा राखण्याचा ती आटोकाट प्रयत्न करतात.


आता अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वसमावेशक झाल्याचा दावा केला जातो. थोर समाजसेवक न्या. रानडे यांना त्यांच्या पहिल्या ग्रंथकार सभेचं आमंत्रण नाकारताना महात्मा जोतिराव फुले यांनी विचारलेले प्रश्न अजून तसेच आहेत. मी महात्मा फुल्यांचा वारसा मानतो. त्यामुळे मलाही काही प्रश्न पडतात. प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. आम्ही राज्य घटनेला बाधा येवू देणार नाही असं आता जाहीरपणे म्हणू लागलेले लोकच गेली चार वर्ष घटनेने दिलेल्या आचार, विचार, विहार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करत आहेत.


लिओ टाॅलस्टाॅय आपल्या ‘व्हॉट इज अॅन आर्ट’ या पुस्तकात एक मार्मिक प्रश्न करतात. ते म्हणतात, कलेसाठी कलावंत जीवनाचा होम करतात. ते हुशार असतात, बुद्धिमान असतात. पण ते जी कलानिर्मिती करतात त्या कलेची साधनं निर्माण करण्यासाठी असंख्य मजूर कष्ट करत असतात. गवंडी, चित्रकार, रंगारी, शिंपी, न्हावी, धोबी, परीट, जवाहीरे आणि असे शेकडो लोक आपली आयुष्यं कलांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निर्मितीत खर्च करीत असतात. केवळ कलेच्या निर्मितीसाठीच नव्हे तर कलावंतांना ऐषआरामी जगता यावं म्हणूनही असंख्य लोक कष्ट उपसत असतात. कलावंतांना, कलेला धनिकांचा किंवा सरकारचा आश्रय मिळतो तेव्हा ते पैसे सामान्य माणसाच्याच खिशातून आलेले असतात. या सगळ्याची जाण जर कलावंताला नसेल तर त्याच्या कलेचा सर्वांगीण विकास होणार नाही. मग त्याच्या कलेला कला म्हणता येईल काय? केवळ लेखक-कलावंतच नव्हे तर शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, वकील, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, पत्रकार अशा ज्यांना ज्यांना समाजात आवाज आहे त्यांनी बाळगलेलं मौन म्हणजे सत्ताधाऱ्यांना आणि सत्तेला अंकित असलेल्या व्यवस्थांना सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांची लूट करण्याचा दिलेला परवाना ठरतो. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई म्हणजे आपापले हितसंबंध डिवचले गेल्यावर ठोकायची बोंब नसून प्रत्येक व्यक्तीच्या आविष्काराचं मूल्य जपण्यासाठी परजलेलं हत्यार आहे. समाजातले हे आवाज असलेले लोकच सामान्य माणसाच्या हिताचे खरे चौकीदार आहेत.


कवि गजानन मुक्तिबोध म्हणाले होते, ‘अब अभिव्यक्ती के सारे खतरे उठाने होंगे, तोडने होगे मठ और गढ सब’ पण या मठी आणि गढ्यांच्या आड व्यवस्थेने इतक्या भिंती शिताफीने उभ्या केल्या आहेत की आपल्याला आता मठी आणि गढ्याच दिसत नाहीत. या भिंतींच्या रक्षणासाठी अशा माणसांच्या फौजा उभ्या केल्या आहेत ज्यांच्या आयुष्यात अभावच अभाव भरून राहिला आहे. याच अभावग्रस्त माणसांसाठी आपण भांडत होतो का, असा प्रश्न पडावा आणि मती गुंग व्हावी अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुमच्याच माणसांना किवा तुम्हालाच तुमच्या विरोधात झुंजवत ठेवायची युक्ति सत्तेने आणि सत्तेला अंकित असणाऱ्या व्यवस्थांनी चलाखीने अवगत केली आहे. त्यामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई अतिशय अवघड झाली आहे. तिला तोंड देण्यासाठी आपण स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे. आपणच उभारलेल्या भिंती तोडायला पाहिजे आणि आधी आपल्याआतच असलेल्या दबावांशी झुंज घेतली पाहिजे. माझ्यावर होणारी टीका निकोप मनाने स्वीकारता येईल का? मला दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेता येईल का? हे प्रश्न निकडीचे आणि तातडीचे आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथूनच सुरू होतं आणि व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याचं बळ देतं, असं मला वाटतं. अन्यथा ही लढाई तात्कालिक ठरून संपूनही जाईल.


आपल्या देशाच्या प्रमुखांनी आणि त्यांच्या प्रभावळीतल्या लोकांनी असत्याचा एकच गजर मांडला आहे. सध्याचं युग हे काही विचारवंतांच्या मते ‘पोस्ट ट्रूथ’ युग आहे. या युगाचं लक्षण असं सांगितलं जातं की, यात लोक सत्य किंवा वास्तव याच्यापेक्षा श्रद्धा आणि भावनांना जास्त महत्त्व देतात आणि त्यांनाच मानतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकण्यासाठी आणि त्यानंतर केलेला असत्याचा बेसुमार वापर हे ‘पोस्ट ट्रूथ इरा’चं ठळक उदाहरण मानलं जातं. अशी परिस्थिती जगातील ज्या ज्या देशांमध्ये आहे त्यांत भारताचा समावेश केला गेला आहे. ‘पोस्ट ट्रूथ पॉलिटिक्स’ असा शब्द प्रयोगच अस्तित्वात आला आहे. म्हणजे तुमच्या देशात सरकार निवडणुकांच्या माध्यमातूनच स्थापन होईल, पण या निवडणुका जाहिरात कंपन्या लढवतील. त्या तुमची मनोभूमिका निश्चित करतील. त्यांना जे हवं आहे तेच सत्य म्हणून सांगितलं जाईल. तसंच वातावरण निर्माण केलं जाईल.


आपल्या देशाच्या संदर्भात विचार करता हिंदू युग संकल्पना ही सत्य युग, त्रेता युग, द्वापार युग आणि कलियुग अशा चार युगांत विभागली गेलेली आहे. सध्याचं युग हे कलियुग मानलं जातं. ही पोस्ट कलियुग अवस्था आहे, किंवा आपण याला उत्तर कलियुग म्हणू. अगदी अचूक शब्द योजायचा झाला तर हे ‘असत्य युग’ आहे. या असत्य युगातला राम आणि त्याचं रामायण वेगळं आहे. अशा मायावी युगात लेखकाला सत्य सांगायचं असेल तर ते त्याने कसं सांगावं? पोस्ट मॉडर्निस्ट म्हणतील की, सत्याचा अंत झाला आहे. पण ते खरं नाही. आज असत्यच सत्य म्हणून सांगितलं जातंय. समजलं जातंय आणि सत्य भूलभुलैयात गुमराह झालंय.


अशा भयानक गोंधळाच्या आणि संघर्षमय परिस्थितीत आव्हान स्वीकारायचं असेल तर अभिव्यक्तीचे आपले आतले गोंधळ मिटवीत एकमेकांच्या साथीने उभं राहण्याची आणि तगून राहण्याची आज कधी नव्हे इतकी गरज आहे. लेखक निर्मितीच्या पातळीवर एकटा असतो. तो तिथे कुणाचाही, अगदी स्वत:चाही असत नाही. तीच त्याची खरी शक्ति आहे. हे एकटेपणाचं स्वातंत्र्य अबाधित राखून किंबहुना त्यासाठीच सर्वांनी एकत्र यायला हवं. या विधानातही एक विरोधाभास आहे.


सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या मुळाशी एक विरोधाभासी स्थिती आहे, तसाच विरोधाभास या विधानातही आहे. पण एकूणच जगण्यात इतके अंतर्विरोध निर्माण झालेले आहेत की काहीच निखळ राहिलेलं नाही. या स्थितीतून मार्ग काढण्यासाठीच आपण एक असू या, एकटं असणं शक्य व्हावं यासाठी एकत्र येवू या. तसा विश्वास आपण एकमेकांत निर्माण करू शकू, अशी आशा व्यक्त करून थांबतो.

X