आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारच्या कार्यकाळातील कथित घोटाळ्यांचा स्वतंत्र विषय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात येताच भाजपचा थयथयाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सन २०१४ नंतर म्हणजेच मोदी सरकारच्या काळात देशात झालेले मोठे आर्थिक घोटाळे हा विषय बीबीएच्या द्वितीय वर्षातील प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी विद्यापीठ प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला. तर व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी बुधवारी परिषदेच्या बैठकीत संताप व्यक्त करत हा विषय रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर कुलगुरूंनी हा विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

 

बुधवारी विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे, कुलसचिव डॉ.साधना पांडे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे २२ सदस्य उपस्थित होते. एेनवेळेचा विषय म्हणून शितोळे यांनी या विषयाला वाचा फोडली. ते म्हणाले, बीबीएच्या (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रमात 'ए स्टडी ऑफ स्कॅम्स आफ्टर २०१४' असा स्वतंत्र पेपर तयार केला आहे. ही बाब हेतुपुरस्सरपणे केली आहे. विद्यापीठाला त्या आधी झालेले घोटाळे दिसले नाहीत काय? शितोळे यांचा रुद्रावतार पाहून कुलगुरूंनी हा विषय तत्काळ रद्द करण्याचे आदेश अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांना दिले.


आपले सरकार असताना हा विषय कसा? : केंद्र, राज्यात भाजप सरकार आहे. भाजपच्या काळात झालेले आर्थिक घोटाळे हे कथित आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. आपल्या विचारांचे राज्य असताना विद्यापीठात हा विषय कसा घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा भाजपच्या गोटात दोन दिवसांपासून होती. ही बाब काही लोकांनी भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या कानावर घातली. त्यांनी शितोळेंसह कुलगुरूंना हा विषय अभ्यासक्रमातून काढण्याची विनंती केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला.


शितोळेंचा सवाल : रफालच का, बोफोर्स का नाही
या बैठकीत ८० विषय ठेवले होते. यातील २० च चर्चेला आले. एेनळेचा विषय शितोळे यांनी मांडला. या अभ्यासक्रमात मोदी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचा समावेश कसा, असा सवाल त्यांनी केला. कुणीही या विषयावर जास्त बोलण्यास तयार नव्हते. शितोळे म्हणाले, अभ्यास करायचाच असेल तर त्या आधीच्या कार्यकाळातील घोटाळे का नाही घेतले? रफालचा विषय ठेवला तसा बोफोर्स का नाही, असाही सवाल केला. प्रकरण गंभीर होत आहे हे लक्षात येताच कुलगुरूंनी हा विषयच अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...