आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिवनेरी’ गावात घुसले दहशतवादी; १८ देशांच्या लष्करी जवानांकडून खात्मा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्याजवळील शिवनेरी गावात दहशतवादी हल्ला हाेऊन काही घरांत अतिरेकी लपल्याची माहिती लष्कराला मिळते. लागलीच १८ देशांचे लष्करी जवान जमतात आणि अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी “कोव्हर्ट आॅपरेशन’ सुरू होते. माहिती प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा शोध घेतला जातो. या माहितीच्या आधारे सुरू होते लष्कराची कारवाई. गोळीबार, बॉम्बवर्षाव, भूसुरुंगांचा स्फाेट अशा परिस्थितीचा सामना करणारी तुकडी तसेच हेलिकॉप्टरमधून इमारतीच्या टेरेसवर उतरणारे चपळ जवान एकमेकांशी समन्वय साधत अतिरेक्यांच्या घराला घेराव घालून त्यांचा खात्मा करतात आणि ठिकठिकाणी पेरलेले भूसुरुंग निकामी करून संपूर्ण गावाला त्यांच्या तावडीतून मुक्त करतात.... हा प्रसंग आहे पुण्यातील औंध लष्करी तळावर भारत आणि १७ आफ्रिकन देशांच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता माेहिमेअंतर्गत आयाेजित ‘एफइंडेक्स’ या दहादिवसीय युद्धसरावाच्या सांगता समाराेहातील. विविध १८ देशांतील एकूण १८० सैनिकांनी यात सहभागी हाेत चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले.  

 


अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर  : या मोहिमेत तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी ध्रुव, मिग-१९ हेलिकाॅप्टरचा वापर करण्यात आला. दरम्यान, कारवार्इत जखमी झालेल्या जवानांना तसेच नागरिकांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात पोहोचवण्यात आले.  ‘रुद्र’ या अत्याधुनिक राेबाेट मशीनने बाॅम्ब निकामी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. शिवाय, श्वानाच्या मदतीने गावातील विविध संशयास्पद ठिकाणांची तपासणी करून गाव सुरक्षित झाल्याचे लष्करातर्फे घाेषित करण्यात आले. त्यानंतर लाेकांनी दैनंदिन कामकाजास सुरुवात करत परिस्थिती पूर्वपदावर अाणल्याबद्दल लष्कराचे आभार मानले.   

 

कारवाई करण्यासाठी उभारले काल्पनिक गाव  
तळावर उभारलेल्या काल्पनिक “शिवनेरी’ गावात हे प्रात्यक्षिक करण्यात आले. दहशतवादी संघटनेचे लाेक अचानक गावात दाखल हाेऊन गाेळीबार करून तसेच लाेकांना मारहाण करून गावावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारच्या घटना वारंवार हाेऊ लागल्याने ग्रामस्थ याबाबतची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता माेहीम पथकास देतात. त्यानुसार विविध देशांचे सैनिक एकत्रितरीत्या नियोजन करून माहिती आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून दहशतवाद्यांची ठिकाणे हेरून त्या ठिकाणी बचावकार्यासाठी धाव घेतात. 

 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता माेहिमेत भारताची नेहमीच प्रमुख भूमिका : लष्करप्रमुख बिपिन रावत 
भारत अाणि आफ्रिकन देशांदरम्यान विकासाची नवीन भागीदारी असून पायाभूत साेयी-सुविधा, काैशल्य, शिक्षण यांची देवाणघेवाण करण्यात येत अाहे. आफ्रिकन देशांतील वादविवाद कमी हाेऊन शांतता नांदावी या दृष्टीने भारतातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता माेहिमेत भारताची प्रमुख भूमिका राहिल्याचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. या वेळी युद्धसरावात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध देशांतील सैन्य अधिकाऱ्यांचा लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात अाला. रावत म्हणाले, भारताचा आर्थिक विकास माेठ्या प्रमाणात हाेत असून भविष्यात आफ्रिकन देशांसाेबत आर्थिकबाबत सहयोगासाठी लक्ष केंद्रित करणार आहे. दोन्ही देशांनी वसाहतवादाशी लढा दिला आहे.  दोन्ही देशांचे भविष्य उज्ज्वल असेल. त्यामुळे  जागतिक शांततेत महत्त्वाची भूमिका राहील, असेही ते म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...