Icc world cup / भारताची वेस्ट इंडीजवर सलग चौथ्यांदा मात; मोहम्मद शमीचे करिअरमधील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन

 कोहली विश्वचषकात सलग ४ सामन्यांत ५०+ धावा करणारा बनला पहिला कर्णधार
 

वृत्तसंस्था

Jun 28,2019 12:30:43 PM IST

मँचेस्टर - विराट कोहली (७२) व महेंद्रसिंग धोनी (५६*) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडीजवर १२५ धावांनी विजय मिळवला. भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला. मो. शमीने करिअरमधील (१६/४) सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले.


प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद २६८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात विंडीजचा डाव १४३ धावांवर ढेपाळला. विराट विश्वचषकात ४ सामन्यांत ५० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने २०१९ मध्ये आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रीम स्मिथने २००७ मध्ये हा विक्रम केला होता. लोकेश राहुलने ४८ आणि हार्दिक पांड्याने ४६ धावा काढल्या. वेगवान गोलंदाज केमार रोचने तीन बळी घेतले.


रोहित शर्मा (७२) मोठी खेळी करू शकला नाही. रोचच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यानंतर कोहली आणि राहुलने दुसऱ्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी रचली. नंबर चारवर आलेला विजय शंकर (१४) आणि केदार जाधव (७) अपयशी ठरले. त्यानंतर कोहलीदेखील बाद झाला. धाेनी व पांड्याने सहाव्या गड्यासाठी ६० चेंडूंत ७० धावांची भागीदारी रचली. धोनीने पहिल्या ४५ चेंडूंवर २६ धावा केल्या व नंतर १६ चेंडूंत ३० धावा ठोकल्या. कॉट्रेल व होल्डरने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

धोनी षटकारांत चौथा
२६६ षटकार झाले धोनीचे वनडेमध्ये. सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर पोहोचला. आफ्रिदी (३५१) पहिल्या, गेल (३२४) दुसऱ्या आणि जयसूर्या (२७०) तिसऱ्या स्थानावर आहे.

धोनी वनडेत सर्वाधिक अर्धशतके करणारा तिसरा फलंदाज

धोनीने वनडेत ७२ वे अर्धशतक ठोकले. तो भारताकडून सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. सचिन (९६) पहिल्या आणि द्रविड (८३) दुसऱ्या आणि गांगुली (७२) आणि धोनी तिसऱ्या स्थानी आहे. धोनीने विश्वचषकात एकूण चार अर्धशतके लगावली आहेत. कोहलीसह खेळाडू म्हणून विश्वचषकात सचिन (१९९६, २००३) आणि सिद्धूने (२००७) सलग ४ सामन्यांत ५० पेक्षा अधिक धावा काढल्या.

कोहलीने सचिन-लाराचा विक्रम मोडला

कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सर्वात कमी डावांत हे यश मिळवले. कोहलीने ४१७ डावांत, तर सचिन-लाराने ४५३ डावांत अशी कामगिरी केली होती. कोहलीने ३६ डाव आधी अशी कामगिरी केली. जगात एकूण १२ आणि टीम इंडियाचा हा तिसरा खेळाडू बनला. सचिन (३४३५७) अव्वलस्थानी आहे. कोहली (२००३५), दक्षिण आफ्रिकेचा डिव्हिलर्स (२००१४) यांना मागे सोडत ११ व्या स्थानी पोहोचला. राहुल द्रविड (२४२०८) सहाव्या स्थानी आहे. या सर्व १२ फलंदाजांत कोहलीची (५६.४३) सरासरी ५० पेक्षा अधिक आहे.

वेस्ट इंडीजची फलंदाजी ढेपाळली : वेस्ट इंडीजच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १४३ धावांवर डाव संपुष्टात आला. स्फोटक सलामीवीर क्रिस गेल अवघ्या ६ धावांवर परतला. मो. शमीने जाधवच्या हाती त्याला झेल बाद केले. अॅम्ब्रिसने ४० चेेंडूत सर्वाधिक ३१ धावा केल्या. पुनरने ५० चेंडूंत २८ आणि हेटमेयरने १८ धावा जोडल्या. कर्णधार होल्डर अवघ्या ६ धावांवर परतला. कॉट्रेलने १० धावा काढल्या. तळातील फलंदाज केमार राेच १४ धावांवर नाबाद राहिला. त्याला दोन वेळा जीवनदान मिळाले होते. भारताकडून मो. शमीने १६ धावांत ४ बळी घेतले. बुमराह आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. पांड्या आणि कुलदीपने प्रत्येकी एक गडी बाद केला.

अंपायरचे निर्णय चुकले
सामन्यात केदार जाधवला अंपायरने बाद दिले नाही. वेस्ट इंडीजने रिव्ह्यू घेतला आणि जाधव बाद झाला. चालू विश्वचषकात विंंडीजविरुद्ध अंपायरचे सर्वाधिक ८ निर्णय चुकले. दक्षिण आफ्रिका व भारताविरुद्ध ३, इंग्लंड-अफगाणिस्तानविरुद्ध अंपायरचे २ निर्णय चुकले.

X
COMMENT