आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महात्मा गांधी, पंडित नेहरूंसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून भारत उभा राहिला' - संजय आवटे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेईएस महाविद्यालयातील गांधी विचार शिबिरात मार्गदर्शन करताना संपादक संजय आवटे. - Divya Marathi
जेईएस महाविद्यालयातील गांधी विचार शिबिरात मार्गदर्शन करताना संपादक संजय आवटे.

जालना : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर देश उभा राहील याची कल्पना महात्मा गांधीजींना होती. सर्वसामान्य माणसाच्या शहाणपणावर माझा विश्वास आहे, त्यांच्यात अंगभूत शहाणपण आहे, असे गांधीजी म्हणत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अाणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात काही विषयांवर मतभेद होते. मात्र, या तिन्ही महापुरुषांच्या दूरदृष्टीतूनच भारत देश दिमाखात उभा राहिला, असे प्रतिपादन दैनिक दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांनी केले.

जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने '१५० नंतर गांधी' या विषयावर आयोजित १६ व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्रीनिवासजी भक्कड होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, राष्ट्रीय युवा संघटनचे समन्वयक मनोज ठाकरे, प्रशांत नागोसे, केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने, प्रा. डॉ. महावीर सदावर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आवटे म्हणाले की, देश सोडून जाताना माऊंट बॅटन म्हणाले होते की, गांधीजी, आम्ही निघून गेल्यावर येथे गोंधळ होईल. मात्र, जो काही गोंधळ असेल तो आमचा असेल आणि तो आम्हाला प्रिय असेल, असे चोख उत्तर महात्मा गांधीजींनी त्यावेळी दिले होते. तर, पंडित नेहरूंनी देशाची विविधता ही एक प्रेरणा असल्याचे म्हटले होते. राज्यघटनेने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ तयार होईल; मात्र येथे अंतिम सत्ता ही सर्वसामान्य माणसाची असेल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. कारण, त्यांना सर्वसामान्य माणसाच्या समंजसपणावर विश्वास होता. यावरून महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. देशाला एकसंघ करण्यासाठी गांधीजींनी भारत भ्रमण केले, परंपरेचा अवकाश त्यांनी कधीच सोडला नाही. स्वातंत्र्यानंतर भारताचा विचारांचा केंद्रबिंदू हा भारतच राहिला म्हणून आज आपण एक देश म्हणून जागतिक पातळीवर उभे आहोत. गांधीजींचे जीवन हीच एक प्रयोगशाळा होती. त्यातून केवळ सत्य बोलायचेच नाही तर सत्य वागायचे सुद्धा हा संदेश मिळतो,असेही ते म्हणाले. प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, मनोज ठाकरे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त करत शिबिराला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक डॉ. यशवंत सोनुने, सूत्रसंचालन प्रा. डॉ. महावीर सदावर्ते, तर आभार डॉ. वसंत मुंडे यांनी मानले.

  • जेईएस महाविद्यालयात राज्यस्तरीय गांधी विचार शिबिराचे उद्घाटन

'जय भीम' हा देशाचा पासवर्ड

जय भीम हा या देशाचा पासवर्ड आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्यासोबत शाहू-फुलेसुद्धा समजून घेण्याची गरज आहे. अंधार कितीही असला तरी गांधीजी नावाची पणती आपल्या सोबत आहे. यामुळे कितीही आव्हाने आली तरी त्याचा सामना करता येईल, यासाठी गांधीजी समजून घेतले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात माध्यमे उपलब्ध आहेत. मात्र, या तरुणाईचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. यासाठी तरुणांनी लोकशाहीचे सामर्थ्य ओळखून आव्हानांना तोंड द्यावे, असे अावाहनही आवटे यांनी तरुणांना केले.

१० मैलांवर भाषा बदलते

अध्यक्षीय समारोपात श्रीनिवासजी भक्कड म्हणाले, ८-१० मैलावर येथे भाषा बदलते. आपण तरुणांच्या हातात देश देत आहोत, यासाठी अशा प्रकारच्या शिबिराची गरज आहे. यातून महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
 

बातम्या आणखी आहेत...