आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत तापला : देशाच्या दोन तृतीयांश भागात हीट वे‌व्हचा कहर, 50.80 अंशांवर चुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र राजस्थानातील चुरू येथील आहे. येथे वाढत्या तापमानामुळे सडकेचे डांबर वितळू नये म्हणून त्यावर पाणी टाकण्यात आले. - Divya Marathi
हे छायाचित्र राजस्थानातील चुरू येथील आहे. येथे वाढत्या तापमानामुळे सडकेचे डांबर वितळू नये म्हणून त्यावर पाणी टाकण्यात आले.

नवी दिल्ली, पुणे - देशातील दोन तृतीयांश भाग उष्णतेच्या लाटेने हैराण झाला आहे. देशात उष्णतेच्या लाटेचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने लोकांना या काळात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. शनिवारी या हंगामातील सर्वात उष्ण दिवस राहिला. हवामान अंदाज विभागाचे प्रमुख ए.के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, राजस्थानातील चुरू येथे पारा ५०.८ अंशांवर पोहोचला. हे गेल्या ६३ वर्षांतील दुसरे सर्वाधिक तापमान आहे. यापूर्वी १९५६ मध्ये अलवर येथे ५०.६ अंश अशी नोंद झाली होती.  २०१६ सर्वात उष्ण वर्ष राहिले.२०१६ मध्ये फलौदी (राजस्थान) येथे पारा ५१ अंशांपर्यंत पोहोचला होता. दिल्लीत तापमान ४६.६ तापमान होते. ते सरासरीहून ६ अंश जास्त नोंदले गेले.  लखनऊ, जयपूर, हैदराबाद आणि चंदिगडसह १४५ शहरांतील पारा ४० अंशांवर राहिला. 

२०१९ सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते, जानेवारीत उन्हाळ्यास सुरुवात झाली 
देशात आजवरची ११ स‌र्वात उष्ण वर्षे २०१४ -१८ मध्ये

१९०१ नंतर आतापर्यंत ६ सर्वाधिक उष्ण ‌‌वर्षांची नोंद झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, या वर्षी जानेवारीतच तापमान वाढण्यास सुरुवात झाली होती. पारा सरासरीहून २ ते ५ अंशांनी जास्त राहिला. त्यामुळे २०१९ ची गणनाही सर्वात उष्ण वर्षांत होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाची आकडेवारी सांगते की देशात १९६१ ते २०१८ या काळात तापमानात ०.८ अंशांची वाढ झाली. उष्ण दिवसांचे प्रमाण वाढले आहे.


२७ वर्षांत उष्णतेच्या लाटेचे देशात २२ हजारांवर बळी
उष्णतेच्या लाटेने १९९२ पासून देशात आतापर्यंत २२ हजारांहून जास्त बळी घेतले आहेत. देशात १९७१, १९८७, १९१७, २००१, २००२, २०१३ आणि २०१५ मध्ये लाटेचे सर्वात जास्त बळी नोंद झाले. 


यंदा आतापर्यंत तेलंगण, आंध्रात उष्णतेच्या लाटेचे १५५ बळी 
यंदा उष्णतेच्या लाटेमुळे सर्वात जास्त बळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणात गेले आहेत. वृत्तानुसार आतापर्यंत येथे सुमारे ८०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १५० हून जास्त बळी गेले. महाराष्ट्रात सध्या ४५६ जण रुग्णालयात दाखल आहेत. 


देशातील ८ सर्वात उष्ण शहरे
शहर    राज्य    पारा

चुरू    राजस्थान    50.8
गंगानगर    राजस्थान    49.6
बांदा    उत्तर प्रदेश    48.4
बिकानेर     राजस्थान    47.9
पिलानी     राजस्थान    47.6
जैसलमेर     राजस्थान    47.2
नारनौल     हरियाणा    47.2
नौगाव     मध्य प्रदेश    47.9


पुढे काय...
सरासरीपेक्षा पारा ६ अंशांनी जास्त राहणार 

- हवामान विभागाच्या मते, ४ जूनपर्यंत तापमान असेच राहील. पश्चिम राजस्थान सर्वात उष्ण राहील.
- ४ जूनपर्यंत उत्तर भारतातील राज्यांशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश,महाराष्ट्रात पारा ४.५ ते ६.४ अंशांनी जास्त राहील
- मान्सून ६ जूनला केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळू शकतो.