Home | Editorial | Columns | India has advantage of trade war!

व्यापार युद्धाचा फायदा भारतालाच!

यमाजी मालकर | Update - Aug 06, 2018, 08:05 AM IST

जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या क्रयशक्ती म्हणून जेव्हा अर्थव्यवस्थेत बोनस ठरेल तेव्हा ती देशावरील ओझे होणार नाही.

 • India has advantage of trade war!

  जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या क्रयशक्ती म्हणून जेव्हा अर्थव्यवस्थेत बोनस ठरेल तेव्हा ती देशावरील ओझे होणार नाही. आजच्या जागतिक व्यापारयुद्धात भारतीय ग्राहकशक्ती भारताची ताकद बनली आहे. ती अशीच वाढवत ठेवून जगाच्या केंद्रस्थानी राहण्याची ही एक संधी आहे.


  बाजार दोनच जाती ओळखतो, एक ग्राहक आणि दुसरी म्हणजे भिकारी. बाजाराला ग्राहक हवाहवासा असतो आणि भिकारी अगदी नकोसा असतो. कारण अगदी स्पष्ट आहे, भिकाऱ्याकडून व्यवहार पूर्ण होत नाही, मात्र ग्राहक असेल तेथे व्यवहार होतोच. व्यवहार सर्वश्रेष्ठ असतो, व्यवहाराला व्यवहार काटेकोर केला पाहिजे असे म्हणण्याची पद्धत आहे ती त्यामुळेच. जगात हा व्यवहार दोन व्यक्तीमधील असो, दोन संस्थांमधील असो की दोन देशांतील असो, त्याच्या देवघेवीत फारसा फरक पडत नाही. मागणी आणि पुरवठ्याचे गणित चुकवून व्यवहाराला चालत नाही. हे इतके 'व्यवहारी' चांगले की वाईट यावर चर्चा होऊ शकते, पण जग व्यवहारावर चालले आहे हे आपल्याला मान्यच करावे लागते. आणि तेच बरे आहे. कारण त्यामुळेच समाजात आणि जगात व्यवस्था म्हणून एक निरपेक्षता टिकून राहण्यास मदत होते.


  आपल्या देशाची लोकसंख्या १३४ कोटी आहे आणि त्यातील चांगली क्रयशक्ती असणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे हे जगातील व्यवहार म्हणून आपल्या फायद्याचे आहे. आज जेवढा ग्राहक भारतात आहे तेवढा तो जगात फार कमी देशात असल्याने भारताकडे जग एक चांगली बाजारपेठ म्हणून पाहते आहे. सर्वाधिक विकासदर असणारी जगातील भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या केंद्रस्थानी येते आहे त्याचे हेच कारण आहे. विकसित जगाच्या तुलनेत भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती तुलनेने कमीच आहे, पण जी आहे तीत सातत्याने वाढ होते आहे हे महत्त्वाचे. सर्वच भारतीय नागरिक चांगले ग्राहक झाले पाहिजेत, ही आपली गरज आहे. म्हणजे सर्वांची क्रयशक्ती वाढली पाहिजे. पण संपत्ती वितरणाची चांगली व्यवस्था अजून निर्माण झाली नसल्याने तो टप्पा अजून दूर आहे. त्यामुळे देशात वाढत चाललेल्या मध्यमवर्गावर सध्या ग्राहकांची 'ग्रोथ स्टोरी' विसंबून आहे.


  गेल्या काही दिवसांत असे संकेत मिळत आहेत की अनेक आघाड्यांवर भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊ लागली आहे. सुधारणेचा नेमका अर्थ काय, याविषयी एकमत कधीच होऊ शकत नाही. कारण आपल्या देशात आर्थिक निकषांवर एवढे वैविध्य आहे की या सुधारणेचा सार्वत्रिक लाभ सर्व समूहांपर्यंत कधीच पोहोचत नाही. या सुधारणेत जे भागीदार होतात किंवा ग्राहक होतात ते या सुधारणेचे लाभधारक होतात. तशा लाभधारकांची संख्या वाढत असेल तर त्याला सुधारणा म्हटली पाहिजे. भारताच्या जीडीपीमध्ये ८० टक्के वाटा ज्यांचा आहे ते उत्पादन आणि सेवा क्षेत्राची वाढ जूनमध्ये चांगली झाली आहे. बँकेचे कर्ज घेणारे वाढत चालले आहेत. दुचाकी आणि मोटारींचा खप हा भारतात मागणी वाढते आहे की नाही हे तपासण्याचा निकष मानला जातो. त्यात तर १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे. या वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या याच तीन महिन्यांपेक्षा १७ टक्के अधिक वाहनांचे उत्पादन झाले आहे. प्रवासी गाड्यांची विक्री या काळात २० टक्के वाढली आहे. व्यावसायिक वाहने तर ५० टक्के आणि दुचाकींची विक्री १५ टक्क्यांनी वाढली आहे. शेतीसह बँकेचे कर्ज घेण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत १२.३ टक्क्यांनी वाढले आहे. कोळसा उत्पादन १० टक्क्यांनी, तर विजेचे उत्पादन ३.५ टक्क्यांनी वाढले आहे.


  भारतात ग्राहक वाढत आहेत याचा सर्वाधिक फायदा विदेशी गुंतवणूकदार घेतात. मार्चमध्ये विदेशी गुंतवणूक कमी झाली होती, पण ही वाढ पाहताच एप्रिल आणि मेमध्ये तीत चांगली वाढ झाली आहे. भारतातील ग्राहक वाढतो आहे याचा आणखी एक पक्का निकष म्हणजे परदेशी कंपन्यांची भारतात वाढत चाललेली गुंतवणूक. या वर्षी अशी गुंतवणूक आता ९८ अब्ज डॉलर (सुमारे सहा लाख कोटी रुपये) झाली आहे. वॉलमार्ट आणि फ्लिफकार्टमध्ये झालेल्या १६ अब्ज डॉलर व्यवहाराचा यात समावेश आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाने सर्व जग भयभीत झाले असले तरी असे काही झालेच तर भारतासारख्या देशाला त्याचा फायदाच होईल, असे मानले जाते आहे. त्यामुळेच चीनसह इतर शेअर बाजार या बातम्यांनी गारठत असताना भारतीय शेअर बाजार नवे उच्चांक प्रस्थापित करतो आहे. अर्थात त्याचे कारण व्यापारयुद्धापेक्षा पुन्हा भारतीय ग्राहकच आहेत.


  दैनंदिन किंवा उपभोग क्षेत्रातील आघाडीवरील कंपन्यांची उलाढाल एप्रिल ते जून या तीन महिन्यांत जेवढी झाली तेवढी ती गेल्या पाच वर्षांत या तिमाहीत झाली नव्हती. मारुती सुझुकी कंपनीने साडेपाच वर्षांतील सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. (नफ्यातील वाढ २६.९१ %) हिंदुस्थान लिव्हरने गेल्या सहा वर्षांतील तर डाबर, बजाज ऑटो आणि मारिकोने पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. देशात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त तरुण आहेत आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात विविध गरजांवर पैसा खर्च होताना दिसतो आहे. आतापर्यंत क्रयशक्तीत ग्रामीण भागातील ६८ टक्के नागरिक मागे होते, पण मान्सूनचा दिलासा आणि सरकारचा विविध योजनांवर वाढलेला खर्च यामुळे तेथेही क्रयशक्ती वाढली आहे. अधिक मागणी ग्रामीण भागातून येत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.


  भारतीय अर्थव्यवस्थेत भविष्यात याहीपेक्षा मोठी वाढ उपभोक्ता क्षेत्रात होऊ शकते असे म्हणण्यास वाव आहे. कारण भारतातील सेवा आणि वस्तू वापराची तुलना चीन आणि अमेरिकेशी केली तर अजून आपल्याला मोठा पल्ला गाठायचा असून त्यातील निम्मी वाटचाल केली गेली तरी आपल्या लोकसंख्येमुळे ती फारच मोठी झेप ठरणार आहे. उदा. अमेरिकेत विजेचा वापर ४६ हजार ३७० केजी डब्ल्यूएच आहे, जो भारतात फक्त एक हजार ९० आहे. अमेरिकेत स्मार्ट फोनधारक लाखात ३२९ आहेत, तर भारतात २३४ आहेत. अमेरिकेत घरगुती एअर कंडिशन ८८ टक्के आहे, तर भारतात ते फक्त १३ टक्के आहे. घरगुती ब्रॉडबँड कनेक्शनचा विचार करता अमेरिकेत लाखात १००, तर भारतात तेच प्रमाण १६ इतकेच आहे. रोज लागणाऱ्या वस्तूंवरील प्रतिमाणशी खर्च (अमेरिकी डॉलरमध्ये) अमेरिकेत १६९४, तर भारतात फक्त ४२ इतका आहे. अमेरिकेत अनेक गोष्टींचा वापर भारताच्या तुलनेत खूप आहे. त्यामुळे ते करतात तसाच खर्च आपण केला पाहिजे असे नव्हे. पण भौतिक संपन्नता वाढली की हा खर्च आपोआप वाढतो, असा जगाचा अनुभव आहे. त्यामुळे भारतात शहरीकरण वाढत जाणार, नागरिकांची क्रयशक्ती वाढणार आणि ग्राहक होण्याची ही प्रक्रिया आणखी वेगवान होणार आहे.


  सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताची ही ग्राहकशक्ती वाढली की जगाची दारे भारताला उघडणार आहेत आणि त्याचाही भारताला फायदाच होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्स सध्या व्यापार विषयावरून जगाला इशारे देत असताना भारताबाबतचे त्यांचे धोरण सबुरीचे आहे. याचे कारण ही ग्राहकशक्तीच आहे. चीनला आव्हान देताना भारताला अमेरिका दुखावत नाही. कारण एवढे ग्राहक सोडून देणे हे अमेरिकेला परवडणारे नाही. आज भारत-अमेरिका आयात-निर्यात व्यापार हा अमेरिकेच्या हिताचा आहे. त्यामुळे भारताने रशियाकडून शस्त्र घेणे अमेरिका मान्य करते. एवढेच नव्हे तर आशियात जपान आणि दक्षिण कोरियाशिवाय फक्त भारताला स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथोरायझेशन (एसटीए - १) दर्जा देते यातच सर्व काही आले. सध्याच्या जगात अर्थकारण हेच शस्त्र आहे असे म्हटले जाते. ते शस्त्र म्हणजे भारताच्या नागरिकांची क्रयशक्ती वाढवणे आणि त्याच्या माध्यमातून भारताला जगाच्या सतत केंद्रस्थानी ठेवणे होय.

  - यमाजी मालकर, ज्येष्ठ पत्रकार
  ymalkar@gmail.com

Trending